Dr Snehal Sukhatankar Article published in Tarun Bharat 26/Nov/ 2019 - A step towards Positivity

एक पाऊल सकारात्मकतेकडे !

                             आजकाल लग्न ठरण्याच्या मार्गतील  एकूणच आव्हाने पाहता आज गरज आहे विचार करण्याची कि लग्न जमवताना चुकते कुठे ?? केलाय का कधी यावर विचार ..? का येतात  नकार ? का उपवर मुला -मुलींची भेट होत नाही  ? का सगळं पसंत असूनही कधी-कधी ठरलेली लग्न तुटतात ? जो पर्यंत आपण ह्या ज्वलंत प्रश्नांची उत्तर शोधत नाही तोपर्यंत ही मानसिक ओढाताण अशीच चालू राहणार .

                              सखोल विचार केला असता आपल्या लक्षात येईल कि पहिल्यांदा नकाराची घंटा स्थळा संदर्भात फोन करायचा कि नाही इथूनच चालू होते , फोन करायच्या आधीच मनात शंकांचं काहूर माजलेले असते .. समोरचे व्यवस्थित बोलतील का ? काही उलट -सुलट बोलणार तर नाहीत ना ? सरळ सरळ नकार दिला तर ? उत्तरच दिल नाही तर ?.. एक का दोन असंख्य प्रश्न पालकांच्या मनात गोंधळ घालत असतात . पण या प्रश्नांवर मात  करून जरी फोन केला तरीही बऱ्याच वेळा बोलताना आत्मविश्वासाचा अभाव आणि कुठेतरी नकाराची भीती यामुळे बोलतानाहि मोकळिकता नसते त्यामुळे काय होतंय आपण मूलभूत गोष्टी सांगण्याच्या नादात बऱ्याच वेळा आपल्या स्थळातील वरचढ म्हणा किंवा सकारात्मक गोष्टी सांगण्याच विसरतो . त्यामुळे  समोरच्या स्थळाकडून बऱ्याच वेळा नकार अपेक्षितच असतो . अशावेळी जर खरंच आपल्याला ही लग्न ठरवण्याची प्रक्रिया सोपी करायची असेल तर काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यायला हवी ..

१अनुरूप स्थळांची निवड :

                             बऱ्याच वेळा लग्नासाठी काही ढोबळ अपेक्षा ठेवून तशाच मुलींना किंवा मुलांना फोन केला जातो पण यात आपण त्या स्थळाच्याही काही अपेक्षा असू शकतात आणि आपण त्यात बसतो का हे पाहणं  राहून जात त्यामुळे लग्नासाठी स्थळांना फोन करण्याआधी एकदा स्वतः कडे , स्वतःच्या स्थळाकडे नीट न्याहाळून पहा , आपल्यातील  सकारात्मक आणि नकारात्मक गुणांचा अभ्यास करा आणि त्याला साजेशीर स्थळांची यादी बनवा .

२. स्थळांना फोन करताना :

                            बऱ्याच वेळा पालकांकडून इकडेच चुका होताना दिसतात , ज्यामुळे बरीचशी स्थळे फोनवरच नाकारली जातात त्यामुळे मुलां - मुलींची प्रत्यक्ष भेटच होत नाही . पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्थळाला समोरच्याने का होकार दिला पाहिजे असे काय प्लस पॉईंट्स आपल्यात आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आणि ते कोणत्या शब्दात मांडले पाहिजे हे ठरवले पाहिजे . प्रत्येकाची बोलण्याची एक शैली असते पण आपली बोलण्याची शैली दुसऱ्याला खटकत तर नाही ना याचा विचार करावा . बऱ्याच वेळा अजाणतेपणी आपल्या बोलण्याच्या शैलीमुळेंहि आपण समोरच्याला उद्धट वाटू शकतो त्याचाच परिणाम बोलणं संपायच्या आधीच समोरच्यांकडून नकार येतो . लग्नासारख्या अतिसंवेदनशील नात्याची सुरवात करताना पालकांनी आवर्जून आपली बोली गोड आणि मृदू ठेवायला हवी , समोरच्याच नीट ऐकून घ्यावं आणि आपली बाजू त्यांना अत्यंत सौम्यपणाने पटवून द्यावी अगदी नकार जरी द्यायचा असेल तरीही . त्यामुळे काय होईल लग्न जरी जमलं नाही तरीही आपल्या सद्भावनेमुळे त्यांच्या बघण्यात जरी दुसरं कोणतं स्थळ असेल तर ते आपल्याला सुचवू शकतात . म्हणजे बघा हे स्थळ जमत नसल तरीही आपण बाकीचे दरवाजे उघडतोय जेणेकरून आणखी काही स्थळाचे  आपल्याला संदर्भ मिळू शकतात.

