Dr Snehal Sukhatankar's Article published in Tarun Bharat 22/Jan/ 2020 - Nari to narayani

" नारी तु नारायणी "

                      आपल्या भारत देशाची संस्कृती पूर्वापारपासून खूपच  श्रीमंत होती . एक काळ होता जेव्हा आता प्रगतशील म्हणवून घेणाऱ्या देशात प्राण्यांची शिकार करून अन्नाची व्यवस्था करणारे लोक राहायचे , गुहेत  त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा ,त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेहि नसायचे  आणि आपण भारतीय त्याच काळात मोठमोठ्या राजवाड्यात , चांगल्या बांधलेल्या वास्थुमध्ये राहायचो , हिरे माणकांचा   व्यवसाय व्हायचा . आणि हि श्रीमंती फक्त  भौतिक गोष्टींचीच नव्हे तर आपण वैचारिक दृष्ट्याहि इतर संस्कृतींपेक्षा कित्येक पटीने वरचढ होतो . त्यात स्त्री - पुरुष हा भेदभाव कधीच झाला नाही .  व्यवसाय म्हणा ,विज्ञान म्हणा , शास्त्र म्हणा , न्यायव्यवस्था म्हणा , राजकारण म्हणा अशा अनंत क्षेत्रात पुरुषांइतक्याच स्त्रियाही अग्रेसर असायच्या .

                    बहुतेक प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहित असलेली सूत्रे " असतो मा सद्गमय / तमसो मा ज्योतिर्गमय !, म्रुत्योर्मा अमृत गमय !" पण आपल्याला माहित आहे का हि सूत्रे जगाला कोणी दिली ? ती दिली याद्यावल्क ऋषींची पत्नी मैत्रीयी देवीने . वसिष्ठ ऋषींची कन्या वाक्भ्रूणी, विदुषी गार्गी यासारख्या अनेक महान स्त्रीया होऊन गेल्या . आदी शंकराचार्य आणि मंडनमिश्राच्या शास्त्रीय वादात निर्णय देण्याची जबाबदारी आली होती मंडनमिश्राची पत्नी शारदादेवीवर .एवढेच काय "सीताराम ", "राधाकृष्ण " , "लक्ष्मीनारायण " , "उमाशंकर " , "गौरीशंकर "  हे अगदी भक्तिभावाने उच्चारले जाणारे शब्द स्त्रीप्रति असणारा आदर दर्शवितात . त्याकाळी तर मुलानांही आईच्या नावाने ओळखले जायचे . भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला " कौंतेय "रामायणात हनुमंताला " अंजनीपुत्र ", भागवतात श्रीकृष्णाला " देवकीनंदन " किंवा  "यशोदा नंदन " शब्द वापरला आहे .    यासर्व  उदाहरणांमधून स्त्रीयांची  महती आणि त्यांच्या प्रति असणारा आदर प्रदर्शित होतो आणि पर्यायाने आपल्या संस्कृतीची अपरूपता , महानता याचे दर्शन घडते .

