Dr Snehals Article Published in Tarun Bharat 10/Dec/2019 - Vayacha Bhan

वयाचं भान

                    काळ कोणासाठी थांबत नसतो , तो आपल्या गतीने पुढे जातच असतो ..पण आपण माणसं  कोठेतरी लग्नाच्या दृष्टीने वेळेचं आणि वयाचं भान विसरत आहोत . मागच्या लेखात आपण ३५ वर्षापुढील उपवर वधू -वरांच्या मनस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जे चित्र दिसतंय यातून एकच बोध घ्यायला हवा, हातात वेळ असतो तेव्हाच शहाणे होणे हितकारक . मुळातच इतका उशीर होऊच देऊ नये जेणेकरून मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागतील .

             सहसा आपल्याकडे मुलींच्या  लग्नाचं वय चालू होत  २२- ३० आणि मुलांचं साधारणतः २६- ३३... ज्यामध्ये अगदी निवांतपणे संशोधनासाठी  पुरेसा वेळ हातात असतो पण या वेळेचा सदुपयोग करण्याच्याऐवजी बरेचसे वधू -वर आणि त्यांचे पालक काही ढोबळ विचारांचा पगडा , नको तिकडे डोकावणारा स्वाभिमान आणि अनावश्यक आत्मविश्वास या बाबींना बळी पडतात आणि या हातात असणाऱ्या वेळेचा अजाणतेपणी दुरुपयोग करताना दिसतात .

         आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे आपल्याला दैनंदिन जीवनात पाहायला मिळतील जे लोक ऐन तरुणाईत अपेक्षांचा डोगर माथी डौलात मिरवताना दिसतात पण जशी जशी वेळ हातातून निसटत जाते तस वास्तवतेच भान यायला लागत . शेजारच्या काकूंचा केदार , वयाने आता ३२ शी ला आलेला  वयाच्या २७ वर्षांपासून त्याने  लग्नासाठी स्थळे पाहण्यास सुरवात केली ... दिसायला तसा छान, चांगला पोस्ट ग्रॅजुएट ,नोकरीही चांगली त्यामुळे नकळतच समोरच्या स्थळाकडून आभाळाऐवढ्या अपेक्षा ठेवून येणार प्रत्येक स्थळ तराजूत मापायला लागला .. त्यात त्याच्या आईवडिलांचीही साथ ., कोणी खूपच बारीक तर कोणी खूपच जाड , कोणी अतिगोरी तर कोणी सावळी , कोणी फक्त ग्रॅजुएट तर कोणी नोकरीच करत नाही , इतकच नव्हे तर काही मुली तर त्याने एकुलत्या एक आहेत मुलीला भाऊ नाही म्हणून नाकारल्या .... ३ वर्षे यातच निघून गेली ... त्यात कंपनीमार्फत  परदेशी जाण्याची संधी मिळाली त्यामुळे गेली २ वर्षे तो परदेशात असतो , आता आईवडिलांच्यावर संशोधनाची पूर्ण जबाबदारी येऊन ठेपलीये ... पण मुलगा परदेशात असल्यामुळे आता भेटण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा माहितीची खातरजमा करण्याच्या दृष्टीने मुलींकडून आता केदारला नकार येऊ लागले आहेत ...आता आईवडील म्हणताहेत हातात वय आणि वेळ होता तेव्हाच जास्ती मोजमाप काढण्याऐवजी चांगली मुलगी बघून लग्न लावून द्यायचं होत .