                            पालकांनी आणखी एक गोष्ट आवर्जून करायला हवी ते म्हणजे फोनचे उत्तर !!  जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला स्थळा   संदर्भात फोन करते तेव्हा त्याला आपलं स्थळ अनुरूप वाटलेलं असत  म्हणूनच त्यांनी कॉल केलेला असतो . आणि आपल्याकडून त्यांना काहीतरी ठोस उत्तराची अपेक्षा असते अशावेळी पालकांनी योग्य ती वेळ मागून घेऊन त्या वेळेत उत्तर देणे गरजेचे असते, उगीचच त्यांना ३-४ वेळा फोन करायला लावून तंगवत ठेवू नये . कोण जाणे आपल्यावरहि ही परिस्थिती येऊ शकते त्यामुळे पालकहो वेळीच जागे व्हा आणि एकमेकांना उत्तर द्या !

     ३. प्रत्यक्ष भेट :

                            बऱ्याच वेळा लग्नाच्या दृष्टीने कोठे भेटायचे यावरूनही गोंधळ उडताना दिसतात . आजकाल नोकरीसाठी बाहेर असणारे तरुण-तरुणी आईवडिलांच्या परवानगीने स्वतः पहिल्यांदा भेटतात आणि त्यांचे विचार पटले कि मग कुटुंबे भेटतात . बऱ्याच वेळा पालक तक्रार करताना दिसतात कि दोनदा हे भेटले तरीही त्यांना अजुनी वेळ हवाय म्हणतात आम्हाला काही खरं वाटत नाहीये काय करावं ? पण मी तुम्हाला सांगते आजची पिढी, त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीचे आहेत त्यांना त्यांचा साथीदार निवडायच्या आधी त्यांच्यातील अनुकूलता आणि प्रतिकूलता जाणून घ्यायची असते त्यादृष्टीने अनेक वेळा भेटीने एकमेकांचे विचार , राहणीमान , मित्रपरिवार कळायला मदतच होते यानंतर ते ठरवू शकतात आपण या व्यक्ती बरोबर आपले संपूर्ण आयुष्य घालवू शकतो का ? किंबहुना अशा भेटी आजच्या काळात खूप गरजेच्या आहेत.

                         बऱ्याच वेळा काही पालक किंवा उपवर मुलं -मुली स्थळाची माहिती आवडलेली असते पण  फोटो पाहून नकार देताना दिसतात  .. पण असे केल्याने कदाचित आपण चांगले स्थळ गमावण्याची शक्यता असते . काही लोक फोटोजेनिक असतात काही नसतात .. त्यावेळी प्रत्यक्ष भेटीने पुढचा निर्णय घेतलेला बरा ! भेटणं म्हणजे लग्न ठरवणं नाहीं , त्या स्थळाला आपण नकार कधीही देऊ शकता , पण कदाचित भेटल्यानंतर जर एकमेकांचे विचार पटले ,एकमेकांना ते दोघे आवडले तर लग्नही होऊ शकते . त्यामुळे भेटण्याचा कार्यक्रम लग्नाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची पायरी असते .

४.  लग्नाची बैठक :

                           लग्नाची बैठक हि खऱ्या अर्थाने ठरलेल्या विवाहाला दिला गेलेला शिक्कामोर्तब असतो . पण काही संकुचित विचारांमुळे हि बैठक तुटू शकते आणि त्यामुळे ठरलेले लग्नही !!. याला अनेक करणे असू शकतात , देणं-घेणं ,मान-पान , लग्न कोठे झाले पाहिजे ,कोणातर्फे झालं पाहिजे ?  किती लोकांचा समावेश झाला पाहिजे , खर्चाच बजेट काय असणार ..? हे साधारणतः बैठकीत ठरत . पण पालकांनो एक गोष्ट लक्षात घ्या आज लग्न जमण्यातच इतके अडथळे येताहेत त्यात ठरलेले लग्न अशा क्षुल्लक कारणावरून मोडणे बरे नव्हे . त्यामुळे बैठकीत घेतला जाणारा निर्णय त्या जोडप्याच्या भावी आयुष्यात कटुता निर्माण करणार नाही याची खबरदारी घरच्या वडीलधाऱ्यांनी घ्यायला हवी बाकी आपण सुजाण आहातच .

           त्यामुळे लग्नासाठी स्थळ बघण्याच्या प्रक्रिये पासून ते बैठकी पर्यंत काही नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे , जेणेकरून हि प्रक्रिया आपल्याला डोकेदुखी न होता खऱ्या अर्थाने नवीन नाते जोडण्याचा अभूतपूर्व सोहळा  ठरेल. 

                                     डॉ . स्नेहल अवधूत सुखटणकर

[email protected]

 

 

  29th November, 2019

Leave a Comment