Dr Snehal Sukhatankar Article published in Tarun Bharat 16/jan/2020- amulya soundarya

“अमूल्य सौंदर्य”

                     " सौंदर्य " ह्या शब्दाचा खरा अर्थ मला नव्याने उमगला . सौंदर्याची व्याख्या हि शारीरिक परिपूर्णतेवर असते असा बऱ्याच जणांचा समज असतो , पण मानसिक किंवा भावनिक सौंदर्याचा  आपल्यापैकी कितीनी विचार केलाय ??? केलाय का कधी ?

                     आजकालच्या रंजक जगात ज्यामध्ये शारीरिक सौंदर्य ,   आधुनिक पेहराव , आकर्षक शरीरयष्टी कशी मिळवली जाईल आणि त्यामुळे किती लोक आपल्याकडे आकर्षित होतील याकडे बऱ्याच जणांचा कल असतो . त्यात तरुण पिढीबरोबर मध्यम वयीन आणि वयस्कर मंडळींचाही बऱ्यापैकी समावेश असतो . 

                   लग्नाचा विषय काढाल तर कुंडली आणि घराण्याची , वधू - वरांची माहिती नंतर पाहिली जाते , पहिला मान मिळतो तो फोटोला . फोटो आवडला तर पुढचे नाही तर सगळं मुसळ पाण्यात . ! मला एक आश्चर्य कारक अनुभव सांगायला आवडेल , एक ५० वर्षाचा युवक लग्नासाठी मुली नाकारत होता कारण त्याला येणाऱ्या मुलींचे फोटो हे साडीतले होते . आता ५०शी कडच्या मुलासाठी येणाऱ्या मुलींचे संस्कार हे साडीतलेच असणार , जीन्स , स्कर्ट्सचे थोडीच असणार ? ( काही अपवाद वगळता ) . मग आता तुम्ही सांगा आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा तुम्ही जीवनसाथी शोधताय , इथे कपड्याना महत्व द्यायचं कि त्यांच्यातल्या संस्कारांना , समजूतदारपणाला . ???

                      पण जेव्हा विषय येतो शारीरिक व्यंगाचा , आपल्याकडे अशा वधू - वरांना पाहण्याचा दृष्टीकोनच बदलतो . चिंता , काळजी , सहानभूती ,टोमणे ,अडजस्टमेंट्स अशा अनेक शब्दांच्या राशी बाहेर पडायला लागतात . आमच्या एका  वधू - वर मेळाव्यातील किस्सा सांगते , स्वाभाविकपणे वधू - वर मेळावा म्हणजे वधू - वरानी स्वतः स्टेज वर जाऊन स्वतःबद्दल बोलायचे , आपल्या अपेक्षेबद्दल बोलायचे असे अपेक्षित असते , पण जेव्हा वधू - वरांची नावे घेतली जात होती , त्यामध्ये बहुतेक उपवर मुलं - मुली हजर असूनही स्टेजवर जायला / बोलायला लाजत होती . पण त्यामध्ये एक अशी मुलगी स्टेजवर आली जिच्या डाव्या पायाला अपघातामुळे कायमचे व्यंग आले होते . पण ती मुलगी इतकी हसरी , निरागस आणि स्वच्छ मनाची होती , तिने आपली सारी कहाणी , माहिती तथा अपेक्षा न डगमगता सर्वांपुढे मांडल्या . ती एकत्र कुटुंबातून आलेली .  आई-वडील , आजी -आजोबा , काका -आत्या , भावंडं असं भरलेलं घर . शिक्षणही बरं होत . अपघाताने काही काळ ती कोलमडली खरी कारण बऱ्याच अपेक्षांचा क्षणात भंग झाला होता , पण शारीरिक व्यंगाने  खचून न जाता तिने पुन्हा जोशाने आयुष्याला सुरवात केली . आता एका मल्टि नॅशनल कंपनीत ती नोकरी करते , घरातही बरीच मदत करते . तिने बोललेलं एक वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहे जे नकळत आपल्याला एक मोठा संदेश देऊन जात " माझं शारीरिक व्यंग हि माझ्या आयुष्यातील एक घटना आहे  ,माझं  आयुष्य नव्हे ! मला माझ्या आयुष्यात अनेक छान रंग भरायचे आहेत आणि ते मी भरतेच आहे , मी अशा जोडीदाराच्या शोधात आहे जो मला हे रंग भरण्यात मदत करेल , एकमेकांच्या मदतीने आपण हा आयुष्याचा प्रवास सुखद करू "

                      तिच्या बोलण्यात कोणत्याही प्रकारची ढोबळता नव्हती किंवा अपेक्षांची अतिशोयोक्ती !!! संपूर्णतः निरागसता ! तीच बोलणं झालं , सारा हॉल स्थब्ध होता . पण नंतर तिथल्याच एका वकील मुलाने तिला मागणी घातली . त्यांचे लग्न होऊन आज ५ वर्षे झाली , एक गोंडस मुलगाही आहे , आणि त्यांचा संसार अगदी सुखाचा चाललाय . ती नोकरी करते , घर , कुटुंब  याकडे अगदी व्यवस्तितपणे लक्ष देते , यामध्ये तीच व्यंग कोठेच , कधीच आडवं आलं नाही असं तिचा नवरा सांगतो .

                             या घटनेतून इतकंच सांगावस वाटत कि समाजातल्या अशा उपवर मुला - मुलींनो शारीरिक व्यंग हि एक अवस्था आहे , आयुष्य नव्हे , संकटे येतात , बरच काही घेऊन जातात तर बरच काही शिकवून आणि देऊन हि जातात त्यामुळे कोणत्याही , कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सबळ राहू शकता यावर विश्वास ठेवा . खचून न जाता नव्याने आयुष्याला सुरवात करा मग बघा तुमच्या आयुष्यातील इंद्रधनुष्याला पुन्हा रंग भरणारा  जोडीदार लवकरच तुम्हाला भेटलं .   

डॉ स्नेहल अवधूत सुखठणकर

  23rd January, 2020

Leave a Comment