gudi padwa - Dr snehal sukhatankar

    आपल्याकडे मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त . गुडी पाडव्याचे दाखले अगदी त्रेतायुगापासून , द्वापारयुगापासून आपल्याला मिळतात . प्रभू रामचंद्र जेव्हा १४ वर्षाचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून आयोध्येत परत आले , त्या दिवशी अयोध्येतील प्रजेने दारात प्रभू रामाच्या स्वागतासाठी सडा - रांगोळी घालून गुढ्या उभ्या केल्या . तोच हा दिवस . म्हणजे कितीतरी हजारो वर्षांची परंपरा लाभलेला हा दिवस . पुढे आपल्या संस्कृतीला धुळीत मिळवण्याच्या हेतूने अनेक परकीय सत्ता आपल्या देशात आल्या . सर्वत्र अराजकतेचे सावट असताना एक युगपुरुष जन्माला आला , ज्याने कोलमडलेल्या हिंदू संस्कृतीला नव्याने स्वराज्याचे बाळकडू दिले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . पुन्हा गुढी उभी करण्याची संकल्पना प्रत्यक्ष शिवरायांची होती. आणि आजतागायत हि मानाची गुढी कित्येक भारतीयांच्या घरी अगदी दिमाखात उभारली जाते .

       " गुढी पाडवा अभ्यास वाढवा "असे आपल्याकडे लहान मुलांना मस्करीने म्हंटले जाते . कारण मार्च एप्रिल महिना म्हणजे शालेय मुलांच्या परीक्षेचे दिवस . त्यामुळे जोमाने अभ्यासानं लागण्याची हीच ती वेळ , असा नकळत संदेश त्यात असतो . आपल्या भारतीय पंचांगानुसार आपले नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते . म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा . या सणाला अनेक नावाने संबोधले जाते .गुढी पाडवा , पाडवो ,पद्दावो , युगादी,उगादी ,संसर पडवो , चेटी चांद , नावरेह , सेजायुग , नाम्ना पानब .

चैत्र महिन्याचे हे दिवस म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटण्याचे हे दिवस .. नव्या अंकुराने नव्याने सृष्टी सजण्याचे दिवस . आपल्या निसर्गदेवतेकडून आपण मानवानीही काही बोध घ्यायला हवा . गुढीच्या काठीला ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या पानाच्या डहाळ्या आणि साखरेची माळ दोन्ही लावली जाते त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातही जुन्या कडू आठवणी , अनुभवांना तिलांजली देत नव्या गोड आठवणींना वाट करून देणारे नवीन बीज पेरायला हवे . आणि याची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून झाली पाहिजे . कारण आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीचा पायाचं जणू शुद्ध , निर्मल नातं आहे . पण एकूणच बदलत्या काळानुसार आजकालच्या विवाहित जोडप्यांचे गणितही बदलले आहे . आत्मकेंद्रित असणाऱ्या ह्या पिढीच्या बुद्धीवर आपल्या नको तितक्या शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमतेचा जणू पडदाचं पडलाय . त्यामुळे दिवसेंदिवस नात्यांची गाठ सैल होत असताना दिसत आहे . बऱ्याच घरात नवरा - बायको , भाऊ - भाऊ , भाऊ – बहीण, बहिणी - बहिणी दुर्दैवाने कधी कधी स्वतःच्या आई वडिलांबरोबरही बऱ्याच मुलांचे नाते काही क्षुल्लक कारणावरून तुटताना दिसत आहे . हे सर्व थांबवायचे असल्यास काय हवंय ? अभ्यास हवाय !!

    आता लहान बाळाचंच घ्या ना, जेव्हा ते चालायला लागते तेव्हा ते कित्येकदा पडते . पण पडते म्हणून थांबत नाही , पुन्हा नव्याने उठते आणि नव्याने प्रयत्नांना लागते . त्याने तो पडणे - उठणे याचा अभ्यास केला म्हणून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला . आयुष्याचा प्रत्येक टप्प्यातही असाच अभ्यास हवा . मग ते बालपण असो वा शालेय जीवन , करियरसाठीची धडपड असो व लग्नासाठीचे संशोधन अथवा नात्यातील उतार चढाव .. प्रत्येक पावलावर अभ्यास करत असताना भूतकाळातील वाईट अनुभवांना तिलांजली देत , चांगल्या आठवणींवर मनन चिंतन व्हायला हवे . भूतकाळातील अनुभव कधीच वाया जात नाहीत . ते वाईट असले तरीही नीट विचार केला असता त्यातून आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी नक्कीच बोध मिळतो . त्यामुळे अभ्यास हा हवाच .

               आता हा अभ्यास कसला तर स्वतःला समजून घेण्याचा . अभ्यास आपल्या प्रियजनांना समजून घेण्याचा . अभ्यास समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा . प्रत्येक माणूस वेगळा असतो , त्यामुळे प्रत्येकाची आयुष्याला समजून घेण्याची कलाही वेगळी असते . त्यामुळे विचारांचे हे युद्ध वैचारिक पातळी ओलांडून भावनिक गुंता वाढवणार नाही याचा अभ्यास व्हायला हवा . असं म्हणतात कि , पाडव्याच्या दिवशी एखादी नवीन गोष्ट घरात विकत घेतली पाहिजे जसं कि सोने , चांदी किंवा नवीन घरात गृहप्रवेश किंवा आणखी काही मौल्यवान वस्तू . कारण त्याने घरात समृद्धी येते , भरभराट येते , संपन्नता येते आणि ती वस्तू निरंतर चिरकाल आयुष्यात टिकून राहते . ह्या झाल्या सगळ्या व्यवहारिकपणाच्या गोष्टी . पण घराला घरपण आणायचं असल्यास घरात प्रेम वृद्धिंगत व्हायला हवं . आपापसात जिव्हाळा वाढायला हवा . त्यामुळे "गुढी पाडवा - अभ्यास वाढवा " हि उक्ती फक्त शालेय मुलांनाच नाही तर आपल्या सर्वानाच लागू पडते .

         चला तर मग या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपल्यातील प्रेम , जिव्हाळा आपुलकी , विश्वास , सेवाभावी वृत्ती , भक्ती , निष्ठा , समर्पण या सगळ्यांचीच वृद्धी होण्यासाठी एक पाऊल पुढे उचलुया आणि खऱ्या अर्थाने समृद्धतेची हि गुढी फक्त पाडव्या दिवशीच नव्हे तर आयुष्यभर आपल्या मनामनात अखंड स्थित करूया .

                         डॉ स्नेहल अवधूत सुखटणकर

  25th March, 2020

Leave a Comment