Article 1 in Maharashtra Times by Dr Snehal Sukhatankar

             "लग्न हे लग्न असतं - तुमचं आमचं सारखच  असत "असं सर्रास आपल्याकडे म्हंटले जाते. कारण “लग्न” नावाचं विद्यापीठ आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या संस्काराची व्याख्या जरी तीच असली तरी त्याच्या संकल्पना मात्र काळानुसार बदलताना दिसताहेत .

        आधीच्या काळी घरातील वडीलधारे जमायचे आणि लग्नाचं ठरवायचे , प्रत्यक्ष वधू - वरांची भेट हि लग्न मंडपातच व्हायची. आणि अर्थातच मोठ्यांच्या  पसंतीला मान देऊन हि जोडपी पुढे सुखाने संसार करायची. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींवर दोघे मिळून मात करायचे, घरातील थोरामोठ्यांची जबाबदारी असो किंवा मुलाबाळांचे संगोपन किंवा स्वतःच्या महत्वाकांक्षा असतील प्रत्येक गोष्टीत नवरा - बायकोचे उद्दीष्ट्य  हे एकमेकांना पूरक असायचे. पुरुषाने कुटुंबासाठी अर्थार्जन आणि स्त्रियांनी घर- चूल - मुलं सांभाळणे असे बऱ्यापैकी कुटुंबात दिसून यायचे. त्यामुळे कौटुंबिक वातावरण, मुलांवर होणारे संस्कार, त्यांची मानसिकता हि सर्वार्थाने भक्कम होती. नवरा - बायकोच्या भूमिका बऱ्यापैकी स्पष्ट असल्याने घरात खूप काही वादविवाद - ताणतणाव नसायचे . कधी  नवरा - बायको मध्ये काही वितुष्ट आलेच तर एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरातील वडीलधाऱ्यांच्या हस्तक्षेपाने हा गुंता सोडवला जायचा. त्यामुळे एकूणच काय  एकदाका लग्न झाले कि हि “साताजन्माची गाठ” असे वधू - वरांना पक्के होते. लग्नानंतर काडीमोड हि संकल्पना तर खूपच विरळ होती. 

             खरे पहाता पूर्वापारपासून आपल्या संस्कृतीने स्त्री शिक्षण, आणि तिचे सक्षमीकरण याचा नेहमीच आदर केलेला आहे. पण मधल्या काही वर्षात स्त्रियांवर झालेल्या आत्याचारांमुळे तिला तिच्या सुरक्षिततेसाठीच घरात राहणे भाग पडले.  जसजसा काळ बदलत गेला, बदलत्या काळानुरूप शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा अनेक क्रांती झाल्या. स्त्री शिक्षण, स्त्री स्वावलंबन याबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि हळूहळू पुन्हा एकदा स्त्रिया शिकू लागल्या. पण अनेक स्त्रियांना  सुशिक्षित असूनही कौटुंबिक जबाबदारीमुळे बाहेर जाऊन नोकरी करणे कधी जमलेच नाही. घराच्या जबाबदारीत  ती स्त्री अशी काही अडकली जायची कि तिला तिचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्वच राहिले नाही. आणि हळूहळू नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत एका गृहिणीकडे पाहण्याचा दृष्टीकोन दुय्यम होऊ लागला. आणि नेमके हेच मानसिक खच्चीकरण तिला सक्षम बनण्यास खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरले.

    २० व्या शतकात  तंत्रज्ञानाने अनेक  क्रांतिकारी बदल आपल्या समाजात घडवले. मानवाच्या महत्वकांक्षा वाढल्या. इंटरनेट मुळे जग जवळ आले. स्त्रियांना त्यांच्या हक्काची, त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रखरतेने जाणीव होऊ लागली. अनेक कुटुंबातील मानसिकता हळूहळू बदलायला लागली. मुली शिक्षणासाठी , नौकरीसाठी  घराबाहेर पडू लागल्या. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ लागल्या. त्यामुळे आपल्या घराच्या बाहेरील जगाची रीत त्यांना कळू लागली.आणि आज आपण पाहू शकतो स्त्रिया  सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.

