Relationships

ही नाती ऋणानुबंधाची !!!

‘नाते किंवा नाती’ हा एक अवघड व गहन शब्द आपण आपल्या रोजच्या जीवनात खुपदा एेकतो, बोलतो पण नाते म्हणजे नेमकं काय? प्रत्येक माणुस वेगळा आहे. प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. कांहीच्या मते नाते म्हणजे आपण आणि आपल्या कुटुंबातील लोक, कांहीच्या मते नाते म्हणजे कुटुंब आणि मित्रपरिवार. जितक्या व्यक्ती-तितके विचार त्यामुळे नाते/नाती या शब्दाची नक्की व्याख्या करणे जरा अवघडच आहे!!!

कुटुंबात बरीच माणसे असतात, आई-वडिल, आजी-आजोबा मुले, सुना नातवंड, पण या सर्व माणसांना एकाच छताखाली एकत्र बांधून ठेवणारा दूवा म्हणजे नाते आणि घर टिकून रहाण्यासाठी महत्वाच असतं हे दृढ आणि निर्लोभ नात. ज्याप्रमाणे मोत्याचा हार सुंदर दिसण्यासाठी त्याच्या मध्याबिंदूतून धागा ओवलेला चांगला त्याप्रमाणे नात्यांची माळ ओवताना हा धागा प्रत्येक व्यक्तिच्या अंतःकरणातून ओवला गेला पाहिजे.

जेव्हा हा नात रुपी धागा मजबूत होत जातो, तसतस दोन व्यक्तीमधील प्रेम आदर, आपुलकीही वाढत जाते. आणि यातूनच सुरुवात होते एका संस्कारक्षम आणि गुणात्मक कुटुंबाची.

पण आजकलच्या जगात मग तुम्ही याला ‘कलीयुग’ म्हणा किंवा रन्ळ्य्ग् ऊग्ल्ळ् हब्य्न्छ ही नाती कमजोर होत चालली आहेत. बर्याचवेळा या नात्यांचा वापर एकमेकांच्या गरजा भागवण्यापुरताच केला जातो, त्यामुळे आजकल हे नाते ऋणानुबंधाचे म्हणण्यापेक्षा ‘हे नाते व्यवहारिकपणाचे’ म्हणणे वावगे ठरणार नाही हे नक्की!

परवाच आम्ही पुण्यातील एका विख्यात वृध्दाश्रमाला भेट दिली, बर्याच वयस्कर आजी-आजोबांची मनोगते त्यानिमित्तानी आम्ही जाणली. ते सर्व वृध्द लोक चांगला कुटुंबातील, आर्थिक दृष्ट्या खूपच सशक्त असणार्या मुलामुलींचे पालक होते पैशाच्या दृष्टीने त्यांना तिथे काहीच कमतरता नव्हती पण तरीही या बिचार्या आजी-आजोबांच्या चेहर्यावर कुठेतरी आपल्या पोटच्या माणसांपासून दूर राहिल्याचे दुःख जाणवत होते. तशी त्यांनी प्रांजल कबूलीही दिली. त्यापैकी किती एक जणांची मुले अति उच्च शिक्षण घेतलेली उच्च पदावर नोकरीला असलेली आणि त्याहीपेक्षा अनेकजण परदेशात स्थायिक असणारी अशी होती. मग काय? एकतर त्यांच्याकडे आपल्या आईवडीलांना द्यायला वेळ नव्हता किंवा त्यांना आपले आईवडिल म्हणजे घरातील एक अडगळ वाटू लागली होती. म्हणून त्यावर उपाय म्हणून “वृध्दाश्रम”.

आपण विसरुनच गेलोय की काळ हा कुणालाच सोडत नाही आपणही वृध्द होणर आहोत, आपल्यालाही आपल्या मुलांच्या आश्रयाला रहावे लागणार आहे. आपण आज जसे आपल्या वृध्द आईवडीलांबरोबर वागतो तसेच किंबहूना तेच संस्कार आपण आपल्या पाल्यावरही घडवत असतो. म्हणजेच काय तुम्ही स्वतःच्या बाबतीतही इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास आमंत्रण देताय!!!

बर्याचवेळा वृध्द मंडळीकडून जाणते-अजणतेपणी काही चूका होतात. बदलत्या काळानुसार त्यांनी आपले विचार, रहाणीमान व परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मोठेपणा दाखवायला हवा. दोन्ही पिढीमध्ये एकमेकांना पुरक अशा भावनांचा समावेश होणे गरजेचे आहे.

आपल्या संस्कृतीत 4 देव सांगितले आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, त्यातले सर्वात प्रथम देव माता-पिता, पण त्याच भारतीय संस्कृतीत आता वृध्दाश्रम उभे रहात आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे. तरीही ते कमी पडत आहेत. केवढे दारुण दृष्य? आज पैशाच्या मागे धावणारे दांपत्य, त्यांना मुलासाठी वेळ नाही, जणू काही खेळणी, खाऊ, कपडे मुलांना दिले की झाले त्यांना आईवडीलांच्या प्रेमाची, सहवासाची गरज असते हे सोयीस्करपणे विसरले जाते. बाळाचे शिशूपण कोणत्यातरी पाळण्याघरात जात आहे. मुलाला पाळण्याघरात ठेवले तर तो आईवडिलांना वृध्दाश्रमात ठेवेल यात आश्चर्य काय? इतकेच नव्हे तर आजच्या दुर्दैवी शिशूची जीवन यात्रा पाळण्याघरापासून सुरु होऊन वृध्दाश्रमात संपते. त्या दारुण सामाजिक स्थितीला कारण कोण? तुम्हीच विचार करा.

वृध्द मंडळी ही आपल्याला आपल्या इतिहासाची मुल्ये जोपासण्याची खाण आहे. त्यातून आपण खुप कांही चांगल्या गोष्टी खोदून काढून त्या विचारांना पालिश करुन आपले जीवन समृध्द बनवू शकतो. तर तरुण पिढी येणार्या भविष्याची यंत्रणा आहे. ज्याच्या बळावर आपण या वृध्दरुपी खाणीचा खजिना संपूर्ण जगापुढे आणून जीवन समृध्द, सुखमय आणी अर्थपूर्ण बनवू शकतो.  

 

                                      डॉ.स्नेहल अवधूत सुखटणकर

  5th March, 2019