                   नीताची कहाणीहि तशीच काही ... व्यवसायाने डॉक्टर ... संशोधनाला सुरवातच मुळात केली गेली २५ व्या वर्षी .. मग सुरवातीचे ३ वर्षे गेली  फक्त डॉक्टर मुलगाच हवा या उद्देशाने ! येणाऱ्या अनेक अनुरूप स्थळांना नकार दिला , त्यातूनच एखाद डॉक्टरच स्थळ आलंच तर तो  खूप उंचच आहे , जाडच आहे किंवा माझ्या फॅकल्टीचा नाही अशा कारणांनी नकार दिला जायचा ..! पण २८ नंतर हळूहळू थोडस दडपण येऊ लागलं तरीही अपेक्षा काही केल्या कमी होईनात .. तिच्या आईने तर सरळ सरळ सांगून टाकलं जोपर्यंत तिच्या लायक डॉक्टर मुलगा मिळणार नाही तोपर्यंत लग्न करणारच नाही .. कितीही वेळ झाला तरीही चालेले .. पण नीताच्या आणि तिच्या आईच्या हट्टापोटी आज ३६ वर्षाची नीता अजूनही वरसंशोधनात गुंतली आहे .. वयाच्या खुणा चेहऱ्यावर जाणवू लागल्या आहेत ... आयुष्याचं एकेक पान उलटत ती पुढे जात आहे खरी , पण बरच काही हातातून निसटत जातंय याची तिला तिळमात्र कल्पना अजुनी येत नाही याचीच खंत वाटते ..

            वेळेचं महत्व आजच्या पिढीला  चांगलंच माहिती आहे त्यामुळे उपवर तरुण -तरुणींनो हातात असणाऱ्या वेळेला मौल्य द्या , आयुष्यात महत्वाचा असतो तो आपल्या साथीदाराचा आधार , आपापसातील अनुकूलता . शैक्षणिक भिन्नता , व्यावसायिक भिन्नता नव्याने स्वीकारायला शिका .. एकमेकांना भेटा , बोला मग निर्णय घ्या .. आपल्या अपेक्षांमध्ये बसणारा जोडीदार आपल्याला प्रथमदर्शनी अनुरूप वाटेलही , व्यावहारिक दृष्ट्या सर्व काही जुळून येईलही पण मानसिक आणि भावनिक दृष्टया जर तुमचं पटत नसेल तर काय उपयोग अशा संसाराचा .. आपण नीट विचार केला तर कित्येक असे संसार मोडताना आपण बघितले असतील जे बाहेरून  एकमेकांच्या अगदी अपेक्षेत तंतोतंत अनुरूप असणारे पण काही कारणास्तव लग्नानंतर खटके उडून चक्क संसार मोडकळीला आलेला .. त्याउलट असेही अनेक संसार आहेत , जोड्या आहेत ज्या दिसायला अगदीच वेगळ्या वाटतात, वैयक्तिक दृष्ट्या दोन पूर्णतः वेगळ्या आणि स्वतंत्र्य विचारांच्या आहेत  पण त्यांचा संसार सुखाचा होतोय . का दिसून येतात या तफावती ....? केलाय का विचार यावर कधी .? 

           एखाद्या नात्याला आणि त्यातल्यात्यात नवरा - बायकोमधील नात्याला गरज असते ती वैचारिक , भावनिक अनुकूलतेची .. ही नात्याची गाठ एकमेकांच्या प्रेमाने गुंफायची असते , विचारांनी सजवायची असते आणि एकमेकांबद्दलच्या आदराने, त्यागाने जपायची असते पण आजकाल होतंय काय कि व्यावहारिक पणाने नात्याची सुरवात होते ... काही नाती सुदैवाने आनंदाने फुलतात तर बऱ्याचशा  नात्यामधील व्यावहारिकपणाचा  मुखवटा निघाल्यावर राहतो तो फक्त कोरडेपणा .. त्यामुळे नवराबायकोमधील नातं सुरु करताना आपला व्यवसाय ,हुद्दा ,रूप - रंग याचा विचार होणे प्राथमिक गोष्टी आहेत पण त्यापलीकडे जाऊन जोडीदाराची पारख त्याचा स्वभाव , संस्कार आणि क्षमता यावर विचार व्हावयाला  हवा म्हणजे काय होईल तुम्ही स्वतःवर बंधने न घालता येणाऱ्या प्रत्येक स्थळाला पारखू शकाल आणि तुमच्या विचाराना , कलागुणांना , क्षमतांना पूरक असणाऱ्या स्थळाची समर्थपणे अचूक निवड करू शकाल . तेही योग्य त्या वयात !!!

 

डॉ स्नेहल अवधूत सुखटणकर

[email protected]

 

  10th December, 2019

Leave a Comment