Dr Snehal Sukhatankar's Article published in Tarun Bharat on 19/Nov/ 2019 - Verifying Proposal & Details

माहितीची खातरजमा

                         आजकाल लग्नासाठी स्थळ तर पाहिली जातात अगदी शिगेला जाऊन , अनुरूप वाटणाऱ्या स्थळाशी बोलणी झाल्यावर लग्नाची गडबड चालू होते! अर्थात लग्न जमण्याच्या  प्रक्रियेतील एकूणच चढउतार पाहता पालकांनाही लग्न लवकारात लवकर उरकून टाकायचे असते . त्या गडबडीत आपण कधीकधी बाहेरील गोष्टीना , दिखाव्याला बळी पडून आपल्या मुलाचे -मुलीचे भवितव्य धोक्यात घालायची शक्यता असते . त्यादृष्टीने काही मूलभूत गोष्टींची तपासणी करणे गरजेचे आहे .

१. स्थळा संदर्भातील संपूर्ण कौटुंबिक माहिती :

                  एखादं अनुरूप स्थळ आलं असता भेटण्याआधी  त्या स्थळाची मूलभूत माहिती काढणे गरजेचे आहे , जस कि त्यांच मूळ गाव , नातेसंबंधी , मित्रपरिवार. फोन वरच बऱ्यापैकी आपण ही माहिती त्यांना विचारू शकतो फक्त बोलताना आपली भाषा मृदू आणि गोड असावी . त्यानं काय होतं आपल्याला काहीतरी दुवे मिळण्यास मदत होते त्याआधारे आपण पुढची तपासणी करू शकतो . अगदीच नवे स्थळ असल्यास त्यांच्या नातेवाईकांविषयी, मित्रपरिवाराविषयी  जाणून घेण्याचा प्रयत्न करा जे आपल्या जवळपासच्या वर्तुळात असतील त्यांच्या आधारे आपण या स्थळाची माहिती काढू शकता . काहीवेळा स्थळाची मूलभूत माहिती आवडली असता अंतिम होकार कळवण्याच्या आधी दोन्ही कुंटुंबानी एकदा आपापल्या घरी एकमेकांना भेटून घ्यावं जेणेकरून स्थळाचे राहणीमान , जीवनशैली , सांपत्तिक स्थिती, नाती गोती  याचा अंदाज येऊ शकतो. कौटुंबिक माहितीची खातरजमा होणे खुपच गरजेचे आहे , काही कुटुंबे कर्मठ तर काही खूपच उदारमतवादी संस्कारांची असू शकतात आणि अशा वातावरणात जर आपली मुलगी जात असेल तर ती  समायोजित होऊ शकते का याचा आढावा आपण घेऊ शकता .

 २. उपवर मुला - मुलींची माहिती :-

                  एकदाका कौटुंबिक माहिती जम्याची आहे अशी खात्री झाली कि ज्याच्याशी आपल्या पाल्याला लग्न करायचे आहे त्यांची माहिती काढणे अतिशय गरजेचे असते . किंबहुना यात थोडा वेळ घेऊनच पुढचा होकार किंवा नकार ठरवलेला बरा . आधीच्या काळी कुटुंबामधील विश्वासहर्ता पाहून लग्न केली जायची , लग्न झालेल्या जोडप्यामध्ये काही वितुष्ट आलेच तर कुटुंबातील वडीलधारे त्यांना समजावून संसाराचा गाडा पुढे नेत .पण आज शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र्य आणि निर्भीड असलेल्या या पिढीला लग्नांनंतर अशी ऍडजेस्टमेंट  करणे थोडे अवघड जाऊ शकते. अर्थात आपण बरीचशी उदाहरण आपल्या आजूबाजूला पाहिलेली असणारच ज्यांमध्ये काही कारणास्तव  लग्नाआधी  लपवून ठेवलेल्या वास्तविकतेचा उलगडा होताच लग्नाची शोकांतिका घटस्फोटापर्यंत जाते . अशावेळी त्या मुला-मुलीचे आयुष्य तर विस्कळीत होतेच पण संपूर्ण कुटुंबाला याची झळ सोसावी लागते .नकळतच ते संपूर्ण कुटुंब  दोषारोपणाच्या  आणि पश्चातापाच्या आगीत होरपळून निघत , त्यातून काहीजण दैवीकृपेने लवकर बाहेर पडतात तर काहीजणांना आयुष्याची अनेक वर्षे गमवावी लागतात या धक्क्यातून  बाहेर पडायला ! त्यामुळे काही गोष्टीची कसून तपासणी करणे खूप गरजेचे आहे .  

