Dr Snehal Sukhatankar Article published in Tarun Bharat 14/jan/2020- navya yugatil apan

नव्या युगातील आपण / बदलते आपण / व्यवहारचातुर्य

                           लग्नाच्या दृष्टीने त्यातल्यात्यात  ठरवून केलेल्या लग्नात तरी ९९% कुंडलीची मदत घेतली जाते . तसे आपल्याकडे ज्योतिष शास्त्रात पारंगत तज्ज्ञ मंडळी बरेच आहेत , ज्यांच्या मदतीने वधू - वरांची कुंडली अभ्यासून काय तो निर्णय घेतला जातो .  पण आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त वेळापत्रकांमध्ये प्रत्येक वेळा ज्योतिष तज्ज्ञांकडे जाणे बऱ्याच पालकांना जमत नाही मग तथाकथित कुंडली मिलनाच्या साफ्टवेअर्सची मदत घेऊन घर बसल्याच वधू - वरांची कुंडली जुळवून बघितली जाते . अगदी ओघमात हे सॉफ्टवेअर काम करत . पण आपल्या ज्योतिष शास्त्रात अनेक गुंतागुंतीचे पडताळेही असतात पण अशा सॉफ्टवेअर्स मध्ये हे पर्याय अगदी निवडक असतात मग ते निर्णयही त्याच आधारावर देतात आणि पर्यायाने बरेचसे पालक चांगल्या स्थळांना अशा चुकीच्या अंदाजामुळे मुकतात .

           मुळात कुंडलीमध्ये गुणमीलनाच्या दृष्टीने ८ गुणांचा मुख्यत्वाने अभ्यास केला केला जातो . ते म्हणजे वर्ण , वस्य , तारा ,योनी , ग्रहमैत्री , गण , भृकुट आणि नाडी यांचा समावेश होतो . त्याच बरोबर गोत्र , पोटशाखा यासारख्या अनेक गोष्टींचा चिकित्सकपणे विचार केला जातो    पण जसा काळ बदलत चाललेला आहे त्याप्रमाणे लोकांची विचारसरणीही बदलत चाललेली आहेत . त्याप्रमाणे काही गोष्टींचा फेरविचार जरूर करावा असं मला वाटत . त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गोत्र .

१. सगोत्री  लग्न

हिंदू  संस्कृतीतील गोत्र म्हणजे प्रत्यक्षात सत्ययुगातले ऋषीमुनी . ज्यांना मूळ पुरुष म्हणूनही संबोधिले जाते. त्याकाळापासून म्हणजे सत्ययुगापासून सगोत्री लग्न न करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे एकाच मूळ घराण्यातील वधू -वर असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या संतांना मध्ये  काही गुणसूत्रीय अदलाबादली होण्याची शक्यता असते . जेणेकरून होणाऱ्या संतांना मध्ये काही अनुवांशिक विकृती येऊ शकतात , जे शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्ट्या १००%  तथ्य आहे. 

                            पण  सत्ययुगात हे ऋषीमुनी होऊन गेले असा आपण मानतो .   त्यानंतर झाले त्रेतायुग मग द्वापारयुग . . आणि आता आपण आहोत कलियुगाच्या उत्तरार्धात . हजारो -लाखो वर्षांचा काळ लोटला ...... त्यादरम्यान अनेक परकीय आक्रमणे झाली , कित्येक संस्कृतींना संपवण्यात आलं ... अनेक स्त्री - पुरुषांना बाटवण्यात आलं .... आंतरजातीय विवाह झाले ... त्यामुळे वास्तविक पाहता आतापर्यंत या सर्व गोत्रांचे    संकरितकरण  झालेले आहे. त्यामुळे सगोत्री लग्न हे दुष्कारकच  असत  असा मानणं चुकीचं ठरेल . अगदीच एका कुटुंबातले , अगदी जवळच्या नात्यातल्या वधू - वरांचे विवाह शक्यतो टाळावेत. पण दोन पूर्णतः वेगळ्या कुटुंबातील वधू-वरांचे विवाह सगोत्री जरी असल्यास होणाऱ्या संततीवर सगोत्रीकरणाचा दुष्परिणाम होत नाही हे आजच्या वैद्यकीय शास्त्रानेही दाखवून दिलेले आहे.

                   त्यामुळें  लग्न ठरण्याच्या दृष्टीने वधू -वरांची कुंडली जुळत असल्यास ,त्यांचे विचार एकमेकांबरोबर जुळत असल्यास निव्वळ सगोत्र म्हणून विवाह टाळणे योग्य नव्हे !!!!आजच्या  अधुनिक , वैज्ञानिक समाजाने यावर विचार जरूर करावा अशी विनंती.

२ पोटशाखेसाठीचा  अट्टाहास :

           बऱ्याच वेळा पालक आपल्या पोटशाखेतीलच स्थळ हवं म्हणून आपल्याच समुदायातील दुसऱ्या पोटशाखेच्या अनुरूप स्थळांना नाकारताना दिसतात . त्यांच मत असत आमच्या पोटशाखेचे संस्कार , रीतीभाती वेगळ्या आणि, त्याच्या वेगळ्या. मग मुले कशी एकमेकांच्या कुटुंबात समायोजित होतील आणि बऱ्याच वेळा जातीचं तर सोडा पोटजाती मध्येही उच्च - निच्च चे टोमणे मारताना काही लोकांना धन्यता वाटते पण त्यांना कळत नाहीये यामुळे वधू - वरांची लग्नाची वय वाढताहेत . जरा डोळसपणे विचार केला तर जाणवेल एकाच घरात राहणाऱ्या  दोन भावंडांच्या विचारसरणीत , राहणीमानात , आहार - विहार मध्ये किती फरक असतो मग दोन कुटुंबातील संस्कार वेगळे असणे साहजिकच आहे . पोटशाखेचा  खूप जास्ती बाऊ करून लग्नाची वय वाढवून घेऊन नंतर आंतरजातीय विवाहाला स्वतःहून संमती देणारे अनेक पालक आज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतील .

             त्यामुळे लग्न जमण्यातील हे चढ उतार आणि त्यातून उद्भवणारा मानसिक ताण जर कमी करायचा असल्यास  कालानुरूप आपण बदलणे अपेक्षित आहे जेणेकरून लग्न जमण्याची हि प्रक्रिया खूप जास्ती जटिल करत बसण्यापेक्षा  व्यवहारचातुर्याने अत्यंत सहज , सोपी आणि आनंददायी  होईल .

   डॉ स्नेहल अवधूत सुखठणकर

  23rd January, 2020

Leave a Comment