Dr Snehal's Article Published in Tarun Bharat on 29/Nov/2019- Samaj Roon

समाजऋण

                        "बदल ही काळाची गरज " हे आपण सर्व जण स्वीकारतो . काळानुसार आपले आचार , विचार , राहणीमान  बदलणे क्रमप्राप्त आहे . आणि आपण , आपला समाज बऱ्यापैकी अनेक बाबतीत हा बदल खूपच सकारात्मकतेने आत्मसाथ करताना दिसतोय . आज आपला समाज प्रगतीच्या ज्या उच्च शिखरावर पोहोचलेला आहे जिथे मुलगा -मुलगी  समानतेचे द्योतक म्हणून मुली आज मुलांच्या बरोबरीने शिक्षण , नोकरी , क्रीडा , संगीत -कला , राजकारण अशा अनेक क्षेत्रात अगदी यशस्वीपणे कार्यरत आहेत . आपल्या समाजाने अर्थातच अशा कर्तृत्वान स्त्रियांचा नेहमीच गौरव केलेला आहे .

                  आजकालच्या तरुण तरुणींमध्ये आयुष्यात काही तरी करायची , स्वतःची नव्याने ओळख जगाला करून देण्याची महत्वकांक्षा दिसते . अर्थात हि पिढी आपली ध्येये पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अथक प्रयत्न , कष्ट करण्यासाठीही तितकीच तत्पर आहे . अशा स्वतंत्र्य , महत्वकांक्षी ,निर्भीड पण तितक्याच संवेदनशील पिढीला  गृहस्थाश्रमाचे महत्व आपण समजावून सांगणे खूप गरजेचे आहे .

                      लग्न जमणे महत्वाचे आहे पण ते योग्य वयात जमणे जास्त महत्त्वाचे आहे कारण वधू -वरांचे लग्नाचे वय यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात . आजकालचे तरुण -तरुणी शिक्षणाला महत्व देऊन स्वावलंबी होण्याआधी लग्नाचा विचार देखील करत नाहीत अर्थात आजची एकूणच वास्तविक परिस्थिती पाहता कुटुंबाची संपूर्ण जबाबदरी घ्यायची म्हणजे आर्थिक स्थिरता तर हवीच . पण ही स्थिरता मिळवत असताना लग्नाचा विचारही व्हायला हवा कारण योग्य वयात लग्न झाल्यास अनेक अडचणींवर आपण नकळतपणे  मात    करत असतो . एकतर नवीन कुटुंबाला स्वीकारणे , त्यांच्यात मिळूनमिसळून राहणे तरुणपणात खूप सोपे जाते . लग्न हा आयुष्यातील खूपच मोहक , रंजक प्रवास आहे यातील नवलाईचे दिवस ज्यामध्ये जोडप्याला एकमेकांबरोबर फिरणे , एकमेकांसोबत वेळ घालवणे , एकमेकांना समजून घेणे आणि खऱ्या अर्थाने एकमेकांबरोबर आयुष्याची सुरवात करणे यासाठीही खूप  वेळ हातात असतो .

         आपल्या  शास्त्रात  लग्न हा सोळा संस्कारापैकी अत्यंत महत्वाचा संस्कार मानतात  कारण यातून सुप्रजा म्हणजेच संस्कारक्षम भावी पिढी जन्माला येते पण ती जर सुदृढ आणि सक्षम बनायची असेल तर आई-वडीलही तितकेच सुदृढ आणि सक्षम असावे लागतात आणि अर्थातच तरुणपणी या सगळ्या गोष्टी सहजपणे  झेपूनही जातात .आणि आई-वडील म्हणून साऱ्या जबाबदाऱ्यांना  आपण पार पडण्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती या वयात असते .. शिवाय नव्याने येणाऱ्या अनेक चढ-उताराना बेधडकपणे सामोरे जाण्याची हिम्मत ही या वयात असते

     

         प्रगल्भ समाजाची सुरुवात प्रगल्भ कुटुंबापासून होते आणि अर्थातच प्रगल्भ कुटुंबाचा  पाया म्हणजे नवऱ्या-बायको मधील निखळ , प्रगल्भ नात. कारण हेच नातं घडवत असत आपल्या समाजातील अतिमूल्यं भावी पिढीला  . आणि पिढ्यानपिढ्या पुढे नेत असलेल्या आपल्या सकारात्मक संस्कारांच बीज हे खऱ्या अर्थाने या जोडप्याने आधी अंगी बाणल पाहिजे  म्हणजे नकळतच येणारी पिढी या संस्कारांची श्रीमंती घेऊनच जन्माला येईल .          मुळातच लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे एकमेकांशी जोडले गेलेले आयुष्यभराचे नाते . सद्भावनेतून या  नात्याची सुरवात होणे अपेक्षित आहे . यातून जवळ येणाऱ्या दाम्पत्यावर जशी आत्मोन्नतीची तळमळ असते तशीच आपल्या कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती काही जबाबदारी असते .याची जाणीव करून द्यायला हवी . आपल्या कुटुंबाने , समाजाने आपल्याला कळत -नकळत अनेक गोष्टींचे ज्ञान दिले , आपल्याला घडविले , शैक्षणिक जागरूकता दिली पण या कुटुंबाचा , समाजाचा भाग म्हणून आपणही हे ऋण फेडले पाहिजे याचेही भान असले पाहिजे .

                  त्यामुळे उपवर तरुण -तरुणींनो  नोकरी -बढती , महत्वकांक्षा  बाळगा , पंख पसरून खुल्या आकाशात झेप घ्या पण पंखात बळ देणार , स्वतःच हक्कच अस आपलं माणुस योग्य वेळेत आपल्या आयुष्यात येईल या दृष्टीनेही प्रयत्न करा .

                                                                                                                                डॉ .स्नेहल अवधूत सुखटणकर .

[email protected]

 

  29th November, 2019

Leave a Comment