Mahila Din- Nave Parv, Nava Sankalp -Article by Dr Snehal Sukhatankar , Tarun Bharat

" महिला दिन - नवे पर्व , नवा संकल्प "

                     " अरे संसार संसार , जसा तवा चुलीवर , आधी हाताला चटके मग मिळते भाकर " बहिणाबाईंचे हे काव्य सर्वांच्याच परिचयाचे आहे . आधी माहेरी  नंतर सासरी अशा दोन कुटुंबापुरती स्त्रीच जीवन सामावलेलं असायचं . त्यात चूल आणि मूल हीच स्त्रीची भूमिका अस अगदी लहानपणापासून प्रत्येक मुलींच्या मनावर बिंबवलं जायचं .  आणि या मर्यादित संकल्पनेतच  अनेक स्त्रिया आयुष्य  पाहायच्या . पण जसजसा काळ बदलत गेला तसतशा काही स्त्रिया खंबीर बनल्या , शैक्षणिक दृष्ट्या सक्षम झाल्या आणि चार भिंतीच्या पलीकडेही जग आहे आणि त्या जगात ताठ मानेने आपणही वावरू शकतो याचे जणू उदाहरणच त्यांनी स्त्री जातीला  घालून दिले .मग  हळूहळू स्त्रिया बाहेर पडू लागल्या , शिकू लागल्या , नोकऱ्या करू लागल्या . आणि आज आपण पाहू शकता शिक्षण , राजकारण , कला , क्रीडा यासारख्या असंख्य क्षेत्रात स्त्रिया पुरुष्यांच्या बरोबरीने आघाडीवर आहेत .

                       आजच्या बदललेल्या स्त्रीचे हे स्वरूप खरेच उल्लेखनीय आहे . ती शिक्षण , नोकरी बरोबरच आपला संसार , नाती - गोती , रीती-रिवाज , मुलं -बाळ यासर्वांना सांभाळते . ती मुलांचा अभ्यासही घेते आणि ऑफिसचे लक्ष्यही पूर्ण करते , ती घरातील सर्वांच्या आवडीनिवडी जपते आणि ऑफिसच्या कामाच्या वेळही व्यवस्थापित करते आजची स्त्री जशी घराच्या छोट्यातछोट्या वस्तूचा मागोवा घेते तशीच ती अथांग सागराच्या तळाचा मागोवा घेते , तर  कधी  अंतराळयानातून  अवकाशाला गवसणी घालते .  कधी मुलगी , कधी पत्नी , कधी सून , कधी आई , कधी आजी ह्या प्रमुख भूमिका बजावत असतानाच कधी डॉक्टर , कधी इंजिनिअर , कधी वकील तर कधी शिक्षक अशा अनेक व्यावहारिक भूमिकाही अगदी तठस्थपने निभावत असते . 

                   पण हे सगळं करत असताना स्रियांचा असा एक घटक जो २४ तास १२ महिने सतत कार्यरत असतो तो म्हणजे गृहिणी .  आपल्याकडे अगदी जाणते - अजाणतेपणी गृहिणी म्हणजेच ज्यांच घर , मुलबाळ , नवरा हेच चार भिंतीच्या आत जग सामावलेलं असत त्यांना मात्र नोकरी करणाऱ्या महिलांच्यातुलनेत दुय्यम स्थान दिले जाते .का तर ती घरीच असते ना ? ती कुठे काय करते ? असा समज बऱ्याच लोकांचा असतो . 

                  समुपदेशनाच्या माध्यमातून देशपांडे काकूंचा अनुभव ऐकला तो इकडे मांडावासा वाटतो , देशपांडे काकू तशा आता ५२ वर्षाच्या , शिकलेल्या असूनही नोकरी करण्यात इतका रस नव्हता त्यामुळे घर नीटनेटकं ठेवणे , आलेल्या गेलेल्याना छान छान पदार्थ करून घालणे , मुलाबाळांच्या , नवर्याच्या आवडीनिवडी जपणे याची  त्यांना आवड . पण हे सगळं करत असताना नकळत त्या आपल्या आवडीनिवडी पार विसरूनच गेल्या . घराच्या बाहेर मैत्रिणीन बरोबर वेळ घालवणं , स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करणं याचा त्यांनी कधी विचारच केला नाही .. आणि आता जेव्हा मुलं मोठी झालीयेत त्यांना त्यांचं स्वतंत्र्य मित्रपरिवाराच वर्तुळ निर्माण झालंय आणि  साहजिकच त्यामुळे आईची काळजी त्यांना आता तिची लुडबुड वाटू लागलीये, नवराही  आपल्या नोकरीनंतर आपल्या मित्रपरिवारात मग्न असतो त्यामुळे आता मात्र देशपांडे काकूंना हे तेच तेच नित्यक्रमाच आयुष्य निरस वाटू लागलय . औदासिन्य आले होते . पण वेळ अजुनी गेली नव्हती . नवं चैतन्य, नवी आशा  अजुनी जागृत होऊ शकते हा विश्वास त्यांना येणं  खूप गरजेचं होत . हळूहळू समुपदेशनाच्या माध्यमातून एक एक गोष्टीचा गुंता सुटत गेला तसा हळूहळू त्यांच्यात सकारात्मक बदल होत गेला. त्यांनी भजन क्लास  सुरु केला , सकाळ , संध्याकाळ योगा साठी जाऊ लागल्या , कधी कधी बागेत जाऊ लागल्या , त्यातून हळूहळू कितीतरी नवीन मैत्रिणी त्यांना मिळाल्या , एक कुटुंबाबाहेरचा आपलासा वेगळा परिवार मिळाला. बऱ्याच  वेळा त्या त्यांच्या सोबत सहलीलाही जातात . आता त्या खूप  खुश आणि आनंदी असतात . आता त्या म्हणतात इतके वर्षे मी स्वतःला या गोष्टींपासून का वंचित ठेवलं . हे सगळं मी तेव्हाही करू शकले असते माझा संसार सांभाळत .   त्यामुळे गृहिणीनो संसार करणे , नवरा - मुलेबाळे याच करणं , घरातील मोठ्यांच- आलेल्या गेलेल्यांचे करण जसं तुमचं कर्तव्य आहे तसच स्वतःचा आनंद , स्वतःच्या आवडीनिवडी जपणे , स्वःताला सकारात्मक ठेवणे  तुमचा अग्रक्रम असणे जास्त गरजेचे आहे .

          आज  नोकरी करत घर सांभाळणाऱ्या स्त्रीचीही खूप ओढाताण होते .  व्यायाम , ध्यान धारणा ,सकस आहार , पुरेशी झोप , पुरेशी विश्रांती या पंच सूत्री शारीरिक स्वास्था बरोबरच मानसिक आरोग्याचीही गुरुकिल्ली आहेत . त्यामुळे मैत्रिणींनो जरा थांबा , स्वतःला न्याहाळा , स्वतःच्या आवडीनिवडी ओळखा , त्या जपा  स्वतःला जपा , स्वतःचे लाड पुरवा .दिलखुलास  हसा ,  बागडा ,छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद वेचायला शिका.  महिला दिनाच्या ह्या पर्वात आपण सर्वानीच  स्वतःला एक भेट देऊया ,स्वतःशी एक निश्चय करून . वय काहीही असो , स्वतःतील ती गोंडस , निरागस, खट्याळ  चिमुरडी कधीच हरवणार नाही हा संकल्प करून . 

डॉ . स्नेहल अवधूत सुखटणकर

विवाह समुपदेशक

  6th March, 2020

Leave a Comment