Ideal difference between age of bride & groom

लग्नाच्या दृष्टीने वधू - वरातील वयाचे अंतर किती असावे?
              मुळातच २१ व्या शतकात लग्नाची समीकरणे अत्यंत वेगळ्या दिशेने झेपावत आहेत. आज आपला सुशिक्षित समाज इतका प्रगल्भ झाला आहे कि  " मी माझ्या मुलीला मुलासारखच वाढवलं आहे , मुलांइतकेच खंबीर स्वातंत्र्य आम्ही आमच्या मुलीला दिलेले आहे " असे अगदी अभिमानाने मुलींचे पालक सांगतात . आपल्या प्रगल्भ समाजाची  हि उदात्त विचारसरणी , खरंच स्त्री ला स्वावलंबन आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टींशी जोडत आहे .  आजची स्त्री खूप  सक्षम आहे , दृढनिश्चयी आहे . 
            जेव्हा प्रश्न येतो लग्नासाठी सह जोडीदार शोधण्याचा , आज मुलं - मुली खूप निवडक झाली आहेत . अगदी पगाराच्या आकड्यांपासून  ते घराच्या - गाडीच्या EMI पर्यंत सगळ्याचीच गणिते आधीच त्यांनी मांडून ठेवलेली असतात . अशा वेळी लग्नाच्या दृष्टीने  मुला - मुली मधील वयाचं अंतर हा एक सोयीस्कर रित्या हाताळला जाणारा मुद्दा बनून राहिला आहे . 
           Counselingच्या माध्यमातून एकदा शर्वरीला  भेटण्याचा योग आला.  २५ वर्षाची शर्वरी इंजिनिअर , नुकतीच चांगल्या मल्टि नॅशनल कंपनीत नोकरीला लागलेली , पॅकेज खूप काही जास्त नव्हतं पण  पुढे वाढणारच यात शंका नाही , दिसायलाही छान , चुणचुणीत आणि आता घरातल्यांनी लग्नासाठी वर संशोधन चालू केलं होतं . अर्थात तडफदार शर्वरीने खूप उत्साहाने या संशोधन कार्यात पुढाकार घेतला होता . जेव्हा तिला तिच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा विचारल्या , ती म्हणाली " मला माझ्या क्षेत्रातील  म्हणजेच इंजिनिअर , चांगली नोकरी , चांगलं पॅकेज , स्वतःच घर आणि गाडी असणारा well settled असा मुलगा हवा " तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास , तिच्या आई - वडिलांची कॉलर जास्तच tight करत होता . बरं खरं सांगायचं तर आता शर्वरीने सांगितलेला अपेक्षा काही जगावेगळ्या तर नक्कीच नाहीत. प्रत्येक मुलीला well settled स्थळ हे हवंच असतं . पण त्याप्रमाणे जेव्हा तिला तिच्या अपेक्षेत बसणारी स्थळे दाखवायला चालू केली , त्यावेळी थोडी ती गोंधळल्या सारखी जाणवली . कारण विचारताच म्हणाली , “हि सगळी मुले well - settled असली तरीही माझ्या पेक्षा वयानी मोठी आहेत . ४ ते  ५ वर्षाचं अंतर म्हणजे मोठी काय साधारणतः generation gap च म्हणावा हवं तर . इतक्या वयस्कर मुलांच्या बरोबर माझी मते कशी जुळणार ? कसा आमचा संसार होणार?” शर्वरीच्या या बालिश मतांना तिच्या आई - वडिलांनीही एक हास्यार्थी दुजोरा दिला .
                  नकळतपणे माझ्या तोंडून शर्वरीच्या आई - वडिलांना प्रश्न विचारला गेला . तुमच्या दोघांच्यात किती वर्षाचं अंतर आहे ? लागलीच शर्वरीचे बाबा म्हणाले ९ वर्षाचं अंतर आहे आम्हा दोघांच्यात ." दुसरी शंकाही विचारूनच टाकली " ९ वर्षाचं अंतर ? मग तुमच्यात हि मतभिन्नता झालीच असणार आहे ना generation gap मुळे ??" त्यावर बाबा म्हणाले " त्यावेळी काय !! आमचे आई - वडील लग्न ठरवायचे आणि आम्ही निमूटपणे बोहल्यावर चढायचो . आमच्या वेळी अगदी १०- १२ वर्षाचं अंतर ठेवूनही लग्न व्हावयाची . पण आताच काय सगळंच बदललंय ना?  आता शर्वरीच्या मते आम्ही ० ते २, जास्तीतजास्त ३ वर्षाने मोठा असणारा मुलगा पाहत आहोत.”
