Article 2 in Maharashtra times By Dr Snehal Sukhatankar

"अपेक्षांचे खूळ -सुख , दुःखाचे मूळ "

        "लग्नाच्या गाठी ह्या साक्षात ब्रह्मदेवाने स्वर्गात बांधलेल्या असतात. त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करायचे, योग असेल तेव्हाच लग्न जमणार " असं आपल्याकडे म्हंटल जात. आणि लग्न उशिरा ठरण्याचे खापर हे सोयीस्कररीत्या त्या ब्रह्मदेवावर टाकलं जात.

      एकदा सकाळी सकाळी गीताची आई ऑफिस मध्ये आली. नुकतीच इंजिनियर झालेली २४ वर्षाची गीता पुण्यात एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला लागलेली. सुरुवातच असल्याने पॅकेजही जेमतेम होते. पण कंपनी चांगली असल्याने पुढे प्रगती होणारच या  विचाराखातीर तिच्या  आई - वडिलांनी आता तिच्यासाठी वर संशोधन चालू केलं . गीता दिसायला तशी चार - चौघीत उठून दिसेल अशी होती. जेव्हा मी तिच्या आईला त्यांच्या स्थळाबद्दलच्या अपेक्षा विचारल्या तेव्हा त्या म्हणाल्या " फार काही अपेक्षा नाहीत हो, फक्त मुलगा इंजिनियर हवा , पुण्यातच नोकरीला हवा, त्याच पॅकेज किमान १० लाखावर असावं, पुण्यात स्वतःच स्वतंत्र घर तर हवंच हवं, शक्यतो तेही कर्ज मुक्त असावं नाहीतर आमच्या मुलीला लग्नानंतर कर्जाच्या हफ्त्यांसाठी तडजोड करावी लागेल, शक्यतो मुलाचे आई - वडील गावाकडे असावेत कारण नोकरी करून सासू - सासऱ्याचं करणं  आमच्या मुलीला झेपणार नाही, गावाकडे शेती - घर असल्यास अति उत्तम!  आणि हो सर्वात महत्वाचे वयाचे अंतर ० ते २ वर्षांचेच असले पाहिजे म्हणजे जेनेरेशन गॅपमुळे मतभिन्नता येणार नाही दोघात . एवढ्याच माफक अपेक्षा आहेत आमच्या " असं म्हणून केव्हाचा  धरून ठेवलेला श्वास एकदाचा त्यांनी सोडला.

          त्यांच्या माफक अपेक्षा ऐकून माझ्या गळ्याला कोरड पडली , म्हणून समोरच्या पेल्यातील पाण्याचा घुटुक घेतला आणि बोलायला सुरुवात केली. काही  प्रश्न मी त्यांना विचारले, "जेव्हा तुमचे लग्न झाले तेव्हा वरील सर्व अटी तुम्ही गीताच्या बाबांनाहि  घातल्या होत्या का? आणि त्यांनी त्या पूर्ण केल्या होत्या का ? त्यावर अगदी मिश्कीलपणे त्या म्हणाल्या "छे हो ! आमच्यावेळी हे सगळं कुठे ? आमच्या आई - वडिलांनीचं लग्न ठरवलं , त्यावेळी त्यानी फक्त मुलगा निर्व्यसनी आहे ना , तो ,त्याचे कुटुंब सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत ना  आणि मुख्य म्हणजे मुलाचा पगार भलेही कमी असेल पण नोकरी चांगली आहे ना , जेणेकरून संसारात जीवनावश्यक गोष्टींची कधी  कमी पडणार नाही हे पाहिले जायचे. शक्यतो मुलाला सरकारी नोकरी हवी हि एकचं काय ती निवडक अपेक्षा असायची"  मग पुढचे मनातील प्रश्नही विचारूनच टाकले " गीताचे बाबा आणि तुमच्यात किती वयाचं अंतर आहे? आणि  मग पुण्यात जे आपलं घर आहे ते वडिलोपार्जित आहे का ?" त्यावर पटकन त्या म्हणाल्या " नाही हो . पुण्यातलं आमचं घर हे केवळ आम्ही नवरा -बायकोनी आमच्या स्वकष्टाने उभं केलंय, कवडी - कवडी साठवत आम्ही आमचा स्वप्नातला संसार सजवला , फुलवला. आणि हे सगळं करत असताना आमचं उद्दिष्ट्य एकच असल्याने, आमच्यात वयाचं अंतर १० वर्षाचं असलं तरीही असा काही खूप फरक आम्हाला पडला नाही. "

       बोलणे संपले आणि काही सेकंद गीताच्या आई स्तब्ध राहिल्या. कदाचित त्यांना काही तरी जाणवले. त्या म्हणाल्या "मला कळत हो सगळं, पण आता काळ बदलेला आहे, त्यामुळे आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा आर्थिक त्रास पुढे होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी नाही का ?". अशी सारवासारव करीत त्या निघून गेल्या.

