Dr Snehal Sukhatankar'sArticle published in Tarun Bharat 6/Nov/ 2019

लग्नाच्या ब्रह्मगाठी

           लग्नाच्या गाठी या साक्षात स्वर्गातूनच बनून आलेल्या असतात , आपण फक्त प्रयत्न करायचे आणि जेव्हा योग येईल तेव्हा लग्न होईलच कि !!! अस बऱ्याच लोकांच्या तोंडी ऐकायला मिळत .  पण हे प्रयत्न कधी , केव्हा आणि कोणत्या दिशेने व्हायला हवेत यावर खूप कमी विचार केला जातो.

           ४० वर्षाच्या दिनेशच्या आई सुनबाईंच्या संशोधनात गेली कित्येक वर्षे होत्या , झाले सगळ्या विवाह केंद्रात नावे घालून झाली , कित्येक मेळावे , कार्यशाळाना हजेरी लावून झाली , कित्येक ज्योतिषांचा पाठपुरावा केला , अनेक पूजा-अर्चा , होम-हवन झाले पण सुनबाई काय मिळता मिळत नव्हती .... तीने गेल्या १० वर्षांपासून  देवावर सगळं टाकलं आणि शांत राहिल्या काय करणार वयानेही आता झेपत नव्हतं . आणि दिनेशनेही नकार घेऊन घेऊन लग्नाचा विषयच मनातून काढून टाकला होता , त्यातूनच एखाद स्थळ अधूनमधून आलच तर काही ना काही कारण काढून नापसंती व्हायची. त्यामुळे एकूणच प्रयत्न पूर्णपणे थांबलेले होते . .

      आपल्या समाजात बरेच असे दिनेश मिळतील साधारणतः शेतकरी वर्गातून , पौरोहित्य करणारे तरुण , तालुक्याच्या / गावाच्या ठिकाणचे तरुण, उद्योगधंदा करणारे तरुण यांचा मुख्यतः समावेश आहे . आत्मविश्वासाचा अभाव , मनातील कमीपणा आणि त्यामुळे वधूपक्षाकडून सततचा येणार नकार यामुळे बरेचसे तरुण खचून जाऊन प्रयत्न सोडताना दिसतायेत . आणि बर का यामध्ये फक्त उपवर मुलांचाच नाही तर मुलींचाही समावेश आहे ... ज्यांनी आपलं सगळं नशीबच देवावर टाकलय अशी प्रांजळ कबुली ते देताना दिसतात

     आजची एकूणच परिस्थिती पाहता शिक्षण वाढलीयेत , जीवनशैली झपाट्याने बदलतीये त्यातूनच पाश्च्यात विचारांचा जबरदस्त पगडा यामुळे अपेक्षाचा डोंगर कुठेतरी आपल्या विवाह संस्काराला आतून पोकळ बनवत आहे ... त्यामुळे लग्नासाठी वर -वधू संशोधनामध्ये कुठेतरी एकमेकांबद्दल नकारात्मक दृष्ठीनेच संपर्क केला जातो मग त्याचे परिणामही तसेच उमटतात . उदाहरण देऊन सांगायचेच झाले तर एका मुलाच्या आईने दहा मुलींच्याघरी स्थळा संदर्भात फोन केला आणि त्या दहाही स्थळां कडून नकार आला तर अकराव्या स्थळाला फोन करताना ती नकार च  मिळणार या पूर्व विचाराने  पर्यायाने त्याच आविर्भावात बोलते मग कदाचित जुळणारे सूर ह्यांच्या हतबलतेमुळे बेसूर होऊन जातात . म्हणजे पुन्हा एकदा नकारात्मकताच ... आणि एकमेकांबद्दल हे दोषारोपणाचं चक्र लग्न होण्याआधीच  चालू होतं .

            मला एक कळकळीची विनंती अशा उपवर मुला -मुलींना करावीशी वाटते ' प्रयत्नांती परमेश्वर " यावर विश्वास ठेवून आपला पुढचा संशोधनाचा कार्यभाग चालू ठेवावा ... कारण आपल्याला लग्नासाठी एकच मुलगी /मुलगा हवाय.. त्यासाठी राहिलेल्या दहा जणांचे नकार पचवून पुन्हा नव्याने सकारात्मक दृष्टीकोन  ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे .

          आणखीन एक महत्वाचा मुद्दा इकडे मांडावासा वाटतो बऱ्याचवेळा लग्नाची वाढलेली वय हि ढोबळ अपेक्षांमुळेच असतात , मुलगी गोरीचं हवी , सडपातळच हवी , तिने मॉडर्न ड्रेससेस घातले पाहिजेत असा मुलांचा अट्टाहास असतो आणि मुलीना स्वतः वयाने मोठ्या असल्या तरीही होणार्या नवऱ्याला टक्कल तर नाही ना ?, त्याच पोट तर सुटलेलं नाही ना ? जरी जास्ती कमवत असला तरीही त्याच शिक्षण माझ्या पेक्षा कमी आहे .... अशा रंजक आकांक्षा मनात असतात त्यामुळे येणार प्रत्येक स्थळ ते नाकारत बसतात. पण यातून निराशाखेरीज हाती दुसरं काहीच लागत नाही .

       या लेखातून सांगण्याचा उद्देश इतकाच आहे कि आजकालच्या विवाहइच्छुक तरुण -तरुणींनी आपल्या हातात वेळ असतानाच डोळसपणे जरा विचार करावा ...घरातील वडीलधारी तर असतातच पण स्वतः तुम्ही पुढाकार घेऊन आपला जीवनसाथी निवडावा, तुमचे एकमेकात सूर जुळतात का ते पाहावं  कारण आजच्या काळाची ती गरज आहे . काही कारणास्तव वय वाढलेल्या उपवर मुला- मुलींना मी सांगू इच्छिते कि रूप , रंग , शिक्षण  याबाबतीत अति चिकित्सक न बनता  कौटुंबिक माहिती , आणि इतर माहितीची योग्य खातरजमा झाल्यास लग्नाला होकार देण्यास  काहीच हरकत नाही बाकी, आशीर्वाद द्यायला साक्षात ब्रह्मदेव तर आहेतच. .

डॉ. स्नेहल अवधूत सुखटणकर

 

  6th November, 2019

Leave a Comment