Arranged Marriage

लग्न हा एक अत्यंत पवित्र सोहळा आहे. बदलत्या काळानुसार त्याचे रुपही बदलत आहे. प्रेमविवाह वाढले आहेत. पण कुठेतरी कुटुंबांनी ठरवून केलेल्या विवाहांचे महत्व आजही बर्यापैकी दाद देण्यासारखे आहे.

ठरवून केलेल्या लग्नात दोघांचे आई-वडिल आपापल्या मुला-मुलींसाठी अनुरुप जोडीदार शोधतात. ही अनुरुपता रूप, शिक्षण, पगार, रहाणिमान, घरातील संस्कृती, घरातील वातावरण या बाबतीत बघीतली जाते. ती अनुरुपता दोघांचं एकमेकांशी फार परिचित नसणं, पूर्ण परिचय होण्यासाठी लागणारा अवधी आणि त्याकाळात एकमेकांना सांभाळून घेण, एकमेकांचा आदर करणं, मतांचा आदर राखणं, यात काही कालावधी जाण आणि या काळात आणि पुढही घरातल्या दोघांच्या पालकांनी दोघांना सांभाळून घेणं, पाठिंबा देणं, आधार देणं, वेळ प्रसंगी समजूतीच्या चार गोष्टी सांगणं, कान उघडणी करणं सगळ टप्प्याटप्प्याने घडत जात. आणि यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली जाते ती दोघांच्या पालकांकडून. दोघांना समंजस्याने वागण्याची शिकवणूक देऊन. आणि इथं संसारात समंजस्याचं काय महत्व आहे ते अधोरेखित होत.

लग्न म्हणजे नुसतीच मजा नसून एकमेकांवरील प्रेमासोबत एकमेकांसाठी त्याग करणंही तितकंच महत्वाचं आहे. हे समंजस्यानेच समजतं. त्याग मग तो आवडी-निवडीच्या सवयींचा, वेळेचा, मतांचा, विचारांचा, पैशांचा, वेळ प्रसंगी मित्र वर्तुळाचा, अहंकाराचा, मी पणाचा आणि आणीबाणीच्या प्रसंगी सुध्दा हे सगळ समजावून घेण्यासाठी समंजस्याची नितांत गरज असते.

मी ह्याच्यासाठी घरदार सोडून आले, यानं माझ एेकल पाहिजे असा दुराग्रह ठेवण किंवा काय मला एकट्यालाच गरज  नव्हती तिलाही गरज होतीच माझी म्हणूनच आलीये, काय उपकार नाही केले अशी भावना ठेवणं हे संसार यशस्वी होण्याला घातक ठरतं, त्याएेवजी ही तिच्या आई-बाबांना सोडून इकडे आलीये, तिला तीच्या आई-बाबांची आठवण येऊन ती दुःखी होऊ नये असा प्रयत्न मी केला पाहिजे असा विचार किंवा मी आई-बाबांना सोडून आले तर मला दुःख होऊ नये म्हणून हा धडपडतोय मग त्याचं मन मला राखलं पाहिजे हा विचार समंजस्याचा विचार असतो. आणि ठरवून केलेल्या विवाह मध्ये असा विचार जास्त चांगल्या प्रकारे केला जातो, कारण तसा विचार करण्यासाठी घरातील वडिलधारी मदत करतात. पाठीशी रहातात. एकमेकांचा पूर्ण परिचय होण्यासाठी लागणार्या कालावधीत हा समंजस्याचा भाग फार महत्वाचा ठरतो.

संसार रूपी रथाची स्त्री-पुरुष ही दोन चाके असतात असं म्हणतात पण त्या रथाला प्रेम आणि त्याग हे दोन अश्वही असतात आणि त्या अश्वांवर अंकुश ठेवण्यासाठी जो चाबूक असतो ना त्याचं नाव समंजस्य. हे अश्व नीट चालावेत म्हणून हा समंजस्याचा चाबूक वारंवार उगारावा लागतो आणि वेळप्रसंगी फटकेही खावे लागतात. तरच संसाराचा रथ सुरळीत चालतो.

डॉ.स्नेहल अवधूत सुखटणकर

  26th February, 2019