Dr Snehal Sukhatankar& Article published in Tarun Bharat 3/Feb/ 2020

"व्यवहार चातुर्य "

                      मागच्या सदरात " नारी तू नारायणी " लेखामार्फत आपल्या समाजातील स्त्रियांची कालानुरूप झालेली विटंबना , त्यांची उपेक्षा आणि वर्तमानकाळात त्याचे उमटत असलेले पडसाद यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला . पण बदललेल्या किंवा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बदलू प्रयत्नात असलेल्या समाजात जरी स्त्री - पुरुष समानतेचा बोलबाला चालू असला तरीही खऱ्या अर्थाने काही गोष्टी समान असूच शकत नाहीत , किंबहुना निसर्गानेच ती तरतूद करून ठेवलीये . पुरुषाला निसर्गाने बलदंड शरीरयष्टी , व्यवहारचातुर्य आणि कमकुवत भावनिक इच्छाशक्ती प्रदान केली आहे , स्त्रीला तुलनेत कमी शारीरिक बळ , सांसारिक चातुर्य आणि जबरदस्त प्रबळ भावनिक इच्छाशक्ती प्रदान केलेली आहे .

                 मुळातच स्त्री आणि पुरुष हे संसाररूपी रथाचे दोन अश्व आहेत , ज्यांना एकमेकांच्या शक्तींना आणि कमतरताना सावरून घेत पुढे जायचे असते . पण या रथाच्या गतीवर वचक  राहण्यासाठी थोडे सांसारिक चातुर्य आणि थोडे व्यवहारीक चातुर्य दोहोंची समान प्रमाणात गरज असते . आपल्याकडे बऱ्यापैकी कुटुंबात दैनंदिन निर्णय घरच्या कर्त्यापुरुषाच्या होकारानेच पुढे जातात , अगदी स्वयंपाकातल्या बनणाऱ्या भाजीपासून ते बँक व्यवहारापर्यंत . पण जेव्हा प्रश्न येतो लग्नाचा , बरेचसे वर - वधू पिता एक पाऊल पाठी असल्याचे निदर्शनास येते . ९०% केसीस मध्ये वर - वधू माताच या संशोधनाच्या कार्यात पुढाकार घेत असल्याचे दिसून येते . हा पुढाकार सकारात्मक  असल्यास बरीचशी रखडलेली लग्ने चुटकीसरशी होतील . पण दुर्दैवाने वर - वधू मायचा नको तितका पुढाकार , व्यवहारचातुर्याचा अभाव , भूत किंवा भविष्य काळाला धरून बसून वर्तमान काळाला कानाडोळा करणे यासारख्या अनेक ढोबळ गोष्टींमुळे वधू -वरांची लग्नाची वय वाढताहेत .

                एक दिवस प्रदीपची आई ऑफिस मध्ये आली , प्रदीप तसा ४० शी ओलांडलेला , बेंगलोरला चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर , बक्कळ पगाराच्या नोकरीत होता . सर्व सुख सोयिनेयुक्त असे ३ खोल्यांचे घरही त्याने तिकडे घेतले होते . त्याच्या घरचेही सगळे शैक्षणिक , आर्थिक दृष्टया सबळ , आधुनिक विचारसरणीचे आहेत असं त्याच्या आईच म्हणणं होतं . त्यामुळे आम्हाला आमच्या प्रदीपला आमच्या कुटुंबाला साजेशीर अशी शिकलेली , मॉडर्न मुलगी हवी , आणि त्यांच्या मते मॉडर्न आणि शिकलेली म्हणजे जिला फाडफाड इंग्रजी बोलता येईल . तीच तर अस म्हणणं होतं कि तुमच्या संस्थेच्या फॉर्ममध्ये किंवा वेबसाईट वर त्या मुलींना स्वतःबद्दल इंग्रजीमध्ये लिहायला सांगा म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता मला कळेल . कारण इंग्रजी माध्यमातील मुलगी असेल तरच मी पुढे जाईन , बाकीच्या माध्यमातील मुली मला अजिबात चालणार नाहीत . जस कि त्या मुलीचं लग्न या सासूबाईंबरोबरच होणार आहे .  एखाद्या मुलीची शैक्षणिक आणि वैचारिक बुद्धिमत्ता तिच्या इंग्रजीवर ठरवणाऱ्या या बाईंची खरंच मला खूप कीव आली . एखाद्या माणसाचे   कर्तृत्व आणि क्षमता त्याच्या कामावरून न कारता  त्याची किंमत त्याच्या भाषेवरून करणे हि किती खालच्या दर्जाची संकल्पना आहे . आज मुलगा ४० शी गाठलेला आहे आणि ह्या बाई अजूनही भाषेचा पोरखेळ करत अनेक अनुरूप मुलींना नाकारत होत्या . आणि दुर्दैवाने यासगळ्यात वर पिता किंवा प्रत्यक्ष स्वतः वर यांची फक्त बघ्याची भूमिका होती .