                स्त्री ज्या झपाट्याने बदलली, ते बदल दुर्दैवाने आपल्या समाजाला पचवणे सुरुवातीला थोडेसे  अवघड गेले. याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवरही दिसून आला. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आता तारेवाची कसरत व्हायची. यातून संसारात थोडासा ताण निर्माण व्हायचा पण लहानपणापासून बिंबवले गेलेले संस्कार आणि वडीलधाऱ्यांचा धाक यामुळे नवरा - बायकोमध्ये एकमेकांना सांभाळून घेऊन संसार करण्याची मानसिकता टिकून राहिली.

           २१ व्या शतकात मात्र हे गणित बरंच बदललेलं दिसून येतंय. कुटुंबाची संकल्पना आणखी आकुंचित झाली . आता संसारात सासू - सासरे , आई - वडील याची भूमिका क्षुल्लक होऊ लागलीये. सोशिअल मीडिया इतका मजबूत आणि भारी झालाय कि नवरा - बायको मध्ये आता पुरेसा संवाद करण्यास विषयच राहिलेला नाही . लग्नानंतर एकत्र असूनही दोघेही आपापल्या वाटेने आपली स्वप्न पूर्ण करण्याकडे, आपले आयुष्य आपल्या तत्वांवर जगण्याकडे वाटचाल करताहेत. स्वावलंबनाची संकल्पना आता इतकी विकोपाला गेलीये कि नवरा - बायकोमध्ये त्यापलीकडेही मानसिक आणि भावनिक पातळीवर काही नातं असतं याचा या पिढीला कुठेतरी विसर पडत चाललेला आहे. घरात अशांतता, वादविवाद, दोषारोपने वाढताहेत. आणि त्याचा थेट दुष्परिणाम हा त्या कुटुंबातील चिमुकल्यांवर होतोय. आई - वडिलांची होणारी सततची भांडणे पाहून मुले हिरमुसतात आणि आपला एकटेपणा घालवण्यासाठी परत इंटरनेट,मोबाइल आहेतच. कदाचित यामुळेच लहान मुलांमध्येही डिप्रेशनच्या घटना खूपच वाढताहेत. घटस्फोट घेणे हे आता पूर्वी इतके गहन राहिलेले नाही. अनेकांचे नव्याने सुरु झालेले संसार केवळ ३ महिन्यात , ६ महिन्यात संपुष्ठात येताना दिसताहेत. जोडप्याच्या पर्सनल गोष्टींमध्ये  हस्तक्षेप करणे हे आता घरातील मोठ्यांसाठीही कालबाह्य झालेलं आहे. किंबहुना अशा प्रकारचा हस्तक्षेप खपवूनही घेतला जात नाही त्यामुळे वडीलधाऱ्यांची  भूमिका हि फक्त बघ्याचीच होऊन बसलीये.

        हळूहळू आपली कुटुंब व्यवस्था मोडकळीस येते कि काय असे वाटत असतानाच मध्ये कोरोनाचा लॉकडाउन झाला. जगासाठी शाप ठरलेला हा काळ आपल्या कुटुंब व्यवस्थेसाठी मात्र वरदानच ठरला असं मी म्हणेन. सर्वजण आपापल्या घरात बंद झाली,जीवाच्या भीतीने प्रत्येकजण स्वतःची , स्वतःच्या माणसांची काळजी घेऊ लागला, अनेकांचे जॉब्स गेले, आर्थिक अडचणी आल्या, अनेकांना शहरातून आपल्या घरी गावाकडे परतावे लागले, आणि यावेळी घरातील वडीलधाऱ्यांनी कित्येक महिने सांभाळून घेतले. अनेकांना work from home असल्याने घरातील कामे, जबाबदाऱ्या नवरा-बायकोनी वाटून  करण्याची सवय लागली, सोशिअल मीडिया कितीही वाढला तरीही आपल्याला आपलं स्वतःच असं एक माणूस हवंच असत, ज्याच्यापुढे आपण आपलं मन मोकळं करू शकतो याची जाणीव झाली. त्यामुळे कौटुंबिक जवळीकता, आई - वडिलांकरवी लहान मुलांना दिला जाणारा वेळ, आपल्या थोरामोठ्यांचे पाठबळ या सगळ्याचीच नव्याने ओळख या लॉकडाउनमुळे झाली. आणि पुन्हा एकदा विस्कळीत होतं चाललेले सहजीवन योग्य त्या दिशेने झेपावताना दिसतंय.

