50/50 Kala Chi Garaz

50/50 काळाची गरज !!!

पूर्वीच्या काळी समंजस्यानं वागण्याचा मक्ता फक्त स्त्रियांकडे असायचा. एकानं तोडायचं आणि दुसर्यानं जोडायचं या पेक्षा त्यानं तोडायचं आणि तिने जोडायचं अशीच परिस्थिती होती पण आजकल तस राहिल नाही. संसार सावरण्याची जबाबदारी एकट्या स्त्रीच्या खांद्यावर नाही, तर ती विभागली गेली आहे. ती समान विभागली जावी अशी अपेक्षा आहे पण वस्तुस्थिती तशी नाही. आजही कित्येक घरात ही जबाबदारी एकट्या स्त्रीची मानली जाते किंवा विभागणी झालीच तर 60/40 किंवा 80/20 कधी-कधी 90/10 अशीही केली जाते. पण जेव्हा ही जबाबदारी 50/50 अशी विभागली जाईल तेव्हाच मंगल विवाह हा खर्या अर्थाने चिरंतन मंगल ठरेल.

आज काळ बदललेला आहे, मुली शिकलेल्या आहेत, त्यांच स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. वैचारिक तथा आर्थिक दृष्ट्या त्या मुलांइतक्याच सक्षम बनल्या आहेत. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या जबाबदारींचा डोंगर आताही त्या मुलीच्या डोक्यावर टाकल्यास यातून वादच निर्माण होणार आहेत. याउलट ही जबाबदारी दोघांनीही मिळून उचलल्यास संसारात बघा कसा गुलमोहर फुलून येईल. एकमेकांबद्दलचे प्रेम च नव्हे तर आदरही वृध्दिंगत होऊ लागेल.

पण ही जबाबदारी जशी त्या दोघांची आहे तशीच आणि तितकीच ती दोघांच्या पालकांची सुध्दा आहे. आणि नव्याने आई-बाबा होणार्या पालकांची सुध्दा आहे. कारण 50/50 टक्के विभागणी स्विकारण्याची मानसिकता लहानपणापासूनच तयार करणे, त्या दृष्टीनेच आपल्या मुलां-मुलींवर संस्कार करणे गरजेचे आहे.

डॉ.स्नेहल अवधूत सुखटणकर
  26th February, 2019