Review By Mrs Madhuri Shanbhag in Tarun Bharat on Book Swapnanpasun Lagnapariyant

Review By Mrs Madhuri Shanbhag in Tarun Bharat on Book Swapnanpasun Lagnapariyant

स्वप्नापासूनलग्नापर्यंत..

आपले बरेवाईटअनुभव शब्दात मांडुन लोकांसमोर ठेवायची अतीव इच्छा साधारण वय उतरणीला लागले की होते. पण अगदी तरुण वयात, एका महत्वाच्या क्षेत्रात विविध अनुभव घेतल्यावर, त्यातुन लोकाना शिकण्यासारखे आहे हे उमगुन, ते साध्या सोप्या शब्दात पकडुन लोकांसमोर ठेवणे तरुणाईला भावेलच असे नाही.

डॉ. स्नेहल अवधूत सुखटणकर ही अशी एक तरुण मुलगी आहे.

दंतवैद्यकीचे शिक्षण घेतल्यावर तिला आपल्या लग्नानंतर मुलामधे गुरफटल्यामुळे स्वतंत्र व्यवसाय करणे काही काळ शक्य होणार नाही हे उमजले. आपल्या स्वत:ला अन मित्रमैत्रिणींना,आईवडिलानी ठरवुन केलेले लग्न जमवताना आलेले बरेवाईट अनुभव तिला अंतर्मुख करुन गेले. घर बसल्या प्रथम हौसेचा उद्योग म्हणुन महाजालाची मदत घेऊन तिने “सप्तपदी विवाह संस्था” सुरू केली. हळुहळू तिचा व्याप वाढत गेला अन ती नावारुपाला आली. लग्न हा भारतीय समाजातील एक अत्यंत जिव्हाळ्याचा, चित्रविचित्र अनुभव देणारा व्यवसाय इतक्या तरुण वयात तिने सुरू केला त्याचे कारण ती सांगते की, “गेल्या अन आजच्या पिढीच्या लग्नाळू मुलामुलींच्या अपेक्षेमधे जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. आणि तरुण मुलगी म्हणुन मी त्या अपेक्षा समजावुन घेऊ शकते”. लग्न जमवताना लोकाना इतके चित्रविचित्र अनुभव येतात की हा विषय कधीच जुना होत नाही. ती ज्या समाजवर्गातुन येते त्या मध्यम अन उच्च मध्यम वर्गीय समाजात मुलगा अथवा मुलगी ठराविक वयाची झाली की घरची वडिलधारी मंडळी त्यांच्यासाठी जोडीदार शोधायला सुरू करतात. शक्यतो माहितीतील मुलगा/मुलगी असावी असे पूर्वीच्या पिढीला वाटते अन जर आधी कुणी भेटलेले नसेल, प्रेमविवाह करायची संधी मिळालेली नसेल तर उपवर मुलाला अथवा मुलीला नीट निवड करुन जोडीदार मिळावा असे वाटते. यातुन ती वेगवेगळ्या मार्गाने जाऊ पहातात. फक्त नात्यातुन सांगुन आलेल्या स्थळांची संख्या अगदी मर्यादित असते, अन अधिक जास्त निवडीची संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटते. आज अनेक वेबसाईटस त्यासाठी उपलब्ध आहेत. सप्तपदी ही तरुण मुलीने चालवलेली साईट असल्याने मुले अन मुली अधिक मोकळेपणाने स्नेहलशी संवाद साधू शकतात. त्यातुन गेल्या साताठ वर्षात तिच्यापाशी अनेक कहाण्या जमा झाल्या, अन हे छोटेखानी पुस्तक निर्माण करायची प्रेरणा तिला मिळाली.

“स्वप्नापासून लग्नापर्यंत” हे शीर्षकच बोलके आहे. स्वत: वर अथवा वधू आणि त्यांचे आईवडिल लग्नाची स्वप्ने पाहू लागतात आणि अनेक अवास्तव कल्पना त्यांच्या डोक्तात ठाण मांडुन बसतात. अशाना आपल्या अनुभवातुन गोळा झालेल्याअनेक उपयुक्त सूचना यात तिने केलेल्या आहेत. आता स्वत:चे क्लिनिक आणि मोठी होणारी मुले, संसार हे सर्व पती अन सासूच्या सहाय्याने सांभाळुन तिने आपला हौस म्हणुन सुरू केलेला उपक्रम आता तिची निष्ठा बनला आहे. हे एक उपयुक्त समाजकार्य आहे याची जाण तिच्या बोलण्यात पदोपदी जाणवते.

