Apeksha ki Atishoyokti

अपेक्षा कि अतिशोयोक्ति !!!

सप्तपदी विवाह संस्था गेली 6 वर्षे वधू-वरांना त्यांचा मनपसंद साथीदार मिळवून देण्याच्या कार्यात आहे. त्याच अनुशंगाने बरेच काही मुलींच्या आई-वडिलांकडून एेकले, बरेच काही मुलांच्या आई-वडिलांकडून एेकले, त्यांचे बोलण्याचे विषय, अपेक्षा, तक्रार, आपल्या पाल्याच्या भविष्याची तळमळ हे जरी लक्षात येत असले तरी लग्नासारख्या अतिसंवेदनशील तथा आयुष्यभर पेलवून नेणार्या संस्काराला नक्की कोणती दिशा मिळतिये याचा विचारच न केलेला बरा !!! 

वाढत्या ढोबळ अपेक्षा, नको तिकडे डोकावणारा स्वाभिमान, आत्मविश्वासाची कमतरता ही मुख्य कारणे विवाह जमण्याच्या कार्यातील अडथळे आहेत, जेव्हा आपण स्वतःला या आधुनिक समाजाचा पुढारलेला भाग मानण्यात अभिमान बाळगतो, जिथे मुलगा मुलगी समान दर्जा सर्वार्थाने देण्याचा प्रयत्न करतो, शिक्षण, क्रिडा, संगीत व्यक्तिगत स्वातंत्र्य याच्या मोठ्या गोष्टी करतो, माझी मुलगी मुलाइतकिच सक्षम, स्वतंत्र आणि दृढनिश्चयी आहे असे म्हणतो तिकडे मुलाचे उत्पन्न मुलीपेक्षा जास्तच हवे, अवघ्या वयाच्या 30शित त्याच्याकडे पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात स्वतःचा फ्लट, गाडी असलीच पाहिजे, तेही कोणत्याही, कर्जाशिवाय !!!! हा अट्टाहास कशासाठी?? 

स्वतःच्या मनाशी थोडा विचार पालकांनीही करायला हवा! तुम्ही तुमच्या 30च्या आत तरी हे सर्व मिळवले होते का? किंवा हे सर्व नाही म्हणून तुमचे लग्न झाले नाही का? किंवा तुमचा संसार झाला नाही का? करताय ना तुम्ही सुखी संसार इतक्या वर्षापासून !!! पेलवलाय ना तुम्ही संसाराचा गाडा ! मग आपल्या मुलीच्या बाबतीत इतका अट्टाहास का? तुमच्या मुलीवर, तुम्ही दिलेल्या संस्कारावर, तिने घेतलेल्या शिक्षणावर, तिच्यातल्या धडाडीवर आपला विश्वास नाही आहे का? जेणेकरुन तिच्यासाठी पहात असणाच्या वरांकडून आपल्या डोंगराएवढ्या अपेक्षा आहेत !!!

गेली 6 वर्ष जे चित्र मी विवाह संस्येच्या आणि समुपदेशनाच्या माध्यमातून पहाते ते भयानक आहे.Opportunities आणी career चा आजकल जो बोलबाला चालवला आहे, तो का फक्त आपल्याला शहरातच मिळणार आहे ? तालुक्याच्या / गावाच्या ठिकाणीही आपण अनेक संधी निर्माण करु शकतो, फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाची. पण याचा विचार पालकां पेक्षा त्यांच्या उपवर मुलींना करावयास हवा! एक कळकळीची विनंती मला पुनःपन्हा मुलींना करावयाची आहे. ‘कृपया लग्न करताना मुलाचा बँकबलन्स, घर-पैसा, जमीन जुमला जसा पहाता तसाच त्याच character, त्याच्या मनगटातील शक्ती, त्याची वैचारिक क्षमता याचाही विचार करावा. 

