Dr Snehal Sukhatankar,s article published in Tarun Bharat 31/Dec/2019- apeksha navya yugachi

"नवे वर्ष , नवा संकल्प "

                     झाडावरच प्रत्येक पिकलेलं पान गळून पडणे हा निसर्ग नियम आहे पण ते गळून पडणार पान नकळतपणे चाहूल देऊन जात त्याठिकाणी फुटणाऱ्या नव्या पालवीची , नव्याने जन्माला येणाऱ्या कोवळ्या पानाची . आणि बहरणार हे नवीन पान प्रचंड ऊर्जाशक्तीच्या बळावर अगदी दिमाखात त्या झाडावर सळसळत राहत ते अगदी पिके पर्यंत .. कोष्टी किड्याचंच घ्या , भिंतीवर चढण्यासाठी अगदी ९९ वेळा असफल होऊन हि निराश न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहत आणि १०० व्या वेळेला अखेर भिंतीवर चढण्यात सफल होत आणि आपलं स्वतःच घरकुल म्हणजेच जाळ विणून निरंतर आनंदाची जणू अनुभूतीच साजरी करत असत . सरपटणारा सापही काळानुरूप आपली कातडी बदलतो आणि पुन्हा नव्याने सुरवात करतो. एवढच काय तर एखाद लहान बाळ जेव्हा चालायला सुरवात करत असत तेव्हा किती वेळा पडत , बऱ्याचवेळा बाळाला लागत , दुखापत होते पण म्हणून का बाळ चालायचं थांबत , ते आपले प्रयत्न चालूच ठेवत अगदी व्यवस्थित चालायला लागे पर्यंत ... म्हणजे बघा पडणं , हारण ,अपयशी होणं , काहीतरी आयुष्यातून सुटून जाणं आणि त्याठिकाणी काहीतरी  छान , उत्पादनात्मक उदयाला येणं हि  निसर्गाची किमया आपल्याला पावलापावलावर पाहायला मिळते .

                              अबोल , अचल वृक्षांपासून ते किड्या मकोड्यांपर्यंत सर्वच जण निसर्गच्या या चक्राला अजाणतेपणे अनुसरीत जातात . पण प्रगाढ विचार शक्तीचा भंडारा असणारे आपण मनुष्य  दुर्दैवाने आपल्या वयासोबत निसर्गच्या या नियमांना कुठेतरी पार विसरून जात आहोत आणि म्हणूनच आपल्यापैकी बरेचजण अपयशाला खचून जाऊन हार स्वीकारतात किंवा आपल्या अपयशाचं खापर कोणा दुसऱ्याच्या माथ्यावर मारतात .

                आता आपल्या लग्नाळू वधू - वर तथा त्यांच्या पालकांचंच घ्याना .. सततचा येणारा  नकार , बोलण्यातून होणाऱ्या गैरसमजुती , त्यातून दिली जाणारी दूषण यासारख्या अनेक नकारात्मक गोष्टींच्या अथांग सागरात गटांगळ्या खात असणाऱ्या अनेक वधू - वर तथा पालकांना  सकारात्मक आशेचा किरण दिसतच नाही किंबहुना त्यांना तो पाहायचंच नसतो . आज बऱ्याचशा लग्नाळू वधू वरांच्या पालकांकडून तक्रार येताना दिसते कि स्थळासाठी फोन केला असता समोरचे व्यवस्थित बोलत नाहीत .. नीट काही उत्तर देत नाहीत , काहीकाही वेळा तर उद्धट स्वरात बोलले जाते मग फोन करायचाच कशाला , कंटाळा आलाय आता या संशोधनकार्याचा .

                    आज शिक्षणाबरोबर वधू - वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे खरं असलं तरीही सतत नकार देणाऱ्या आणि घेणाऱ्या वधू -वरांच्या मनात लग्न लवकारतलवकार होण्याची प्रबळ सुप्त इच्छा असतेच . मात्र हा  नकारत्मकतेचा धपाटपसार बाजूला सारण्याची वैचारिक जागुरकता कमी होताना दिसतीये . म्हणजे बघा आपण आपल्याला अनुरूप वाटणाऱ्या ३-४ स्थळांना फोन केला आणि दुसऱ्या बाजूने नकार किंवा उद्धट स्वर येत असेल तर समजू शकतो पण हे सत्र जर प्रत्येक स्थळाबाबत पुन्हा पुन्हा घडत असेल तर मात्र पालकांनो किंवा वधू - वरानो वेळ आहे स्वतःचे परीक्षण करण्याची ! आपण बोलण्यातून , भाषा शैलीतून समोरच्याला आपल्याकडे उद्धट स्वरात बोलण्यासाठी आमंत्रण तर देत नाही आहोत ना यावर अवलोकन करण गरजेचं आहे .

