Dr Snehal Article Published in Tarun Bharat on 26th December 2019 - ugach marketing kashala

उगाच मार्केटिंग कशाला ?

                              मार्केटिंग तसं आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं क्षेत्र नै का ? .  एखाद्या वस्तूची किंवा सर्व्हिसची अर्थार्जनासाठी  विक्री करणे हा त्यामागचा हेतू ! त्यासाठी अनेक शक्कला लढवल्या जायच्या , बोलण्यातून , वागण्यातून समोरच्यावर आपली एक वेगळी छाप पाडून आपल्या उत्पादनाचा खप करणे सहसा या क्षेत्रात केलं जात .. पूर्वीच्या काळी असं बोललं जायचं , मार्केटिंग करणं साध्यासुद्या माणसाचं काम नाही बरं का ? मग या विषयाची खोली जाणून पुढे उद्योगधंद्यांच मार्केटिंग क्षेत्र शैक्षणिक  अभ्यासक्रमात रुजू करण्यात आलं . मग त्यात हजारो , लाखो रुपयांची फी भरून मुले पदव्या घेऊ लागले , त्यालाच आपण BBA , MBA  म्हणतो . पण आपल्याभोवती अशी अनेक माणसे दिसतील जी हि कागदोपत्री डिग्री न घेता सहज आणि सोप्या पद्धतीने, कोणत्याही गोष्टीच मार्केटिंग करू शकतात .

                         आता आपला लग्नाचा विषय चाललाय  तर लग्नाचंच घ्याना !  अगदी मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसर्सनाही नाही जमणार यापद्धतीच मार्केटिंग केलं जात काही लग्नाळू वधूवरांच्या आईवडिलांकडून आपल्या स्थळाबाबत .  काही वेळा अशा मार्केटिंगची इतकी अतिशोयोक्ती केली जाते , इतके काही वाढवून ,चढवून सांगितले जाते कि मग समोरच्या लोकांना सांगितलेले आणि वास्तव दर्शनी जे दिसत त्यात जमीन -आस्मानाचा फरक असतो .

                   आपल्या सरिता काकूंनी तर अशा मार्केटिंग मध्ये अगदी पीचडीच केलीये , त्यांचा मुलगा संतोष लग्नाचा आहे , वयाने तसा ४० शीच्या आसपासचा , खरं पाहता संतोष मनाने अगदी सरळ स्वभावाचा , नोकरीही चांगली , कोणतंही व्यसन नाही पण ऑफिस मधल्या बैठ्या नोकरीमुळे जरा पोट सुटलेलं , डोक्यावरचे समोरचे केसही थोडे विरळ झालेले. आता प्रथमदर्शनी पाहणाऱ्याला असं  वाटत असणार संतोषच लग्न त्याच्या शारीरिक रूपामुळे होत नसेल पण संतोषच्या लग्नाला विलंब होण्यामागचं मुख्य कारण होतं त्याची आई म्हणजेच सरिता काकू .! त्या येणाऱ्या प्रत्येक स्थळाकडे संतोष बद्दल इतकं काही वाढवून , चढवून बोलायच्या कि समोरच्याला अगदी एखाद्या सिनेतारकाचीच प्रतिमा डोळ्यासमोर येईल आणि फोटोही त्याच्या २८ - २९ व्या वर्षीचे सगळ्यांना पाठवायच्या , मग कांदेपोहेंचा कार्यक्रम निश्चित व्हायचा खरा पण आताच्या  संतोषला बघून आपण फसलो गेलो या भावनेखातीर त्याला नकार दिला जायचा . अशा कित्येक मुलींबरोबर संतोषचा कांदापोहेचा कार्यक्रम झाला , त्यातील कितीतरी मुली संतोष पेक्षा शिक्षणाने , रूपाने एक पायरी खालीच होत्या पण आधी कल्पना केलेला संतोष आणि समोर बसलेला संतोष यामधील तफावत ध्यानीमनी नसताना अचानक पणे पचवणे त्यांना अवघड होऊन जाई आणि नकळतच अपेक्षाभंग झालेल्या , हिरमुसल्या मनाने नकार  दिला जायचा .

