Marriage Live-in Relationship Friends with Benefit

लग्न - लिव्ह - इन  रिलेशनशिप - फ्रेंड्स विथ  बेनिफिट्स

 

             "सप्तपदी विवाह "च्या माध्यमातून   जेव्हा अनेक अधुनिक आणि सुशिक्षित तरुण - तरुणींना भेटते तेव्हा  आपल्या विवाह संस्कारांविषयीचे त्यांचे मत झपाट्याने बदलताना दिसत आहे. अर्थात त्यातून पाश्च्यात्य संस्कृतीचे धडे किती खोलवर गिरवले गेलेले आहेत हे कळून येते. अगदी लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत आपण इंग्रजी भाषेपासून ते त्यांच्या पेहरावापर्यंत सगळ्यांचेच अनुकरण करण्यात धन्यता मानतो. किंबहुना त्या साच्यात न बसणारी मंडळी थोडी मागासलेली आहेत कि काय असा आव बऱ्याच मंडळींकडून आणला जातो.  वरकरवी हे बदल छान आणि काही प्रमाणात गरजेचे  असतीलही पण अनेक बाबतीत हे अंध अनुकरण आपल्यालाच जड जाईल कि काय अशी भीती वाटते.

                कार्यशाळा , मेळावे , बऱ्याच वेळा वैयक्तिक समुपदेशनाच्या माध्यमातून आज अनेक तरुण -तरुणी जेव्हा विवाह संस्काराविषयी अनेक शंका - कुशंका मांडतात ते ऐकून हसावे कि रडावे हेच मुळात कळत नाही. " लग्न करायचेच कशासाठी ? लग्नाने कोणाच भलं झालाय ? मला माझे व्यक्ती स्वातंत्र्य गमवायचे नाही, मला कोणाच्याही बंधनात अडकायचे नाही, एकच आयुष्य आहे ते लग्नात स्वतःला गुरफटून घेऊन वाया नाही घालावयाचे, मी एकटी/ एकटा खंभीर आहे आयुष्य जगण्यासाठी मला कोणाची गरज नाही, " असे अनेक वाक्प्रचार रोज ऐकायला मिळतात. सगळ्यात वाईट वाटत जेव्हा एक साध्या कुटुंबातून आलेली मुलगी विचारते "लग्न करून माझं संपूर्ण आयुष्य मी एकट्या माणसाबरोबर कसं काय रहाणार?" यावरून कळून येत आपला समाज आज   कोणत्या वाटेवरून जात आहे.

    "लिविंग रिलेशनशिप  " आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा शब्द. व्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग म्ह्णून याची सुरुवात झाली असावी. काही वर्षांपुर्वी एखादे जोडपे लिविंग मध्ये असणे म्हणजे खूप मोठा चर्चेचा , वादाचा विषय असायचा. ते तरुण - तरुणी एकत्र रहायचे, बऱ्याचवेळा पटले आणि एकमेकांत जुळले तर त्या नात्याचे रूपांतर लग्नात व्हायचे . पण जर नाही पटले तर मात्र काडीमोड करताना होणारा त्रास, होणारी  मनाची घुसमट, कुटुंबाचा आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन हे सगळं पचवणं थोडं कठीणच जायच. त्यातल्यात्यात स्त्री ला त्याची झळ जास्त सोसावी लागायची. त्याहूनही अधिक  अशा नात्यातून जन्माला आलेल्या बाळाची स्थिती तर बघायलाच नको .

                   . "लिविंग रिलेशनशिप "मध्ये कदाचित तरुण - तरुणी एकमेकांबरोबर काही काळ तरी निदान निष्ठावंत असायचे. पण आजचा काळ त्याही पलीकडे गेलेला दिसून येतोय. आजची संकल्पना  आहे  "फ्रेंड्स फॉर बेनिफिट ". आजच्या तरुण - तरुणींना कोणत्याही प्रकारच्या वचनबद्धतेत अडकायचं नाही हे यावरून दिसून येते. वरकरवी या  संकल्पनेला  आजचे  अनेक तरुण - तरुणी   अधुनिकतेचे प्रतीक मानतात. पण जर डोळसपणे पाहिले तर अशा नात्यातून पदरी पडणारे नैराश्य भयानक असते. आज अनेक मनोसोपचार तज्ज्ञ सांगताना दिसताहेत भारतात तरुण पिढीच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण आहे अशा नात्यातून झालेला मनोभंग (ब्रेक अप्स).

            आजच्या पिढीकडे आर्थिक सुबत्ता आहे, आपले आयुष्य आपल्याला हवे तसे ते जगतात. तरुणपण  हातात असे पर्यंत या गोष्टी बऱ्याच वाटतात. पण नंतरच काय? कितीही पाश्च्यात्य गुण अवलंबिले तरी रक्तात तर आपल्या पिढ्यानपिढ्या कोरले गेलेले संस्कारच आहेत ना ? आज किती तरुणींनींना किंवा तरुणांना लिविंग मध्ये असो किंवा फ्रेंड्स फॉर बेनेफिट असो आपला जोडीदार आपल्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर जाणे नॉर्मल वाटते ? संकल्पना काहीही असो कितीजण हे आनंदाने  स्वीकारणार आहेत ? त्रास हा होणारच कारण शेवटी आपले संस्कारच असे आहेत.

           समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक ४० शी गाठलेले तरुण - तरुणी भेटतात , ज्यांनी हे सगळं करून झाल्यावर शेवटचा आणि कायमचा पर्याय निवडला तो म्हणजे "लग्न ".  यावरून कळून येते आपण कितीही अधुनिक झालो, पुढारलेल्या विचारांचे झालो तरीही आपला मुळाधार हा एक स्थिर कुटुंब पद्धतीमध्येच आहे आणि तो इथून पुढेही रहाणारच आहे फक्त याची वेळीच आजच्या तरुण पिढीला जाणीव झाल्यास बरे !

डॉ . स्नेहल सुखटणकर

विवाह समुपदेशक

सप्तपदी विवाह संस्था

  18th October, 2022

Leave a Comment