Dr Snehal Sukhatankar's Article published in Tarun Bharat 4/Nov/ 2019

अपेक्षा कि अतिशोयोक्ती !!!!

            लग्न हा आपल्या षोडश संस्कारापैकी एक महत्वाचा टप्पा . आपल्या संस्कृतीमध्ये लग्नाला सामाजिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व दिल गेलेल आहे . एक संसारक्षम, सुद्दृढ , समृद्ध पिढी यातून निर्माण होणे हे तर अपेक्षित आहेतच पण आध्यत्मिक प्रगतीच्या दृष्टीनेही संत तुकाराम सांगतात ज्याला चोख संसार जमला त्याला आध्यत्माकडे जाण्याची जणू गुरुकिल्ल्लीच सापडली म्हणावी .

            लग्न म्हणजे दोन जीवच नव्हे तर दोन कुटुंबांची एकमेकांशी जोडली गेलीली नाळ ... चांगल्या -वाईट काळात ही दोन कुटुंबे एकमेकांबरोबर असायची... नात्यात व्यवहारिकपणाचा लवलेश क्वचितच पहायला मिळायचा . लग्न झालेलं जोडपही एकमेकांच्या आवडी-निवडी जपत प्राप्त परिस्थितीत सुखी असायचे . अगदी १५-२० वर्षा पूर्वीपर्यंतची गोष्ट आहे ही . पण आजकाल  लग्न जमण्यातले आणि नंतर ते टिकून राहण्यातले एकूणच सामाजिक , वॆचारिक , आर्थिक अडथळे पाहता आपल्या विवाह संस्काराला  नक्की कोणते वळण मिळतेय हा विचारच खूप भीषण आहे.

           वाढत्या ढोबळ अपेक्षा , मनाचा कमकुवतपणा , आत्मविश्वासाची कमतरता आणि काही स्वप्नाळू रंजक विचार हे  मुख्यत्वाने लग्न ठरण्याच्या मार्गातील अडथळे आहेत . अगदी अलीकडचेच उदाहरण सांगते .. मीना तशी माझी बऱ्याच वर्षांपासूनची पेशंट .. चांगली इंजिनियर होऊन बंगलोर च्या एक मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करायची ..वयाने तशी तिशी ओलांडलेली पण अपेक्षेमध्ये काही तडजोड नाही हा तिचा अट्टाहास  ..  त्रासलेल्या तिच्या  आईने तर आता तिच्यासमोर हातच टेकले होते ... जस तीच वय, पॅकेज  वाढत होतं तस तिच्या चेहऱ्यावरचा पोक्तपणाही वाढत चालला होता ... आता आता तर तिला एकटेपणाच डिप्रेशन येऊ लागलं....

                  दुसरीकडे २४ वर्ष्याच्या अनुराधाच्या वरसंशोधनात तिच्या आईचा हट्ट होता त्या म्हणाल्या - मुलगा पुण्यातीलच हवा , चांगला ६-७ आकडी त्याचा पगार हवा , स्वतःची कार , फ्लॅट हवा, तोही कोणत्याही कर्जा शिवाय कारण लग्ननानंतर आमची मुलगी काय कर्जच फेडत बसेल का? हा ! वयाच अंतर जास्तीतजास्त २ वर्षाचं असावं , मुलगा शक्यतो गावाकडचा शेती असणारा  असावा म्हणजे आईवडील गावाकडे राहतील... कारण माझ्या मुलीला नोकरी सांभाळून सासू -सासऱ्याचं करण झेपणार नाही ... आम्ही बाई मुलीला मुलाप्रमाणेच वाढवलेले आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे घर काम किंवा रीतीभाती करणं तिला जमणार नाही.... कळलं का??  इतक्याच आमच्या  माफक अपेक्षा आहेत अस म्हणत तिने कितीतरी वेळ रोखून ठेवलेला श्वास एकदाचा सोडला.

