Dr Snehal Sukhatankar's Article published in Tarun Bharat 4/Dec/ 2019- Vytha Ektapanachi

"व्यथा एकटेपणाची "

                                 आपल्या समाजात लग्न जमवणे आणि ते टिकवणे खूपच अवघड होत चाललेले आहे , याला अनेक  कारणेही आहेत कधी मुलांच्या अपेक्षा जास्ती , कधी मुलींच्या अपेक्षा जास्ती तर कधी पालकांच्यातील गैरसमजुती ... जेव्हा वधू - वर तरुण असतात तेव्हा बऱ्यापैकी संशोधनासाठी वेळ आणि शक्ती असते पण जशी ३५ ओलांडायला लागते तशी काळजी , भीती  आणि चिडचिड  वाढायला लागते . त्यावेळी बरीच मंडळी  , आमच्या स्थळाकडून काही अपेक्षा नाहीत , आम्ही तडजोड करायला तयार आहोत पण समोरच्या स्थळालाही  तस वाटलं पाहिजे ना ... असा बोलबाला करताना दिसतात पण आमच्या काही अपेक्षा नाहीत म्हणणारे जेव्हा एखाद स्थळ येत तेव्हा मात्र स्थळाची नकळत मोजमाप काढायला लागतात...नकळतपणे  वयाचं भान विसरून २५ शीत पदार्पण केलेल्या तरुण -तरुणीप्रमाणे समोरच्या स्थळापेक्षा आपण कसे वरचढ आहोत आणि आपल्या हे आलेलं स्थळ कसं साजेशीर नाही याच  प्रमाणपत्रच जणू देण्यात धन्यता मानतात . या निसर्गाचीच ही किमया आहे वयाप्रमाणे  प्रत्येक जीव जसा अनुभवाने मोठा होत जातो तसा तो शरीरानेही पोक्त होत जातो . पण ह्या पोक्तपणाच भान जर लवकर उमगलं नाही तर मग मात्र लग्नासाठी नकार देणे आणि नकार घेणे हे सत्र सतत वर्षानुवर्षे चालतच राहते .

                   आज आपण  इकडे  35 वर्षावरील  वयोगटातील  उपवर मुला -मुलींच्या  मनस्थितीचा  आढावा घेण्याचा प्रयत्न करूया ...  नितीन तसा  39 वर्षाचा , पण काही घरगुती जबाबदारीमुळे लग्नाला  उशीर झालेला ,  तसा नितीन बऱ्यापैकी शिकलेला आणि नोकरीही बऱ्यापैकी होती ... आधुनिक विचारसरणीनुसार राहणीमान आणि वेशभूषा करणे त्याचा छंद  होता . अनेक स्थळे यायची पण काही त्याला नकार देत तर काहींना नितीन नकार द्यायचा ...आता सरिताच स्थळ स्वतःहून चालून आलं होतं... तशी शिकलेली आणि नोकरी करणारी , वयाचं अंतर हि अगदी 3  वर्षाचं .... भेटी गाठीही झाल्या , सरिताने होकार दिला पण नितीनचा नकार !  कारण सरिता मॉडर्न कपडे घालत नव्हती , तिला इंग्रजी बोलायला येत नव्हतं ... अशा अनेक मुली नितीनने पाहिल्या.  कोणी  जाडच आहे तर कोणी गिड्डीच आहे, कोणी सावळीच आहे तर कोणी  नोकरी करत नाही एक ना दोन कारणे .

                                     सीमाचही असच काही झालेलं , वयाने 37 शी गाठत आलेली पण लग्नासाठी मुलांना नाकारत बसायची कारण कोणाचं पोटच सुटलंय , तर कोणाच्या डोक्यावरचे केसच विरळ झालेत , कोणाचे उत्पन्न माझ्या पेक्षा कमी आहे , तर कोणाचे शिक्षण कमी ,मला अमुक ह्या गावचाच हवा , मला सरकारी नोकरदारच हवा ....     

                                 आपण विचार केलात तर  असे अनेक नितीन आणि अनेक सीमा आपल्या आजूबाजूला दिसतील.  ज्यांचा असा समज असतो कि माझ्या काहीच अपेक्षा नाहीत तरीही मला एक साजेशीर स्थळ का नाही मिळत आहे ..??  त्यांचं असंही म्हणणं असत की सुरवातिला नातेसंबंधी , मित्रपरिवार स्थळांचे संदर्भ द्यायचे आता तर त्यांनीही हात दिलेला आहे .. त्यामुळे मलाच स्वतःसाठी प्रयत्न करावे लागतील ..... बऱ्याच वेळा पालकांचाही यात सहभाग असतो अर्थात प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी राजकुमार /राजकुमारीच वाटत असते आणि त्यासाठी ते येणारे प्रत्येक स्थळ दुय्यम ठरवत आणखी चांगल्या आणि तालेवान स्थळांचा शोध घेत बसतात .

