Article in smartnewsmarathi.com by Dr Snehal Sukhatankar - stree tuza pravas

स्त्री - तुझा प्रवास

           एक काळ होता जेव्हा मुलगी जन्माला आली कि तिच्या आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकायचा . अर्थात मुलगी म्हटलं कि अनेक नैसर्गिक , कौटुंबिक , सामाजिक बंधने अशा कित्येक बंधनात तिला नकळत जखडून ठेवले जायचे . आणि त्याकाळी हे सर्व मुली निमूटपणे मान्य करून आयुष्याला स्वीकारायच्या .

                काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलत गेल्या . पारतंत्र्याच्या जखडयातून सुटल्यानंतर हळूहळू समाजात स्त्रियांप्रती सवलती आणि हक्क दिले जाऊ लागले . मुली शिकू लागल्या . नोकरी करू लागल्या , पुरुषांच्या बरोबरीने संसारात हातभार लावू लागल्या . आत्मविश्वास वाढला , स्वावलंबन वाढलं त्याप्रमाणे त्यांचे विचारही पक्के होऊ लागले . स्वतःची मते , स्वतःचे निर्णय ठामपणे घेण्याची क्षमता मुलींच्यात यायला लागली . अर्थात त्यांच्या पालकांनीही या  नवीन बदलांना आनंदाने स्वीकारले . आपली मुलगी शिकली , स्वावलंबी झाली हि तिच्या आई - वडिलांसाठी प्रतिष्ठेची बाब झाली .

              स्वतःचे निर्णय निर्धास्तपणे घेणाऱ्या या मुली , जेव्हा वेळ येते लग्नासाठी जोडीदार निवडण्याची , तेव्हा मात्र या खूप गोधळलेल्या दिसतात . सिनेमातल्या रंजक कथानकाप्रमाणे वयात आलेल्या लग्नाळू मुली आपल्या स्वप्नातील राजकुमाराच्या शोधात असतात . संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात साहजिकच प्रत्येक जण आपल्या भावी जोडीदाराच्या कल्पना , त्याचे चित्र मनात रेखाटून ठेवलेले असतात . त्यात प्रामुख्याने रंग , रूप , देहयष्टी , नोकरी  उत्पन्न यांचा समावेश असतो .           

         आज मुली शिकलेल्या आहेत , स्वावलंबी आहेत . त्यामुळे त्यांच्या भावी जोडीदाराप्रती अपेक्षा असणे  साहजिक आहे . पण त्या अपेक्षांना ठाम ठेवून मिस्टर परफेक्टच्या  शोधात असतात . अनेक स्थळांना न भेटताच नकार दिला जातो . नकाराचं हे सत्र जेव्हा एका विशिष्ट वयाच्या मर्यादेत असत तो पर्यंत ठिक नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्वात जास्ती दुर्दैवाने त्या मुलीलाच भोगावे लागतात .

               अगदी थोडक्यात मुलीच्या लग्नाचे वय हे'समीकरण असं काही असत कि ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी टप्याटप्प्याने घडतात . म्हणजे बघा मुलीचे शिक्षण संपायला २४ वर्षे . मग १-२ वर्षे नोकरी करायची म्हणून २६- २७ वर्षे . मग नोकरीत बढती , पॅकेज वाढलं  मग तिच्या नोकरी , हुद्दा , पॅकेजला साजेशीर स्थळ हवं म्हणून अनेक चांगल्या स्थळांना नकार दिला जातो . त्यातून तिन्ही अपेक्षेत बसणार स्थळ आलंच तर मग वयाच अंतर , मेट्रोसिटीत स्वतःच घर , तेही कोणत्याही कर्जाशिवाय , शिवाय सासू - सासरे गावाकडे हवेत अशा अनेक अटीतटींवर अढळ राहून आलेल्या अनेक स्थळांना नकार दिला जातो . असे करत करत वय वाढते . मग वाढलेल्या वयाबरोबर शारीरिक बदलही नैसर्गिक असतात . त्यातल्यात्यात मुलींमध्ये हे नैसर्गिक बदल मुलांच्या तुलनेत लवकर दिसून येतात . मग जशा मुली मुलांच्या डोक्यावरचे कमी केस , त्यांचा वाढलेला पोटाचा घेर यासारख्या अनेक बाबतीत निवडक होतात  , तसेच अनेक मुलांकडून मुलींचा पोक्तपणा , लट्ठपणा  शिवाय स्त्रियांचं नैसर्गिक प्रजनन चक्र या बाबींचा विचार करून अनेक मुलींना नकार दिला जातो .  

               एका  सर्वेक्षणानुसार ४०% उपवर मुली या  ३५-५० वयोगटातील आहेत ४० शी नंतर सहसा स्त्रीच्या शरीरात हॉर्मोनल अदलाबदलीमुळे अनेक बदल व्हायला लागतात . अशा परिस्थितीमध्ये लग्न , गर्भधारणा , बाळंतपण आणि पुढे जाऊन त्या  बाळाचे व्यवस्थित संगोपन यासारख्या अति महत्वाच्या घटनांना सामोरे जाताना सर्वात जास्ती अडथळे सोसावे लागतात ते त्या स्त्रीलाच .

          त्यामळे मुलींसाठी शिक्षण , व्यक्तिस्वातंत्र्य , आर्थिक स्वावलंबन जस महत्वाचं आहे तसच महत्वाचं आहे तिच्या आयुष्याला स्थिरता देणारा संस्कार म्हणजेच लग्न . ते योग्य वयात , योग्य व्यक्तीबरोबर होणे महत्वाचे . योग्य व्यक्ती परखण्यासाठी आलेल्या स्थळांना भेटणे , त्यांच्याशी बोलणे , संवाद साधने महत्वाचे .                                                                              

               कधी  कधी भेटल्याने विचार बदलतात . मग समोरचे स्थळ आपल्या अपेक्षेत बसत नसतानाही त्या व्यक्तीबरोबर आपले संपूर्ण आयुष्य आपण आनंदाने घालवू शकतो याची तीव्रतेने जाणीव होते . म्हणून लग्नाच्या दृष्टीने फोन वर स्थळे नाकारण्यापेक्षा मुलींनी पुढाकार घेऊन उपवर तरुणांशी संवाद साधायला हवा . तुमचे प्राधान्यक्रम , तुमची करियर विषयीची तळमळ , तुमची ध्येये त्यांच्याबरोबर बोलायला हवीत . अगदी १००%तंतोतंत साजेशीर मिळणे विरळच . पण जर एखादा मुलगा तुम्हाला तुमचे करियर , तुमचे अस्तित्व फुलवण्यात प्रोत्साहन देत असेल आणि सगळ्यात महत्वाचं तो तुम्हाला एक माणूस म्हणून समजून घेणारा असेल तर त्याचे उत्त्पन्न काय , डिग्री काय थोडी तडजोड करायला काहीच हरकत नाही . कारण शेवटी संसारात जे काही असत ते नवरा - बायकोचच असत . जे काही कमवायचं असत , जे काही मिळवायच असत आणि जे काही साजरं करायचं असत ते दोघांनी मिळूनच . त्यामुळे पॅकेज थोडे इकडे - तिकडे झाल्यास चालेल पण प्रेम , आदर , समजूतदारपणा आणि एकमेकांना खंबीर पाठिंबा या गोष्टीत तडतोड मुळीच नको .  

         

                                     डॉ . स्नेहल अवधूत सुखटणकर

 

http://www.smartnewsmarathi.com/http-www-smartnewsmarathi-com-special-article/article-by-dr-snehal-sukhatankar/

  12th July, 2020

Leave a Comment