 

                बेचारा प्रदीप आतापर्यंत आईने पसंत केलेल्या अगदी निवडकच मुलींना भेटला होता , पण त्या भेटीचाही काही उपयोग झाला नाही कारण फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या , अति मॉडर्न मुलींनी त्याला सरळ सरळ त्याच्या आई - वडिलांची तुलना घरातील डस्टबिन ( कचरापेटी) म्हणून केली होती . स्वतःला उच्चभ्रू समजून सदैव मोठेपणाच्या काल्पनिक जगात वावरणाऱ्या प्रदीपच्या आई सारख्या असंख्य आया आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतील . ज्यांना अगदी नकळतपणे आपल्या मुलासाठी अनुरुप सह जीवनसाथी मिळण्यापेक्षा त्यांच्या ढोबळ मानमरातबीला सजून दिसणारी एक नैसर्गिक बाहुली हवी असते .

                        बर वधू माउली हि या स्पर्धेत काही पाठी नाहीये . बऱ्याचशा उपवर तरुणीच्या लग्नाला विलंब होण्या मागचं एक मुख्य कारण म्हणजे वधू माउलीचे नको तितके प्रॅक्टिकल विचार . आम्ही जे लग्नानंतर सोसलं ते माझ्या मुलीच्या बाबतीत व्हायला नको या एका भीतीपोटी कित्येक वधू -माता वरांचे पॅकेज आणि स्वातंत्र्य या गोष्टीपाठी अगदी वेड्या झालेल्या आहेत . ! लग्नासाठी स्थळासंदर्भात फोन केला असता तो फोन चुकून जरी वडिलांनी उचलला तर त्यांचा सूर असतो  " थांबा हा , आमची हीच सर्व बघते , देतो तिच्याकडे " मग काय वधू माऊली मुलाचं नाव , गाव , इतर माहिती विचारायच्या आधीच मुलाचं पॅकेज किती ? तो लग्नानंतर कोठे राहणार ? मुलाचे आई - वडील गावाकडेच राहतील ना ? अशा अनेक भौतिकवादी प्रश्नाची उधळण चालू करते.

             अर्थात काही अपवादही आहेत जिथे वधू - वरांच्या माता फक्त शैक्षणिक दृष्ट्याच नव्हे तर वैचारिक , भावनिक आणि व्यावहारिक दृष्ट्या प्रगल्भ आहेत आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या पाल्याचे लग्न विना तक्रार , विना विलंब पार पडत .

                      पण आज खऱ्या अर्थाने गरज आहे वर - वधू पित्यानेही आपल्या व्यावहारिक चातुर्याचा उपयोग करत येणाऱ्या प्रत्येक स्थळाकडे स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणे . येणाऱ्या प्रत्येक स्थळाशी आपल्या मुलाचं /मुलीच कितपत पटेल , त्या मुलाची /मुलीची जीवनशैली कितपत आपल्या पाल्याशी , आपल्या कुटुंबाशी मिळते - जुळते , कितपत आपल्या मुलीला तिचा करियरच्या दृष्टीने त्या कुटुंबात वाव मिळेल  किंवा कितपत ती मुलगी आपल्या घराची सून म्हणून आपल्या परिवाराच्या संस्कारात रुळू शकेल , आर्थिक गोष्टी बाजूला सारल्या तर कितपत हे वधू - वर लग्नानंतर सुखी संसार करू शकतील या सारख्या वास्तविक बाबींचा विचार होणे गरजेचे आहे आणि एका वैज्ञानिक अहवालानुसार वास्तववादी विचारांचा अवलंब आणि कृती बायकांच्यापेक्षा पुरुष जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात . त्यामुळे वर / वधू पित्यांनो आपल्या पाल्याचे विवाह लवकरातलवकर अनुरूप स्थळाशी करायचे असल्यास आपण या संशोधन कार्यात खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलणे आज गरजेचे होत चालले आहे यावर विचार जरूर करावा .

डॉ स्नेहल अवधूत सुखठणकर

 

  4th February, 2020

Leave a Comment