        अनेक वधू - वरांचा , त्यांच्या पालकांचा हाच समज आहे,  आर्थिक दृष्ट्या सबळ असणारे स्थळ किंवा अति श्रीमंत स्थळ  म्हणजे साजेशीर स्थळ. आणि म्हणूनच आज जोडीदाराप्रती अपेक्षा विचारल्यास सुरुवातच होते ती पॅकेजपासून. पॅकेज , स्वतःच घर , गाडी हे सर्व जम्याचे असल्यास पुढचे बोलणे  नाही तर अनेक वर पक्षांना, वधू पक्षाकरवी फोनवरच नकार पचवावे लागताहेत.

       एक काळ होता जेव्हा योग्य स्थळाची निवड हि  घरातील सर्व मंडळी मिळून करायचे. आई , वडील , काका , मामा , आत्या , मावशी , आजी , आजोबा प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून वधू - वरांची परीक्षा घेत असत , पडताळत असत आणि मगच काय तो निर्णय घेत. त्यातच मुख्यत्वाने मुलींची शिक्षण जेमतेम असल्याने त्या बऱ्यापैकी नवऱ्यावर अवलंबून असल्यामुळे साहजिकच मुलीचे  आई - वडील  तिच्यासाठी योग्य स्थळ हे शक्यतो सर्व दृष्टीने आपल्यापेक्षा वरचढ  किंवा किमान तोडीचे बघायचे.

         बदलत्या काळानुसार अनेक गोष्टीत बदल झाले. शिक्षणाने प्रचंड जागृकता निर्माण केली. बऱ्यापैकी आज  मुलांइतक्याच मुलीही शिकून स्वावलंबी झाल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत आणि हि खरंच एक अभिनास्पद गोष्ट आहे. आज अशा मुलींचे पालकही आपल्या मुलीच्या कर्तृत्वाचे पाढे खूप कौतुकाने  सांगताना दिसतात. पण दुर्दैवाने जेव्हा प्रश्न येतो वर संशोधनाचा, तेव्हा मात्र अनेक पालकांची पूर्व मानसिकता अजूनही बदलेली दिसत नाही. आणि म्हणूनच आर्थिक सुरक्षा आणि स्वातंत्र्य  (financial security अँड freedom  ) च्या नावावर आज मुलीचं कितीही पॅकेज असलं तरीही तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं पॅकेज हे तिच्यापेक्षा जास्तीच हवं अशी अपेक्षा असते. जेव्हा अशा बक्कळ पॅकेजची स्थळे येतात तेव्हा त्या आकड्यांच्या गोंधळात  वधू पक्ष असा काही अडकतो कि मुलीचे सोडा , तिच्या आई - वडिलांच्या डोळ्यावरहि  नकळत पडदा पडतो. आणि साहजिकच तो मुलगा आवडतो आणि सोयीस्कररीत्या अनेक महत्वाच्या बाबी जसं कि मुलाचे चारित्र्य , त्याच्या सवयी , काही व्यसन , त्याचा  मित्र-परिवार , घराण्याची माहिती पडताळणे कुठेतरी राहूनच जाते.

   साधी गोष्ट आहे लग्नानंतर मोठ्या पॅकजेचा मुलगा हा थोडा वर्चस्व गाजवणारच, त्याचे निर्णय हे घरात बऱ्यापैकी मान्य करावे लागणार, त्याला कदाचित कामातून प्रत्येकवेळी तुम्हाला बाहेर फिरायला किंवा सुट्टीला घेऊन जाणे जमणार नाही मग अशा वेळी मुलीने लग्नानंतर  या मुद्द्यांवरून तक्रार करणे कितपत योग्य आहे?

