Dr Snehal Sukhatankar's article published in Tarun Bharat on 13/ Nov/ 2019 - Generation Gap

जनरेशन गॅप म्हणजे दोन पिढ्यांमधील  वैचारिक भिन्नता अस सहसा मानलं जात . जीवनशैली बदलल्यामुळे विचार बदलले , राहणीमान बदलले आणि खऱ्या अर्थाने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टीतही बदल होताना दिसत आहेत .  पण एकोणिसाव्या शतकातील पिढी मात्र पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांना जपत एकविसाव्या शतकातील नव्या आव्हानांना  , नव्या बदलांना बऱ्यापैकी आत्मसात करताना दिसत आहे . ही  पिढी सोहळ -व्हवळ पासून आज इंटरनेट पर्यंत सगळ्या बदलांची साक्षीदार आहे . 
             शेजारच्या जोशी काकू एकदा ऑफिसमध्ये आल्या , ८ वि पास पण नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साह दांडगा !!  त्यांची मुलगी लग्नाची होती .. त्या म्हणाल्या मुलगी तर दिवसभर तिच्या ऑफिसच्या कामात असते आणि तिने तिच्यासाठीच्या वर संशोधनाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिलीये त्यामुळे मला बाई ह्या स्थळांच्या फायली काही पाहत बसायच्या नाहीत त्याऐवजी तुमचं ते अँप का काय असत ना इंटरनेट वर ते कस बघायचं सांगा म्हणजे मी घर बसल्या जावयाचा शोध घेईन ...!  आजकाल बरेचसे पालक काळाची गरज म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान घेताना दिसतात . स्मार्ट फोन पासून सोशिअल मीडिया पर्यंत अनेक नव्या गोष्टींमध्ये रस घेताना दिसतात . 
              पूर्वीच्या काळी मुला -मुलींचा घोळका म्हणजे जगावेगळं काहीतरी असायचं , आणि लग्नाचं बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा वधू - वर एकमेकांना लग्नाआधी बघायचेही नाहीत त्यांची प्रत्यक्ष भेट लग्न मंडपातच ! आई- वडिलांनी शोधलेला जोडीदाराच्या गळ्यातच  माळ घालायची आणि हि ब्रह्मगाठ अखेरच्या श्वासापर्यंत निभवायची अशी आपली संस्कारांची श्रीमंती ! आजच्या बदलत्या युगात जेव्हा मुलंमुली शिकलेली आहे, शिक्षणाच्या , नोकरीच्या माध्यमातून तरुण -तरुणींची एकमेकांशी ओळख होते , मैत्री होते , काही वेळा या मैत्रीचं रूपांतर प्रेमातही होत . मग त्यांच्या या नात्याला समाजमान्य लग्नाची पोचपावती देणे हि घराच्या वडीलधाऱ्यांची जबाबदारी असते .. बऱ्यापैकी पालक आपल्या मुला -मुलींच्या निर्णयावर, त्यांच्या नात्यावर  खुश होऊन शिक्कामोर्तब करताना दिसतात . पण आज अशीही काही कुटुंबे आहेत ज्यांमध्ये एकतर वर -वधू संशोधनावरून किंवा मुला -मुली स्वतःहून पाहून पसंत केलेल्या जोडीदारावरून घरात वादविवाद , मानसिक ताण उध्दभवताना दिसतो . त्यामुळे होतंय काय विसंगवाद वाढून कुठेतरी दुरावा वाढतोय ... !
               लग्नाच्या दृष्टीने वधू - वरांची वय वाढण्याचे हेही एक कारण आहे , आई-वडील निघतात संशोधनाला ...मग मेळावे , विवाह संस्था , नातेसंबंधी यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारात  बसणारी काही स्थळे शोधली जातात  पण ज्याला त्या मुलीबरोबर /मुलाबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचे आहे त्यांच्या अपेक्षा काही वेगळ्याच असतात मग ते आई -वडिलांनी शोधलेल्या स्थळांना नाकारत बसतात , किंवा मुलग्याने /मुलीने स्वतःहून पसंत केलेल्या आपल्या भावी जोडीदाराचे काही कर्मठ विचारांमुळे पालकांकडूनही खंडन केले जाते .. मग यातून कौटुंबिक वादविवाद , ताण निर्माण होतात आणि साहजिकच हे प्रकरण जर वर्षानुवर्षे चालत राहिलं तर लग्नाचं वय हि वाढत जात.
         आपण आजचे पालक सुजाण आहातच फक्त गरज आहे ती आपल्या पाल्याची बाजू एकदातरी समजून घेण्याची . आजची पिढी सर्वाथाने स्वतंत्र विचाराची आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भावनिक जोरजबरदस्तीमुळे नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते ..अशा वेळी पालकांनी एक क्षण स्वतःशी संवाद साधावा .. माझं कुठे चुकत का?  मी माझ्या मुलांवर माझ्या अपेक्षा लादत तर नाही ना ? आणि काही गोष्टी स्वीकारणेही गरजेचं असत कि शेवटी त्यांना एकत्र आयुष्य जगायचे आहे तर त्यांचा  जोडीदार त्यांनी स्वतः निवडलेला बरा नाही का ? पालक म्हणून एकदा दोनदा चांगल्या वाईट गोष्टींची पारख मुलांना करून देणे ठीक पण ती जोरजबरदस्ती होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे , एकदा भेटून तरी घ्या त्यांनी शोधलेल्या त्यांच्या भावी जोडीदाराला .. त्यांची बाजू ऐकून तरी घ्या .. कदाचित ती तुम्हाला पटेलही .
              आणखी एका गोष्टीवर इकडे प्रकाश टाकावासा वाटतो ते म्हणजे आपल्या पाल्याच्या विवाहा आधीची मानसिक तयारी !  अलीकडचेच उदाहरण देते , सुनीलच्या वडिलांना सिगारेट ओढायची सवय , चहा पिताना , टीव्ही बघताना , काम करताना , पेपर वाचताना सतत हातात सिगारेट हवीच . पण जस सुनीलच लग्न ठरलं रे ठरलं त्यांनी पाठी अंगणात जाऊन सिगारेट ओढण्याची सवय स्वतःला चालू केली ... कारण विचारताच म्हणाले आजपर्यंत बायकोला , मुलाला चाललं पण येणाऱ्या सुनबाईला चालेलच अस नाही ना! तिला याचा त्रास होऊच शकतो  त्यामुळे आधीच सवय बदलतोय ... नंदा काकूंच ही मोठं कुतूहल मला वाटत तशा शिक्षणाच्या बाबतीत थोडी कमी जाणच  पण मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आल्या आणि म्हणाल्या सासू होण्याची मानसिक तयारी कुठून चालू करावी यावर मला जाणून घ्यायचे आहे कारण सून म्हणून ज्या दिव्यातून मी गेले त्यांची झळ मला माझ्या सुनेला लागू द्यायची नाही त्या अनुषंगाने आताच मानसिक तयारी केलेली बरी नाही का .....?  खरंच मला अशा वैचारिक श्रीमंतीचं खूपच कौतुक वाटत ... असे वडीलधारी मंडळी असतील तर घरात दोन पिढींमध्ये  खऱ्या अर्थाने संवाद घडू शकतो . जे आजच्या काळात आपली कुटुंब पद्धत जपून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे
       त्यामुळे पालकांनो सुजाण तर आपण आहातच पण थोडे सतर्क होण्याची गरज आहे , आपली विचारांची प्रगल्भता हीच आपल्या पुढच्या पिढीला आपण देऊ करण्यासारखी मोठी भेट वस्तू आहे .                                                                                    

 

  13th November, 2019

Leave a Comment