        सहजीवन हे सर्रास त्या दांपत्याचा एकत्र प्रवास असं म्हंटल जात. पण लग्नाने केवळ दोन जीवच नव्हे तर दोन कुटुंबे एकत्र येत असतात. या दोन कुटुंबांचा हा सहप्रवास असतो. ज्यामध्ये कालानुरूप बदल हे अपेक्षितच आहेत पण नात्यात जर एकमेकांबद्दल प्रेम , आपुलकी, आदर, नव्या बदलांना स्वीकारण्याची क्षमता, आणि थोडीशी तडजोड सर्वानीच केल्यास आपण आनंदी सहजीवन तर अनुभवूच पण यातून नकळत दिल्या जाणाऱ्या संस्कारानी आपल्या पुढच्या पिढीचे भविष्यही उज्वल करू यात शंकाच नाही.

             खरे पाहता सहजीवन हे त्या दांपत्याचा एकत्र प्रवास असं म्हंटल तरी त्याचे अनेक पैलू आहेत. बऱ्याचवेळा  अशी संकल्पना असते कि इंजिनिअरला - इंजिनिअर , डॉक्टरला - डॉक्टर, सरकारी कर्मचाऱ्याला - सरकारी कर्मचारी अशा जोड्याच  योग्य  असतात . पण खरे सहजीवन हे भौतिक अपेक्षांबरोबरच परस्पर वैचारिक आणि आत्मिक जुळवाजुळव यावर जास्त अवलंबून असते.  नवरा -बायकोच्या महत्वकांक्षा , त्यांच्या आनंदाच्या परिभाषा, आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, त्यांची वैचारिक क्षमता या बाबींवर सहजीवनाचा प्रवास ठरत असतो. संसारात  मतभेद होणे, दुमत होणे हे साहजिकच आहे कारण आज मुलं -मुली दोघेही स्वतंत्र आहेत . पण एकमेकांबद्दल प्रेम , आदर , नव्या बदलांना  स्वीकारण्याची क्षमता आणि आपल्या जोडीदाराखातीर थोडीशी तडजोड केल्यास मतभिन्नतेतही सुवर्णमध्य साधता येतो आणि त्यानेच एक प्रगल्भ नातं निर्माण होतं. सहजीवन जर सर्वार्थाने परिपक्व असेल तर  दोघेही बाहेरच्या जगात प्रगतीची शिखरे गाठणारच यात शंका नाही.

 

        खरे पाहता सहजीवन हे त्या दांपत्याचा एकत्र प्रवास असं म्हंटल तरी त्याचे अनेक पैलू आहेत. बऱ्याचवेळा  अशी संकल्पना असते कि इंजिनिअरला - इंजिनिअर , डॉक्टरला - डॉक्टर, सरकारी कर्मचाऱ्याला - सरकारी कर्मचारी अशा जोड्याच  योग्य  असतात . पण खरे सहजीवन हे भौतिक अपेक्षांबरोबरच परस्पर वैचारिक आणि आत्मिक जुळवाजुळव यावर जास्त अवलंबून असते.  नवरा -बायकोच्या महत्वकांक्षा , त्यांच्या आनंदाच्या परिभाषा, आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, त्यांची वैचारिक क्षमता या बाबींवर सहजीवनाचा प्रवास ठरत असतो. संसारात  मतभेद होणे, दुमत होणे हे साहजिकच आहे कारण आज मुलं -मुली दोघेही स्वतंत्र आहेत . पण एकमेकांबद्दल प्रेम , आदर , नव्या बदलांना  स्वीकारण्याची क्षमता आणि आपल्या जोडीदाराखातीर थोडीशी तडजोड केल्यास मतभिन्नतेतही सुवर्णमध्य साधता येतो आणि त्यानेच एक प्रगल्भ नातं निर्माण होतं. सहजीवन जर सर्वार्थाने परिपक्व असेल तर  दोघेही बाहेरच्या जगात प्रगतीची शिखरे गाठणारच यात शंका नाही.

  7th January, 2023

Leave a Comment