                            मी पुन्हापुन्हा सांगते जे पालक तक्रार करतात कि हि आजची मुले कितींदा  भेटतात लग्नाआधी? आमच्यावेळी असा काही नव्हतं बुवा ! असे शेरे मारताना दिसतात त्यांना सांगू इच्छिते असे भेटणे आता काळाची गरज ठरलेली आहे . अर्थात वधू -वरानीही या आपल्या भेटीचा उपयोग सतर्कतेने काही गोष्टींची पुष्टी मिळ्वण्याबाबत केला पाहिजे अर्थात भावी आयुष्याच्या दृष्टीने काही गोष्टींचा खुलासा तुम्हा दोघात होणे अत्यंत महत्वाचे असते. जस कि एकमेकांची आवड आणि जीवनशैली , आपल्या भविष्यतील योजना आणि प्राधान्यक्रम , काम करण्याचे ठिकाण , वार्षिक उत्त्पन्न , राहण्याचे ठिकाण , घरातील लोक यावर स्वतंत्रपणे चर्चा व्हायला हवी .

                        लग्नाच्या दृष्टीने तरुण तरुणी भेटताना आपल्या मित्रपरिवारासहित एकदा भेटणं खूप गरजेचं असत यातून आपला होणारा जोडीदार कशा वर्तुळात राहतो , त्याच्या सवयी , राहणीमान, बोलण्याची शैली याचा आपण अंदाज घेऊ शकतो , जेणेकरून त्याच व्यक्तिमत्त्व कळण्यास मदत होऊ शकते .

        अनेकदा भेटल्याने काही शारीरिक , मानसिक आजार , अनुवांशिक आजार, संसर्गजन्य आजार , काही व्यसन किंवा त्यातून भविष्यात उत्पन्न होणारे रोग  यांचीही  कल्पना येते . आणि आपल्याला त्यादृष्टीने पुढचे पाऊल उचलणे सोयीस्कर होते .

               आणखी एका मुद्द्यावर चर्चा उपवरमुला -मुलींमध्ये व्हायला हवी जी ९९% केसीस मध्ये  होतच नाही पण ती  पुढे जाऊन एक मोठा तिडा निर्माण करू शकते ती म्हणजे  संतती .  काही सामाजिक बंधन म्हणा ! यावर चर्चा करण टाळलं जात .  मनातील भीती , काही न्यूनगंड , पाश्च्यात्य  विचाराचा शिरकाव , आपल्या करिअर विषयीची  महत्वकांक्षा  अशा अनेक कारणांमुळे  बऱ्याच्याशा तरुण -तरुणींना आज मुले जन्माला घालून त्यात अडकणे मान्य नाहीये . पण हा निर्णय जर जोडप्याचा एकत्र असेल तर बरं पण यापैकी एकाला जर मूल हवं असेल आणि दुसऱ्याला नको तर मग त्यांच्या संसाराला पूर्ण विराम लागलाच म्हणून समजा !

            त्यामुळे लग्नाच्या दृष्टीने उपवर-मुला-मुलींनी वरील सर्व मुद्यांवर शांतपणेविचार करून  डोळसपणे चर्चा करणे अनिवार्य आहे .    

 

डॉ स्नेहल अवधूत सुखटणकर  

[email protected]

 

  20th November, 2019

Leave a Comment