              पण कालांतराने अनेक बदल या भारतभूमीने पाहिले  , परकीयांच्या आक्रमणाने हळूहळू आपल्या संस्कृतीला आतून पोकळ करण्याचा प्रयत्न होऊ लागला आणि आपण त्याच्या भयाण हेतूला बळी पडत गेलो . पण दुर्दैवाने यामध्ये सर्वात जास्ती कोणी गमावलं असेल तर ती आपली भारतीय स्त्री . परकीयांनी अनेक स्त्रियांना बाटवले , त्यांच्या अब्रूची धिंड काढली , त्यांच्या भावनांची राखरांगोळी केली . हळूहळू जी स्त्री एकेकाळी समाजाचा एक मुख्य आधार स्तंभ म्हणून गौरवली जायची तिचा  उपभोग वस्तू म्हणून   ती  अविचाराने आणि अनाचाराने अपमानित होऊ लागली . अर्थातच समाजातील स्त्रियांची हि वाढणारी अवहेलना त्यांच्या घरातील पुरुषांना आतून पोखरत गेली आणि पुढे पिढ्यानपिढ्या अनेकांना मुलगी म्हणजे बापाच्या डोक्यावरच वजन वाटू लागलं .. सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणा किंवा मुलीला लग्नात दिला जाणारा हुंडा म्हणा यासर्व प्रथा, भीती  मधल्या काळात इतक्या वाढत गेल्या कि स्त्री अर्भक जन्माला येताच तिला टोपलीत घालून पाण्यात सोडून देणे , कचऱ्यात फेकून देणे , कोणाच्या तरी दारात किंवा मंदिरांमध्ये सोडून देणे असे प्रकार व्हायला लागले . हळूहळू या भीतीचे रूपांतर मनोविकारात कधी झाले हे कळलंच नाही , स्त्री अर्भक जन्माला येण्या आधीच तिची  हत्त्या होऊ लागली , त्याला मग नकळत वंशाला पुढे नेणारा दिवा म्हणजे मुलगाच या  मूर्ख आणि पाशवी विचारसरणीमुळे अनेक गर्भपात झाले . मुलगी जन्माला येणे  म्हणजे तारेवरची कसरत किंवा कोणत्या अग्निकुंडात घेतलेली झेप अशी समजूत झाली होती . अनेक वेळा स्त्री अर्भक जन्माला येण्या मागे तिच्या आईला जबाबदार मानून अशा स्त्रियांचा छळ केला जायचा . समाजात अनेकांना  आई हवी होती , बहीण हवी होती , बायको हवी होती पण मुलगी जन्माला येणे म्हणजे काही तरी भयंकर घटना अशी भावना होऊ लागली . आणि दुर्दैवाने आजच्या वैज्ञानिक युगात जेव्हा मुली शिकत आहेत , स्वतंत्र होत आहेत , डॉक्टर , इंजिनिअर होत आहेत , अवकाशात झेप घेऊन गगनभरारी घेत आहेत तरीही काही कुटुंबांमध्ये मुलींना कमी लेखण्याचा उपक्रम चालूच आहे .

            कायदेयंत्रणेने अशा कृत्यावर जरब बसवला.  स्त्री शिक्षण , स्त्री आरोग्य , स्त्री रक्षण , स्त्री सुरक्षितता  अशा अनेक मोहिमांकरवी स्त्री गर्भाला वाचवून त्यांना या जगात जन्माला येण्याचा अधिकार प्राप्त करून दिला . पण मधल्या काळात    जसजशी हि मानसिक विकृती समाजात वाढत गेली तसतसा त्याचा परिणाम  मुलींच्या संख्येवर होऊ लागला . आणि आज १००० मुलांच्या मागे ८४० मुली असे प्रमाण येऊन ठेपले. अर्थातच याचा परिमाण आज आपण भोगत आहोत लग्नासाठी मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय . त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे मुलगे  - मुलींच्या संख्येतील तफावत . अर्थातच संख्या कमी झाल्याने मुलींना आपल्यासाठीआलेले  स्थळ स्वीकारणे किंवा नाकारणे अगदी सोपे झाले . आता परिस्थिती अगदी विरुद्ध झाली आहे . आधीच्या काळात म्हंटल जायचं , मुलीचं लग्न करायचं म्हणजे तिच्या आईवडिलांनी सुयोग्य वर संशोधनासाठी आपल्या वहाणा झिजवाव्या लागतील , पण आता हि वहाणा झिजवावयाची वेळ मुलांच्या आईवडिलांवर येऊन  ठेपलीये असे दिसतंय .

                 त्यामुळे " करावे तसे भरावे " या उक्तीप्रमाणे केलेल्या कर्माची फळे प्राप्त परिस्थितीत भोगण्यावाचून आज पर्याय नाही . बरेचसे उपवर वधू - वर तथा त्यांचे पालक संशोधना दरम्यान एकमेकांच्यावर अनेक दोषारोपण करताना दिसतात . त्यामुळे भविष्यात हि परिस्थिती सुधारायची असेल तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्री अर्भकाचा मुलग्याइतकाच आनंदाने स्वागत करा , तिला जपा , तिला सुसंस्कृत करा . तरच खऱ्या अर्थाने " नारी तु नारायणी " हे ब्रीद सत्य ठरेल .

  डॉ.  स्नेहल अवधूत  सुखठणकर

 

  23rd January, 2020

Leave a Comment