                                     पण यामुळे होतंय काय आधीच लग्नाचं वय वाढलेलं त्यात आणखी उशीर व्हायला लागतो ... मग हळूहळू नातेवाईक , मित्रपरिवार संशोधनाचा कार्यातून अंग काढून घ्यायला लागतात .. एका मर्यादेनंतर पालकही नशिबावर सर्वकाही टाकून प्रयत्न सोडून देतात ... शेवटी एकटेपणाचं आयुष्य कंठावं लागत त्या उपवर मुलाला किंवा मुलीला . त्यात आईवडील असे पर्यंत ठीक पण नंतर भाऊ - बहिणी शेवटी त्यांनाही त्यांचा संसार असतो , नकळत त्यांचंही दुर्लक्ष होऊ लागत किंवा बऱ्याच वेळा आपली अडचणहि होऊ लागते ... मग तेव्हा कदाचित असा विचार येतो काही वर्षापूर्वी अमुक हि मुलगी किंवा अमुक हा मुलगा पाहिला होता तेव्हा कदाचित हो म्हंटल असत तर आज एकटेपणच हे विश्व अनुभवायलाच मिळालं नसत .. पण दुर्दैवाने वेळ निघून गेलेली असते ... आणि अस हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत ... काही मुली तर एका वयानंतर लग्नाचा विषयच मनातून काढून टाकतात ... आणि संपूर्ण आयुष्य एकटेपणाच्या विषारी जाळयात अडकलेल्या पक्षाप्रमाणे आतून तडफडत राहतात . म्हणजे बघा तसं बघायला गेलं तर अगदी साधी सोपी लग्न ठरवण्याची प्रक्रिया पण एका वयानंतर किती भीषण स्वरूप धारण करू शकते  याचा  विचारच किती दुःखद आहे .

                                       यावर उपाय एकाच . वयानुसार होणारे शारीरिक बदलांची स्वीकृती . 35-40 किंवा त्यापेक्षा जास्ती वयोगटातील जास्तीतजास्त मुली ह्या पारंपरिक पेहरावातीलाच असणार आहेत , त्यांच्यासाठी पाश्च्यात्य कपड्यांचा वापर करण थोडं अवघड जाऊ शकत . शिवाय वयानुसार पोक्तपणा जांणवणारच ! 35 शी गाठलेली स्त्री काही  20-25 वर्षाच्या तरुणीप्रमाणे स्लिम आणि ट्रिम असणार नाही ,वाढत्या वयोमानाच्या खुणा चेहऱ्यावर आणि शारीरिक बदलातून जाणवतातच . त्याचप्रमाणे पुरुषांच्याबाबतीतही पोट सुटणे , केस विरळ होणे , लठ्ठपणा वाढणे या गोष्टी होणारच ... नोकरीत बक्कळ पॅकेज असंच सहज मिळत नाही त्यासाठी अतोनात कष्ट , मानसिक ताण असतो त्यात ह्या सगळ्या शारीरिक बाबी खालावणे अपेक्षितच आहे ..

                  मुळातच या बाबींना प्राधान्य देऊन वर-वधू संशोधन करणे चुकीचे आहे .शारीरिक आकर्षण हि लग्नाच्या दृष्टीने महत्वाची बाब असली तरीही  खूपच  मर्यादित संकल्पना  आहे .  या वयात गरजेचे आहे आपलं माणूस जे आपल्याला समजून घेईल , ज्याच्याबरोबर आपले विचार पटतील, जो मानसिक , भावनिक आणि आवश्यक ती आर्थिक सुरक्षा देईल , आपलं उर्वरित आयुष्य आपण ज्याच्यासोबतीने आनंदाने , उत्साहाने जगू शकाल . बरेच लोक स्थळाचा फोटो बघूनच हा  मुलगा माझ्यासाठी खूपच बारीक  दिसेल  किंवा खूपच उंच दिसेल किंवा हि मुलगी माझ्यासाठी जाड दिसेल किंवा सावळी दिसेल, किंवा हे स्थळ माझ्या मित्रपरिवारात मिसळण्यायोग्यतेचं नाही , ते काय विचार करतील  अशा अनेक अनावश्यक सामाजिक दबावाखाली निर्णय घेत असतात .पण    लोकांना दाखवण्यासाठी लग्न करू नका .. शेवटी आयुष्य तुम्हाला एकत्र काढायचे आहे. लोक आपल्या सुखात आणि दुःखात फक्त हजेरी लावतात पण त्याचा आनंद असो किंवा झळ हि आपल्यालाच उपभोगावी लागणार आहे . आणि मुळातच जोड्या कधीच परिपूर्ण नसतात , एकाची उणीव दुसऱ्याने भरून काढायची असते , एकमेकांस समजून घेत , एकमेकांना सावरत पुढे चालायचं असत . त्यामुळे काही कारणास्तव लग्नाचं वय वाढलेल्या वधू -वरानो एकमेकाना भेटा , समजून घ्या , एकमेकांचे विचार पटतात का ते पहा आणि सारासार विचाराने निर्णय घ्या आणि आम्हालाही लग्नाची गोड बातमी लवकरच द्या .     

   डॉ. स्नेहल अवधूत सुखटणकर

 

  14th December, 2019

Leave a Comment