Age & Weight

"वय आणि वजन "

स्त्रियांसाठी वय आणि वजन या दोन अतिसंवेदनशील बाबी असतात . स्त्रियांमध्ये वाढणारे वय आणि वजन या दोन्ही गोष्टींमुळे शारीरिक बदलाबरोबरच मानसिक आणि भावनिक पातळीवरही भरती ओहोटी येत असतात . या चित्र - विचित्र लाटांच्या लहरींमध्ये नकळत त्या इतक्या गुरफटल्या जातात कि , त्या स्वतःमधील कमतरता सहजपणे दुसऱ्याच्या निदर्शनास आणून देतात . कारण आपण जे स्वतःबद्दल विचार करतो ते आपल्या बोलण्यातून आणि देहबोलीतून नकळतपणे आपण समोरच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि साहजिकच त्यांची प्रतिक्रियाही त्याच अनुषंगाने येत असते .

टिना आणि मीना या सख्या जुळ्या बहिणी . लहानपणापासूनच दोघी चांगल्या गुटगुटीत चणीच्या . चांगलंच वजन होत दोघींचं . दोघेही लग्नाच्या उपवर तरुणी झाल्या. टिनाला आपल्या वाढलेल्या वजनाचा न्यूनगंड होता . आणि अर्थातच याचा नकारात्मक परिणाम तिचा व्यक्तिमत्वावर होत असे . बघायला आलेल्या पाहुण्यांचा अशा लाजऱ्या , बुजऱ्या , निराश , हताश टिनाला बघून नकारच यायचा . त्याविरुद्ध मीना , एकदम बिनधास्त . माझं वजन हे फक्त वजनकाट्यावरील नंबर आहे असं ती म्हणायची . वाढलेल्या वजनाचा बाऊ तिने कधीच केला नाही , उलट आहारातून , व्यायामातून ती स्वतःला तरतरीत आणि चपळ ठेवायची . एकूणच शारीरिक आणि मानसिक पातळीवर चुणचुणीत चवळीच्या शेंगेसारख्या मुलीला पाठी पाडेल अशी ऍक्टिव्ह असायची . अर्थातच तिचा हा आत्मविश्वास तिच्या बोलण्यातून , देहबोलीतून सहज झळकायचा . त्यामुळे पहिल्यांदाच भेटलेल्या जयवंतला ती खूप आवडली आणि मीना - जयवंतचे लग्न अगदी थाटात पार पडले .

मैत्रिणींनो वाढलेले वजन कमी करणे जसे महत्वाचे असते , तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्वाचे असते आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळगता त्याची स्वीकृती करणे . कारण मुळातच स्वीकृती असेल तर प्रत्यक्ष कृतीतून , आकृती नक्कीच बदलता येते.

डॉ स्नेहल अवधूत सुखटणकर

  20th January, 2021