          अनेक मुली त्यांचा  सावळा  रंग म्हणा , किंवा कमी उंची म्हणा , किंवा लठ्ठपणा म्हणा या शारीरिक बाबीना पाहून येणाऱ्या नकारला ऐकून  इतक्या खचून जातात कि त्यांची देहयष्टीचं त्यांचा  सगळ्यात मोठा न्यूनगंड ठरतो  आणि हळूहळू अशा मुली स्वतःला कोणत्याही कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यक्रमापासून  अलिप्त ठेवत जातात आणि हे सगळं घडत असत टप्याटप्याने अगदी अजाणतेपणी . अशा मुलींना मला आठवण करून द्यावीशी वाटते आज आपल्या अवतीभोवती शारीरिक दृष्ट्या इतकीकाही रंजलेली गांजलेली माणसे आहेत , कोणाचा जन्मता डोळाच नाही , कोणाला ऐकूच कमी येत तर कोणाची वैचारिक वाढ जन्मताच खुंटलेली आहे .. अशा व्यक्तीकडे पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल निसर्गाने तुम्हाला किती परिपूर्ण आरोग्य  प्रदान केलेलं आहे ते . त्याचा आदर करा , आनंदाने स्वीकार करा , आधी स्वतःवर प्रेम करायला शिका मग बघा तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा तुमचा हक्काचा जोडीदार तुम्हाला नक्कीच भेटेल . चेहऱ्यावर प्रसन्न कळा आणि ओठांवर स्मित हास्य या सारखा दुसरा मौल्यवान दागिना नाही .  आणि जी मुलगी हा दागिना परिधान करते तिला नकार कोणी देऊच शकणार नाही .

                               बऱ्याच वेळा भूत काळात घडलेल्या काही वाईट घटनांचा इतका जबरदस्त पगडा वधू - वरांच्या मनावर बसलेला असतो कि त्यांना त्यातून बाहेर पडणे अशक्यप्राय होऊन जात . घटस्फोट झालेल्या किंवा काही कारणास्तव संसारात नैराशयत्व आलेल्याना हा अनुभव सर्रास येतो आणि यातून ते बाहेर पडण्याऐवजी आपल्या जोडीदाराबरोबरच , आपल्या नशिबाला दूषण देत बसतात पण त्यातून होतंय काय कि आणखी नैराश्यत्व. बरीच मंडळी अशा आविर्भावात जगत असतात कि हि काळीकुट्ट अमावास्येची रात्र जणू त्यांच्यासाठी कायमचीच थांबली आहे . अहो विचार करा काळ्याकुट्ट रात्री  नंतरच सकाळच्या पहिल्या किरणांची आपल्याला किंमत कळते ना ? आणि  अमावास्येच्या रात्रींनंतरच चंद्र कलाकलाने जास्त तेजस्वी होत जातो . आयुष्य म्हणजे अनेक उतार - चढाव येणारच , अनेक अमावस्या - पौर्णिमेला सामोरे जावे लागणारच मग अशा वेळी एका ठिकाणी थांबण्यापेक्षा प्रवाहाबरोबर वाहत जाणे कधीही चांगले . आयुष्यात एकदा आलेल्या कटू अनुभवावरून तुम्ही संपूर्ण आयुष्याला नकारात्मक धोरणांनी  जखडून नाही ठेवू शकत , थोडा विचार करा , तोडून टाका कडू आठवणींचे पाश आणि सज्ज व्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या नव्या माणसांबरोबरच नव्या गोड आठवणींचे स्वागत करायला .

               एक सकारात्मक विचार कितीतरी अडचणींवर सहज मात देऊ शकतो .  नकारात्मक विचार आणि नकारात्मक दृष्टीकोन ठेवून आजपर्यंत कोणाचही भलं झालेलं नाही याला काळ साक्षीदार आहे तेव्हा २०१९ मध्ये घडलेल्या वाईट घटनांना , अनुभवांना, विचाराना  तिलांजली देऊ आणि चांगल्या अनुभवाची , आठवणींची शिदोरी पाठीशी बांधून २०२०च्या सुवर्ण वर्षात पदार्पण करूया . आपल्यातील नकारात्मक गुणाना समजून घेऊन त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करूया , सकारात्मक  विचारांचा पाठपुरावा करण्याचा निश्चय करूया , येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर धाडसाने , हिम्मतीने सामोरं जाण्याचं बळ नव्याने आपल्यात जागृत करूया . आणि सगळ्यात महत्वाचं आधी स्वतःवर प्रेम करायला शिकूया म्हणजे हे संपूर्ण जगचं प्रेममय होऊन जाईल. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनो २०१९ मध्ये आलेल्या नकारात्मक उत्तराना  किंवा नकारला विसरून २०२० मध्ये नव्या जोशाने , नव्या संकल्पाने संशोधनाला प्रारंभ करा बाकी आशीर्वाद द्यायला साक्षात ब्रह्म देव तर आहेतच .

                             नववर्षाच्या सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा , येणार वर्ष आपल्या सर्वाना भरभरटीचा , समृद्धतेच आणि आरोग्यदायी  जावो आणि उपवर वधू - वरांना त्यांचा जोडीदार लवकरात लवकर मिळो  हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

 डॉ. स्नेहल अवधूत सुखठणकर

 

  16th January, 2020

Leave a Comment