Dr Snehal Avadhut Sukhatankar article published in Tarun Bharat on 11/ Nov/ 2019

                      लग्न हा शब्द जसा जोडाक्षराचा आहे त्याचप्रमाणे या शब्दाभोवती अनेक समीकरणे जोडली गेलेली आहेत . लग्नाच्या माध्यमातून दोन कुटुंबांचे सहजीवन चालू होते . पण हि जवळीकता सहजासहजी घडणे थोडेसे अवघड .! त्यासाठी अनेक पैलूंची तपासणी करणे गरजेचे असते कारण शेवटी हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो... यातील मूलभूत घटक म्हणजे शिक्षण , व्यवसाय आणि इतर भौतिक गोष्टी .!

                      आजच्या युगात शिक्षणाचे महत्व तर आपण सगळे जाणतोच .. शिक्षणाने माणूस घडतो अस म्हणतात पण ही जडणघडण चांगल्या दृष्टीने होणे हा या मागचा हेतू असतो . आपला लग्नाचा विषय इकडे चाललाय तर त्या दृष्टीने  चांगले शिक्षण म्हणजे किमान ५०% पसंतीची हमी !!!!  अर्थातच आजच्या काळात सर्रास मुलं मुली शिकलेले असतात . पण शेकडेवारीत मुलींनी आघाडी मारलेली दिसते . आपल्या समाजातील लग्नाच्या दृष्टीने  सर्वात महत्वाचा  मुद्दा म्हणजे शिक्षण .... स्थळासंदर्भात फोन केला असता पहिल विचारल  जात मुलाचं /मुलीचं शिक्षण काय ?? हे जर जमेच असेल तर दुसरा प्रश्न नाहीतर संवाद तेथेच थांबला म्हणून समजावं . आज बरीचशी लग्न शिक्षणाच्या अटीमुळे  रखडलेली आहेत . उदाहरणार्थ डॉक्टर ला डॉक्टरच हवा , इंजिनीयरला इंजिनीयरच हवा , वकीलला वकीलच हवा , सरकारी कर्मचारीचंही तेच गणित !!  नशिबाने ज्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील जोडीदार मिळतो त्यांचं ठीक आहे हो ,पण ज्यांना यात अपयश समोर येताना दिसतंय त्यांनी मात्र वेळेतच आपला रस्ता  बदलेला बरा नाही का ?? आणि यात पण आपण आयुष्याची निराळीच मजा चाखू शकतो ...म्हणजे बघा  एकाच क्षेत्रातील जोडपं दिवसभर तेच आणि घरी आल्यावरही त्याच विषयांच्या चर्च्या …पण डॉक्टर आणि इंजिनीयर किंवा इंजिनीयर आणि वकील यांमध्ये किति बोलण्यासारखे विषय असू शकतात ... ज्याने आयुष्याला थोडा मसाला मिळतो.... केलाय का कधी यावर विचार ? आणि शिक्षण कागदोपत्री जस महत्वाचं आहे तसच किंबहुना त्याही अधिक महत्वाचं आहे त्या शिक्षणातून आलेली प्रगल्भता , दृढनिश्चयता , शून्यातून जग निर्माण करण्याची क्षमता. जर ह्या गुणांचा अभाव असेल तर त्या कागदी डिग्रीची किंमत काडीमोलचं ..  त्यामुळे उपवर मुलामुलींना सांगू इच्छिते आपल्या भावी जोडीदाराचे शिक्षण पाहताना वरील बाबींचाही सखोल विचार करावा .

                        

 

 

            आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो लग्नात  पाहिला जातो तो म्हणजे व्यवसाय .  मुद्दा म्हणण्यापेक्षा मोठा प्रश्नच  आजच्या उपवर मुलांसाठी तरी .! मुलाचा बिजनेस असेल तर एक तरा तो नोकरीला असेल तर दुसरी तरा !!!! बऱ्याचशा मुली उद्योगधंदा करणाऱ्या त्यातल्यात्यात  गावाकडच्या /तालुक्याच्या भागातल्या मुलांना  नाकारताना दिसताहेत ... कारण त्यांना त्यांची मोठ्या शहरातील नोकरी सोडायची नसते .. मग त्या मुलाचा कितीही मोठा , यशस्वी बिजिनेस असला तरीही त्यांना नाकारलं जात ... बरं शहरात नोकरी करणाऱ्या मुलांच्या वेगळ्या अडचणी ... नोकरी आहे तर पॅकेज किती ? पॅकेज आहे तर स्वतःचा ब्लॉक आहे ना? ब्लॉक आहे तर त्यावर काही कर्ज तर नाही ना ? .  काही मुलेही मुलींच्या पदव्या , नोकऱ्या , त्यांची आधुनिक जीवनशैली याबाबाबत खूपच अडून बसताना दिसतात ....म्हणजे एकूणच काय व्यवसाय असो किंवा नोकरी बऱ्याचदा लग्नाची गाडी इकडे येऊन थांबते .

               बऱ्याचवेळा उपवर मुलं -मुली भिन्न पोटजाती , प्रदेश यावरही सुरवातीलाच चिकित्सक बनतात . यामागे अर्थातच नकाराची , ऍडजेस्टमेंटची भीती असते खरी! पण नवीन लोकांसाठी , जागेसाठी जर आपण स्वतःला मर्यादित करून ठेवलं तर बऱ्याचशा नवीन स्थळांपासूनही आपण दुरावतो. कोणासठाऊक आपला जोडीदार हा पूर्णपणे दुसऱ्या प्रांतातील असू शकतो .आणि अस झालं तर लग्नांनंतर एकमेकांना समजून घेण्यात जास्ती मजा येईल .   

             मला आजच्या उपवर मुला -मुलींना सांगावयाचे आहे आपण शिक्षणाने सुशिक्षित झालो आहोत पण आपल्याला प्रगल्भ व्हायचे असेल तर आयुष्यात सारासार विचार आणि विवेक बुद्धी वापरायला हवी .  पैसे कमावण्यासाठी  शहरातच गेले पाहिजे अस नाही ! विचारात स्थिरता आणि मनातील संकल्प दृढ असेल तर आपण आयुष्यात यशस्वी कुठेही  होऊ शकतो . कमावण्याच्या अनेक संधी आपण गावात राहूनहि उपलब्ध करू शकतो ... फक्त स्वतःवर आणि आपल्या जोडीदारावर विश्वास हवा .!!

 

डॉ .स्नेहल अवधूत सुखटणकर

 

 

  11th November, 2019

Leave a Comment