                     लगेचच शर्वरीच्या आई बोलायला लागल्या ," मी तर म्हणते ० - २ वर्षेच पुरे . ३ वर्षे म्हणजे पण खूप जास्तच होतं . मग मत पटणार नाहीत आणि मग सगळंच गोंधळ. नकोच ते .  म्हणजे बघा २५ ते २७ या वयोगटातीलच मुले आम्ही पाहू . "  आणि हो हे वयाचं अंतर पाळत असताना मुलगा well settled असावा हि अट काही शिथिल झाली नव्हती . 
                      वरकरवी हि अट  खूपच सामान्य आहे , आजकाल सगळेच वधू - वर , विशेषतः मुली , वयाच्या अंतराबाबत खूपच सतर्क असताना दिसताहेत . पण हा वधू - वरांमधील जनरेशन गॅप म्हणजे तरी काय आणि तो किती, आणि का असावा याचे उत्तर आपल्या वडील धाऱ्यानी खूप आधी पासून उदाहरणासहित आपल्याला दाखवून दिलंय , पण आपण ते सोयीस्कररीत्या दुर्लक्षित करून आपले नवीन गणित मांडत आहोत. 
               अर्थात ॥कालाय तस्मै नम:॥ प्रमाणे कालानुरूप प्रत्येक गणितात बदल हे होतातच , काही वेळा बदल होणे गरजेचेही असते, पण एखादं गणित आखण्या मागचा हेतू समजावून घेणे खूप गरजेचे असते .                आधी आपण जाणून घेऊया शास्त्रीय म्हणजेच scientific कारण .  मुलींनमध्ये शारीरिक आणि मानसिक परिपक्वता हि मुलांच्या  तुलनेत लवकर येते . त्यामुळे  लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा लहान असणे गरजेचे असते . सारख्या वयाच्या मुलामुलींमध्ये मतभिन्नतेमुळे अनेक अडचणी येऊ शकतात . शिवाय लग्न म्हणजे मानसिक आणि भावनिक जुळवाजुळवी बरोबरच शारीरिक आकर्षण आणि जुळवाजुळव याचाही विचार महत्वाचा असतो . स्रीयांच्यात Puberty period लवकर चालू होतो आणि रोजोनिवृत्ती (menopause) म्हणजेच fertility period पुरुषांच्या तुलनेत आधी समाप्त होतो . अशा वेळी समवयीन किंवा १- २ वर्षांच्या वयाच्या अंतरात होणारी लग्ने म्हणजे शारीरिक आणि भावनिक गुंतागुंतीचा कहरच आपण म्हणू शकतो . 
       काही समजूतदार जोडपी यातून एकमेकांना समजून घेत पुढे जातात पण आजकालची परिस्थिती बघितली तर बऱ्याच जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही महिन्यातच काडीमोड झालेला दिसतो .  लग्न करताना तरी सगळं काही छान जुळलेलं असत , शिक्षण , पॅकेज , घर , गाडी मुख्य म्हणजे ० ते २ वर्षाचं अंतरही . मग तुम्ही मला सांगा का अशी हि संसाराची वाताहत ? 
             तेच आपण जर आपले आई-वडील , आजी - आजोबा याना पहिले तर आनंदी  संसाराची आणि सहजीवनाची वाटचाल हि कोणत्या समीकरणांवर त्यांनी पेलवली हे आपल्याला सहज समजून येईल . आता अगदी वयस्कर झालेल्या आजोबाना कशी आजी सांभाळून घेते आणि तरुण पणात याच खट्याळ  आजीचे नखरे - हट्ट कसे आजोबानी सावरून घेतले या सगळ्याचा जर आपण उघड्या डोळ्यांनी विचार केला तर एक गोष्ट नक्की आपल्या ध्यानात येईल लग्नासाठी वधू - वरांमधील वैचारिक आणि शारीरिक  परीक्वता एकमेकांना पूरक असणे खूप गरजेचे असते .            
                बदलत्या काळानुसार ठरवून केलेल्या लग्नात तरी १० - १२ वर्षाचं अंतर आता आपण ठेवणे योग्य नाही पण म्हणून ० ते २ वर्षाचं अंतर ठेवून रोज उठून एक नवीन लढाई गाजवण्यापेक्षा एक संतुलन साधत साधारणतः ३- ६ वर्षाच्या अंतरात जर लग्न केले तर सर्वोत्परीने ते लग्न यशस्वी ठरण्याची शक्यता खूप खूप जास्त असते , अर्थात हे सर्वेक्षणानुसार सिध्दीही झालेले आहे . 
              लग्नासाठी भौतिक गोष्टीत अनुरूपता असणे व्यवहाराच्या दृष्टीने गरजेचे आहे पण त्याआधी  वधू - वरांमध्ये शारीरिक आणि वैचारिक जुळवाजुळव असणे हे कोणतेही लग्न यशस्वी होण्यामागचे सगळ्यात मूलभूत कारण आहे .

  16th May, 2021

Leave a Comment