पण यासगळ्याचा जर सखोल विचार केला तर यात काय फक्त मुलिंचीच किंवा त्यांच्या पालकांचीच चूक आहे ? 

नाही, याला कुठेतरी आपली समाज मानसिकताच कारणीभूत आहे, असं माझ प्रांजल मत आहे. एक असा काळ होता जेव्हा समाजाला बायको हवी होती, सुन हवी होती पण मुलगी जन्माला आलेली नको होती, त्याचाच दुरगामी परिणाम आज आपण भोगत आहोत, आज मुलांच्या आणि मुलींच्या प्रमाणात तफावत वाढलेली आहे, मग साहजिकच मुलींना आज जास्त choices आहेत, पूर्वी अशी म्हण होती कि मुलगी उपवर झाली कि तिच्या वडिलांना ‘वहाणा झिजवाव्या लागतात तिच्यासाठी योग्य वर शोधण्यासाठी’! पण आता काळ बदलेला आहे आज हीच वहाणा झिजवायची वेळ मुलांच्या आईवडिलांवर आलेली आहे.

मुलांच्या बाजूनेही अपेक्षा काही कमी नाहीयेत, जेव्हा 30शी च्या आतला मुलगा असतो, अपेक्षा खालीलप्रमाणे असतात:-

1. मुलगी देखणी हवी, शिकलेली हवी

2. नोकरी करणारीच हवी, माडर्न हवी

3. आमच्या पोटशाखेतीलच हवी

4. सगोत्र नको, कुंडली जुळलीच पाहिजे

5. मुलगा नोकरिनिमित्त जिकडे shift होईल, तिकडे जाण्याची तिची तयारी हवी

6. स्वयंपाक तिला यायला हवा, देवाच तिन केल पाहिजे.

अमुक हव, आणि तमुक हव !!!

मुलगा 35 शीला आला कि अपेक्षा असतात:-

1. मुलगी साधारण ग्रॅजुएट हवी

2. सुंदरच हवी अस नाही, घर सांभाळून रहाणारी असली तरी चालेल.

3. नोकरी नाही केली तरी चालेल

4. आम्हाला कुंडली आजिबात बघायची नाहिये. 

5. कोणतीही पोटशाखा चालेल. 

जेव्हा मुलगा 40 शी च्या उंबरठ्यावर येतो:-

1. आम्हाला 10, 12 वी झालेली मुलगी चालेल. 

2. गरीब घरातील चालेल. आम्ही लग्न करुन घेऊ, आम्हाला फक्त नारळ मुलगीचीच अपेक्षा आहे. घर सांभाळून राहिली म्हणजे झाल. 

3. सगोत्रही चालेल.

4. आंतरजातीयही चालेल !

अरे !!! कुठे जातोय आपण ? यावर नको का विचार व्हायला? 

कुठलीच व्यक्ती परफेक्ट नसते, लग्नाच्या जोड्या तर कधीच नाही, किंबहूना त्या नसाव्यातही नाही तर मजा कसली?? त्याने चिडायच तिने समजवयाच, तिने रुसायच त्याने हसवायंच, एकमेकाच्या साथीने आयुष्यभर प्रेमाचा पारिजातक फुलवत रहायंच अगदी शेवटच्या श्वासापर्यंत यालाच तर लग्न म्हणतात.

त्यामुळे आपण सर्वानीच जरा आपले डोळे उघडे सोडून आपापसातील अंतर कमी करण्याचा प्रयल करु, उपवर मुलामुलींना रेडिमेड सगळ हातात देण्यापेक्षा त्यांना एकमेकांच्या सहाय्याने आयुष्यात उभ रहाण्यासाठी प्रोत्साहन देऊ, तरच त्यांना आपल्या पुर्वापार चालत आलेल्या लग्न पध्दतींच महत्व कळेल आणि एका सक्षम, आनंदी समाजाची पुनःरचना होऊ शकेल. 

डॉ.स्नेहल अवधूत सुखटणकर

  20th January, 2019

Leave a Comment