                 प्रीतीचंही तेच झालं होतं .. तिच्या आईबाबांना ३६शीला आलेली प्रीती अजूनही २४ वर्षीचीच वाटे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक स्थळाला ते प्रीतीच्या गोऱ्या रंगाबद्दल , देखण्या रूपाबद्दल , तिच्या पोस्ट ग्रॅजुएट शिक्षणाबद्दल चार ज्यादाच्या गोष्टी वाढवून चढवून सांगायचे , आणि साहजिकच आपल्या स्थळापेक्षा ४ पट  अधिक अनुरूप अशा स्थळांना ते संपर्क करीत असत पण वास्तविक पाहता प्रीतीचे शिक्षण झाले तरीही त्या पदव्या कागदोपत्रीच होत्या , घरच्या चार भिंती सोडून ती कधी बाहेर पडलीच नाही , आणि वयाच्या खुणा आता चेहऱ्यावरून आणि शारीरिक बदलातून जाणवू लागल्या होत्या , वजन वाढलं होत , हॉर्मोनल असंतुलनामुळे चेहऱ्यावर डाग आले होते , म्हणजे २५ शीत एखाद्या स्वर्गातील  अप्सरेप्रमाणे भासणारी प्रीती आता वयाने आणि मनाने पोक्त दिसू लागली होती . पण आईवडिलांच्या या नको तितक्या मार्केटिंच्या स्वभावामुळे प्रीतीला सतत नकाराला सामोरं जावं लागायचं आणि दुर्दैवाने आईवडिलांच्या ध्यानी सतत नकार येण्याची कारणेही लक्षात येत नव्हती .

                         प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाबद्दल /मुलीबद्दल अभिमान असतो आणि प्रत्येकाला अस वाटत असत कि आपल्या पाल्यासाठी कोणीतरी राजकुमार किंवा राजकुमारी मिळायला हवी .. साहजिक आहे ते ! पण ते समोरच्या स्थळाला पटवून देण्यासाठी अवाजवी कौतुकानं आपला मुलगा /मुलगी काहीतरी विशेष आहे असं पालकांनी सांगणं आता कालबाहय झालय !! बऱ्याचवेळा लग्न जमवणाऱ्या मध्यस्थांकडूनही असं मार्केटिंग केलं जात . त्यात मुख्यत्वाने वधू -वरांचे रंग , रूप , उंची , शिक्षण , उत्पन्न यांचा समावेश केला जातो .आजकालच्या डिजिटलायझेशनच्या  जमान्यात फोटोमध्येही अनेक बदल करता येतात .काळे  - गोरे  करणे , फीचर्स ठळक करणे , नाक - डोळे सरळ करणे सारख्या अनेक गोष्टी चुटकीसरशी बदलल्या जातात . पण मग जेव्हा भेटीचा कार्यक्रम ठरतो आणि समोरच्या लोकांना खरं काय, खोट यात काय दिसत तेव्हा मात्र जे घडायचं असतं तेच घडत . पण हे सर्व घडत असताना वधू - वर बेचारे या नकाराच्या  अग्निकुंडात होरपळून जात असतात याचा कुणी विचारच करत नाही !

                        ही आजची पिढी आहे , त्यांना त्यांचं उगाचच मार्केटिंग नको आहे , त्यांना हवाय सहजीवनासाठी जोडीदार जो त्यांना ते जसे आहेत त्या प्रकारे त्यांना स्वीकारेल  .  नीट विचार केला तर पालकांच्या अशा मार्केटिंगला कुठेतरी त्यांना आपल्या स्थळाला नाकारल्या जाण्याची भीती असते आणि त्या असुरक्षितेपोटी ते अतिशोयोक्ती बोलून जातात . पण पालकांनी डोळसपणे विचार करून आपल्या स्थळाच्या जम्याच्या आणि नकारात्मक गुणांचे अवलोकन केलं पाहिजे आणि समोरच्याला ते नीट स्पष्ट्पणे सांगितलं पाहिजे मग निर्णय त्यांना घेवूदे ना ? उगीचच १०० स्थळांना भेटून त्यांच्या कडून नकार घेत बसण्यापेक्षा सत्य काय ते  ऐकून तयार झालेल्या एक  स्थळाला भेटलेलं केव्हाही चांगलं . !

                                                                           डॉ स्नेहल अवधूत सुखठणकर

  30th December, 2019

Leave a Comment