आपला मुलगा अथवा मुलगी यानी लग्नाचे वय गाठलेले आहे हे जाणवले की आईवडील आता त्याना जोडीदार शोधायला हवा असे ठरवतात. अशा सर्व पालकांसाठी या पुस्तकात तपशिलवार सूचना तर आहेतच पण आपले कुठे अन कसे चुकते याचा त्यानी अंतर्मुख होऊन विचार करावा, यासाठी स्नेहलने अनेक छोट्या अनुभव कथन केलेले आहेत. त्यात सर्वप्रथम आपल्या पाल्याशी नीट बोला अन त्यानी कुणी जोडीदार शोधला आहे का? किंवा कुणी त्याच्या अथवा तिच्या मनात भरलेले आहे का? हे आधी विचारुन घ्या. अनेकदा असे असुनही मुले आईवडिलाना आपण जोडीदार शोधलेले आवडणार नाही या अदृश्य दबावाखाली येतात अन नंतर सगळाच गुंता होऊन बसतो. अनेकदा आपला मुलगा किंवा मुलगी हे सर्वगुणसंपन्न असून त्याना अगदी तस्साच जोडीदार हवा अश्या अवास्तव अपेक्षा केल्या जातात. थोडे तिसऱ्या नजरेतुन आपल्या पाल्याचे मूल्यमापन करायला हवे असा व्यवहारी सल्ला लेखिका देते. आपण मुलाना मार्गदर्शन जरुर करावे पण कोणतीही जबरदस्ती करु नये. विवाहसंस्थेत नोंदणी करताना, ती समक्ष असेल वा ऑनलाईन.. संस्थेची नीट चौकशी करायला हवी कारण अनेकदा पैसे घेऊन फसवणूक झाल्याचे प्रकार घडतात. तसेच त्यानी अगदी फुकट काम करावे अशी अपेक्षा कशाला हवी? ते ही हा व्यवसाय करत आहेत, तेव्हा ते वाजवी दाम घेणारच.. पण अनेकदा पालकांचे हे भान सुटते. लग्नामधे अवास्तव खर्च करणारे पालकही अगदी कमीतकमी खर्चात विवाहसंस्थाचालकानी स्थळे पुरवावीत अशी अपेक्षा करतात.

अलिकडे अनेक सामाजिक अन आर्थिक स्तरामधे मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे अन मुलानाच योग्य मुली मिळणे कठीण होत चाललेले आहे. लग्नाचे वय उलटुन चालले तरी आपले योग्य असे मूल्यमापन करुन अवास्तव अपेक्षामधे तडजोड मुलीही करत नाहीत. त्यात अलिकडे मध्यम अन उच्च मध्यम वर्गात मुली नोकऱ्या करुन पैसे मिळवत असतात.. आपल्याला हवे तसे जगत असतात. त्यामुळे उशीर झाला तरी चालेल पण अगदी हवा तसा मुलगा मिळाल्याशिवाय लग्नच करणार नाही असे म्हणणाऱ्याचाळीशीपर्यंत बिनलग्नाच्या राहिलेल्या मुली तिला दिसल्या. एकूणातच लग्नासंबधीचे प्र्श्न सामोपचाराने अन सामंजस्याने सोडवता येतात असा विश्वास तिला वाटतो अन म्हणुनच हे पुस्तक लिहायला ती उद्युक्त झाली. लग्नाच्या मुलीने अन तिच्या आईवडिलानी कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात. तसेच आजकाल फोनवरच जास्त बोलणे होत असल्याने त्यावेळी कोणती पथ्ये पाळावीत. आपला वरपक्ष आहे म्हणुन ताठा दाखवायचे, तसेच, आमची मुलगी/मुलगा गुणांची खाण आहे असे म्हणुन  दुसऱ्यामधे खोड्या काढायचे दिवसही संपले असे ती आजचे वास्तव सांगुन जाते. एकदा मुलाची अन मुलीची पसंती झाली, दोन तीन भेटीत सूर जुळले की बाकी कोणत्याही कारणाने लग्न मोडू नये असा व्यावहारिक सल्ला ती देते. अलिकडे देण्याघेण्यावरुन  लग्ने मोडायचे प्रमाण कमी झालेले आहे असे ती आवर्जून सांगते. सासू सासरे होताना या लेखात ती आईवडिलानी आपली मानसिकता कशी बदलायला हवी याबद्दल टिपणी करते तर एक ना धड मधे.. “याहीपेक्षा बरे स्थळ मिळेल” या चक्रव्युहात फसुन कशी होलपट झालेली दिसली.. मग समुपदेशन करुन ती समस्या सोडवता आली. अशा अनेक व्यावहारिक अनुभव कथनाने अन त्यावरुन केलेल्या सूचनाने हे छोटेखानी पुस्तक पालकाना उपयुक्त वाटेल. आजकाल काहीही करुन लग्न टिकवायला हवे या मानसिकतेतुन मुले अन मुली बाहेर पडल्यामुळे  एकूणच व्यवहारात पारदर्शकता असली तर नंतर प्रश्न उद्भवत नाहीत असा तिचा अनुभव सांगतो.

लग्नापासून स्वप्नापर्यंतचा हा प्रवास अनेक व्यावहारिक सूचना अन प्रत्यक्ष उदाहरणे यामुळे उपयुक्त अन वाचनीय झालेला आहे.

लग्नानंतरच्या समस्यांना यात अजिबात हात लावलेला नाही या माझ्या प्रश्नावर तिने त्या विषयावर माझे पुढचे पुस्तक असेल असे हसत सांगीतले. यावरुन तिने आपले काम किती गंभीरपणे घेतले आहे हे दिसते.

या पुस्तकाबद्दल अभिनंदन आणि पुढच्या पुस्तकाला मन:पूर्वक शुभेच्छा.

--- माधुरी शानभाग.

  7th August, 2022

Leave a Comment