         अपेक्षांच्या शर्यतीत वर पक्षही काही मागे नाही. मुलाला हवी असते दिसायला सुंदर बायको , जी त्याच्या मित्र - परिवारात एकदम उठून दिसेल, चांगली शिकलेली , महत्वाकांक्षी, नोकरी करणारी म्हणजे आर्थिक रेटा पेलवण्यास मदत करणारी,  अशी मुलगी. आई पहात असते येणाऱ्या सुनेने आपल्यासारखचं आलेल्या - गेलेल्यांचे अगदी हसत -खेळत केलं पाहिजे, सगळ्या रीती - भाती व्यवस्थित जपल्या पाहिजेत, गरम - गरम करून जेवायला घातलं पाहिजे , वडील पहात असतात , मुलगीला किमान एक भाऊ तरी आहे ना ? म्हणजे उद्या सासू - सासऱ्यांची जबाबदारी आपल्या मुलावर नको . आता तुम्हीच मला सांगा , अशा परस्पर विरोधी अपेक्षा असल्यास , लग्नाची वय वाढणार नाहीत तर काय होणार ?

           नोकरी करणारी, मोठ्या हुद्द्यावरची , महत्वकांक्षी मुलगी हवी असेल तर साहजिक आहे तिला तिच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट्स असणार आहेत , अशावेळी तिला प्रत्येक वेळी तुमच्या साठी गरम -गरम जेवण बनवणे जमणार नाही ,मग तिच्याबरोबरीने स्वयंपाक असेल किंवा इतर घरातील कामे नवऱ्यानेही करण्याची सवय अंगी बाणवली  पाहिजे  नाहीतर मग स्वयंपाकीणीच्या हातचं किंवा हॉटेलचे खाणे मान्य केले पाहिजे. मॉडर्न मुलगी हवी असल्यास कदाचित तिला तुमच्या रीती - भाती सांभाळणे नाही आवडणार मग त्याचीही मानसिक तयारी वर पक्षाने लग्नाआधीच करून ठेवायला हवी.

     आपले विचार , आपल्या अपेक्षा- आपली वृत्ती दर्शवतात. म्हणूनच लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराप्रती असणाऱ्या अपेक्षाच आपल्या भावी वैवाहिक जीवनाची रूपरेखा ठरवत असतात. इमारतीचा पायाच जर मुळात भुसभुशीत असेल तर पुढे जाऊन ती इमारत कोसणारच यात शंका नाही.  म्हणूनच  गेल्या काही वर्षात  घटस्फोटाचे प्रमाण कित्येक पटीने वाढलेले दिसत आहे.

               वाढत्या वयाबरोबर एकमेकांबरोबर जुळवून घेणे आणि सहजीवनाचा एकूणच पुढचा प्रवास खडतर बनत जातो. मुख्यत्वाने उपवर तरुणींना मी सांगू इच्छिते, लग्नाबद्दलची तुमची संकल्पना पारदर्शक असणे अत्यंत गरजेचे आहे . पुढे आपल्याला  मुलं हवं कि नको याची स्पष्टता असणे महत्वाचे . मुलं नकोच असल्यास , प्रश्नच नाही, तुमचे आयुष्य तुमच्या परीने जगण्यास तुम्ही मोकळेच. पण  मुलं हवे असल्यास मात्र लग्न योग्य वेळेत होणे , आणि पर्यायाने गर्भधारणा योग्य वयात होणे हे तुमच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असते. आजच्या पिढीची एकूणच जीवनशैली , खाण्या - पिण्याच्या सवयी पाहिल्यास वंध्यत्व (infertility ) १३% वाढले  आहे . त्याच बरोबर Special Care childrenजसे कि autism , cerebral palsy ,down's  syndrome  चे प्रमाणही ११% वर गेलेले आहे. आणि आपल्याला माहितीच आहे जेव्हा असे एखादे मुलं जन्माला येते , तेव्हा त्याची सर्वात जास्ती झळ हि त्या आईलाच आयुष्यभर सोसावी लागते.

     त्यामुळे सांगण्याचा उद्देश हाच आहे कि , लग्नाच्या दृष्टीने    आपल्या जोडीदाराप्रती अपेक्षा असणे अजिबात चुकीचे  नाही, पण त्या अपेक्षांची अतिशोयोक्ती होणार नाही याची खबरदारी घेतल्यास लग्न तर चुटकीसरशी जमतील आणि सुखाचे संसार फुलतील यात शंका नाही , बाकी आशिर्वाद द्यायला साक्षात ब्रह्मदेव आहेतच !

डॉ . स्नेहल अवधूत सुखटणकर

  4th February, 2023

Leave a Comment