               मला मान्य आहे मुली शिकलेल्या आहेत , त्याप्रमाणे त्यांना साजेशीर स्थळ मिळावी अशी अपेक्षा असणं काही चूक नाहीये , पण या अपेक्षा वाढतच जातायेत , वाढतच  जातायेत म्हणजे याला वेळीच लगाम नाही बसला तर होणारे दुरोगामी परिणाम खूप भीषण असणार आहेत .. मला एक प्रश्न उपवर मुलींच्या आईवडिलांना विचारावासा वाटतो .. तुमच्या ३० शीत तरी तुम्ही गाडी , घर , बँक-बॅलन्स बनवू शकला होता का ? तेही कोणत्याही कर्जाशिवाय .?? किंवा हे सर्व नाही म्हणून का तुमचं लग्न झालं नाही का?? केला ना तुम्ही सुखाचा संसार आजतागायत , पेलवून नेलाय ना तुम्ही संसाराचा गाडा एकमेकांच्या साहाय्याने ...!!!!

             मग आपल्या मुलीच्या बाबतीत हा अट्टाहास कशासाठी??  तुम्ही दिलेल्या संस्कारांवर ,तिने घेतलेल्या शिक्षणावर , तिच्यातल्या धडाडीवर नाहीये का तुमचा विश्वास ?? करू द्याना त्यांना  एकत्र प्रयत्न , चाखू द्याना त्यांनाही यश -अपयशाची अनोखी चव , एकमेकांच्या पंखाला बळ देऊन घेऊ दे ना त्यांना उंच भरारी..... निरभ्र आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या  दोन पक्षाच्या जोडप्याप्रमाणे घेऊ द्याना त्यांनाही गगनभरारी .!!!

     पण टाळी जशी एका हाताने वाजत नाही तशीच अपेक्षांची हि बुट्टी उपवर मुले आणि त्यांचे पालकहि डोक्यावर वाहताना दिसताहेत . आज मुलांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेतच पण बऱ्याच वेळा त्या खूप ढोबळहि वाटतात . म्हणजे बघा मुलाला बायको म्हणून  हवी असते सुंदर , चांगली शिकलेली , नोकरी करणारी , मॉडर्न  मुलगी .. जी त्याच्या मित्रपरिवारात सहज मिसळेल , आजच्या महागाईच्या काळात आर्थिक रेटा पेलवून नेण्यास मदत करेल . आणि आईवडीलांच्या अपेक्षा असतात कि आपल्या सुनेने तीन  वेळ ताज जेवण बनवलं पाहिजे , घराची नाती -गोती नीट सांभाळली पाहिजेत , सणासुदीला सगळे रीतीभाती केल्या पाहिजेत ,त्यात बऱ्याचशा नोकरीतून रिटायर्ड झालेल्या सासवांचा टोमणा असतो आम्ही नाही का नोकरी सांभाळत मुलबाळ आणि संसार पेलवला मग या आजच्या मुलींना काय प्रॉब्लेम आहे ??

        मला अशा लोकांना एक गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते जेव्हा तुम्ही नोकरी करत होता तेव्हाचा काळ आणि आताच्या काळात आपल्याला  काहीच बदल जाणवत नाही का ???आजच्या काळात महागाई प्रचंड वाढतीये , competitions वाढत आहेत , priorities बदलत आहेत , जीवनशैली बदलत आहेत , कुटुंबे विभक्त होताहेत त्यामुळे या पिढीसमोरील आव्हानेही वाढलेली आहेत . नोकरीमध्ये उच्च पदावर असणारी सून जेव्हा घरी येते तेव्हा आपोआपच ऑफिस मधील जबाबदारीचं डोंगरही सोबत घेऊन येते , सगळ्या रीतीभाती अगदी आपल्यासारख्या जमातीलच अस नाही कारण तिचा वेळ आणि विचार हे नक्कीच वेगळ्या दाटणीचे असू शकतात तर या सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी वधुसंशोधना आगोदर असायला हवी.

         त्यामुळे लग्नासारख्या पवित्र बंधनाची सुरुवात करताना होणाऱ्या जोडीदाराची निवड   केवळ रूप , पेसा , स्थावर -प्रॉपर्टी पुरती न ठेवता जोडीदाराचा स्वभाव , त्याची वैचारिक क्षमता , समंजसपणा , कौटुंबिक माहिती याचाही प्रकर्षाने विचार व्हायला हवा ..

डॉ. स्नेहल अवधूत सुखटणकर

  4th November, 2019

Leave a Comment