Article 3 in Maharashtra Times by Dr Snehal Sukhatankar

समुपदेशनाच्या माध्यमातून एकदा सुलभा काकूंना भेटायचा योग आला. ६०च्या आसपासच्या  सुलभा काकू निवृत्त शिक्षिका होत्या आणि दोन वर्षापुर्वीच त्यांच्या मुलाचं लग्न झालं होत. नव्याचे नऊ दिवस आनंदात गेले पण नंतर मात्र सुलभा काकुंचे, त्यांच्या सुने बरोबर काही पटेनासे  झाले . हळूहळू  त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले कि, त्यांना एकमेकींच तोंड देखील पाहायचा वीट आला. जेव्हा थोडं खोलात जाऊन  या सगळ्याची माहिती घेतली तेव्हा कळालं हा वाद सासू - सुनेचा नाहीच आहे मुळात.

       त्याच काय झालं होतं, रितेश हा सुलभा काकूंचा एकुलता एक मुलगा. त्याला त्यांनी अत्यंत लाडाने वाढवले होते. त्याच्या  कपड्यानां इस्त्री पासून ते जेवणाच्या ताटापर्यंत सगळ्या गोष्टी त्या त्याच्या हातात द्यायच्या. घराच्या पुरुषांनी घरातील कामे करणे योग्य नाही, ही बायकांची कामे बायकांनीच करायला हवी असे त्यांचे ठाम मत होते. पण त्यांची सून, चांगल्या कंपनीत , चांगल्या हुद्दयावर नोकरीला होती . तिला स्वयंपाक आणि घरातील इतर कामे करून ऑफिस  आणि तेथील कामाचे ताण झेपेना झाले. खूप दगदग होत होती आणि त्यामुळे अर्थातच तिची चिडचिड होऊ लागली. तिने हि चिडचिड रितेशला बोलून दाखवली आणि दोघांनी मिळून घरातील कामे जसं कि स्वयंपाक असेल , कपडे सुकवणे , भांडी लावणे , भाजी-पाला आणणे यासारखी दैनंदिन कामे एकमेकात वाटून घेऊन एकत्र  करायची ठरवली , म्हणजे वेळही कमी जाईल आणि ऑफिसचे मॅनेजमेंटहि बऱ्यापैकी व्यवस्थित होईल , त्याप्रमाणे रोज रितेश बायकोला घरकामात  मदत करू लागला.

          रितेशचे  हे कष्ट त्याच्या आईला मात्र रुचेनासे  झाले . त्या म्हणाल्या "मी देखील  नोकरी केली आहे पण घरचं सगळं सांभाळून . मी नाही कधी माझ्या नवऱ्याला किंवा मुलाला कामाला लावलं . या आजकालच्या मुली , ह्यांची थेरच वेगळी, मला नाही पटत हे सगळं." आणि नेमका हाच एक मुद्दा सासू - सुनेच्या महाभारतास कारणीभूत ठरत होता.

          अशा अनेक सुलभा काकू आपल्याला आपल्या आसपास दिसतील. ज्यांना घरातील पुरुषाने घर कामे केलेली पचवणे थोडे अवघड जाते . पण काळ कोणासाठी थांबत नसतो . बदलत्या काळाप्रमाणे बदलणे , आधुनिक विचारधारा अवलंबणे गरजेचे होते . जेव्हा आधुनिकतेचा विषय येतो , तेव्हा बऱ्यापैकी आपण भारतीय पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण करण्यात  धन्यता मानतो . पण खरंच त्यांच्याकडून काही मोजक्या चांगल्या गोष्टीही आपल्याला घेण्यासारख्या आहेत , त्यापैकीच एक "हाऊस हसबंड "नावाची संकल्पना. ज्यामध्ये बायको तिच्या नोकरीत किंवा उद्योगधंद्यात खूपच व्यस्त असेल आणि ती नवऱ्यापेक्षा जास्त कमावत असेल तर नवरा घराची संपूर्ण जबाबदारी घेतो . मग त्यात स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता , घरात काय हवं नको ते पाहणे , इतकेच काय मुलांचे संगोपनही बऱ्यापैकी पुरुषांकरवीच केले जाते.

          दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये अजूनही या संकल्पनेला तितक्या आदराने स्वीकारलं जात नाही.  पूर्वापारपासून आपल्याकडे "हाऊस वाइफ "किंवा "गृहिणी हि संकल्पना अस्तित्वात आहे . कारण त्यावेळी संसारातील स्त्री - पुरुषांच्या भूमिका खूपच ठळक होत्या . आणि त्या साच्यातच कामाची विभागणी व्हायची. पण गेल्या काही वर्षात त्या भूमिका पुसट होताना दिसताहेत. आणि त्यामुळेच कामाची विभागणीही प्रत्येक कुटुंबात वेगवेगळी असू शकते .

               संसार करताना  कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक व्यवस्थापन  दोहोंची सांगड घालावी लागते.    जेव्हा नवरा जास्त कमावत असतो तेव्हा बायकोने साहजिकच कौटुंबिक जबाबदारी सांभाळणे अपेक्षित असते . पण जर बायकोच उत्पन्न जास्त असेल तर नवऱ्यानेही घरासाठी थोडी तडजोड करायला काहीच हरकत नाही . लग्नानंतर नवरा - बायको हे एकाच रथाची दोन चाके असतात. ज्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांच्या साहाय्याने , एकमेकांच्या बरोबरीने पुढे जाणे  सुखी सहजीवनाच्या दृष्टीने हिताचे असते . प्रामुख्याने  कोरोनाच्या काळात याची प्रचिती बऱ्याच कुटुंबाना आली .

           सुदैवाने अलिकडील काळात आपल्याकडील काही सुजाण जोडपी या संकल्पनेचा अवलंब करताना दिसतात. कारण कुटुंबे विभक्त आहेत . लग्नानंतर जेव्हा एखादा मुलं होत , तेव्हा त्या बाळाचं संगोपन, त्याचे पालकत्व हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो . आई- वडील दोघेही त्यांच्या कामात व्यस्त असतील तर मग मुलाला पाळण्याघरात ठेवलं जात पण शेवटी घराच्या माणसांची सर बाहेरचे नाही भरून काढू शकत. शिवाय आपल्या घरातील संस्कार , प्रेम, माया यासाठी आपलं माणूसच लागत. अशा वेळी अनेक पुरुषही मुलांच्या संगोपनामध्ये प्रामुख्याने लक्ष देताना दिसतात.

        मी सुलभा काकूंना समजावण्याचा प्रयत्न केला . पूर्वीच्या काळी कामाच्या पद्धती , राहणीमान , ऑफिसची काम ही आजच्या काळापेक्षा खूपच वेगळी होती . किंबहुना बऱ्यापैकी सोप्पी होती . आजच्या पिढीला ऑफिसला जाणे म्हणजे तासंतास ट्रॅफिक मग ऑफिसमध्ये टार्गेट्स, प्रोजेक्ट्स , मिटींग्स, परफॉर्मन्सचा दबाव , नोकरीची अनिश्चितता यासारख्या अनेक आव्हानाना समोर जावं लागत . शिवाय राहणीमान आणि एकूणच महागाई शी दोन हात करायचे म्हणजे नवरा -बायको दोघांनीही कमावणे आवश्यक आहे . उच्चशिक्षित असल्यामुळे मुलींच्या महत्वाकांक्षा, करियरची स्वप्नेही उंचावलेली आहेत . त्यामुळे आजच्या मुलींसाठी घर काम हि प्राथमिकता नसून जीवनाचा एक भाग आहे .  बाहेरच्या जगात जेव्हा स्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते , पैसे मिळवते , तिथे घराच्या आत पुरुषानेही स्त्रीच्या बरोबरीने काम केलं तर बिघडलं कुठे?

         आपणच म्हणतो ना , कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. मग दैनंदिन घर कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा दुय्यम का? किंबहुना स्वयंपाक येणे, घरच्या चार गोष्टी माहिती असणे हे महत्वाचे जीवनकौशल्य आहे . आणि हे प्रत्येकाला यायलाच हवे . मग ती मुलगी असो किंवा मुलगा. कदाचित सुलभकाकूंना माझं म्हणणं पटलं असावं , एक छोटंसं स्मित हास्य देत त्या निघून गेल्या .

     आज आपल्या  समाजात काही मोजकी प्रगल्भ कुटुंबे आहेत , ज्यांनी स्री - पुरुषांच्या जबाबदारीला खऱ्या अर्थाने समानता दिली आहे. पण अजूनही अनेक कुटुंबात याची जाणीव होणे अपेक्षित आहे . शेवटी "हाऊस वाइफ " असो किंवा "हाऊस हसबंड", सुखी आणि आनंदी संसार होणे हेच तर सहजीवनाचे मूळ आहे .  यामुळे काळ  कितीही बदलला  तरी "एकमेकास साहाय्य करू , अवघे धरू सुपंथ " हि तुकारामाची वाणी किती खरी आहे याची पुन्हा एकदा प्रचिती येते. 

LInk : https://maharashtratimes.com/editorial/article/responsibility-of-house-belongs-husband-and-wife-necessary-to-support-each-other/articleshow/97661003.cms

  4th February, 2023

Leave a Comment